Mummy!
माझी मम्मी
खरे सांगू तर, अशी वेळ इतक्या लवकर येईल असे कधी वाटलेच नव्हते. जुलै आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सासरे आणि पप्पा या दोन्ही पितृतुल्य छत्रछाया अचानक हरपल्या; पण 'मम्मी पाठीशी आहे' हा एक मोठा विसावा होता. २१ जुलै रोजी, अचानक तीही निघून गेली आणि एका क्षणात संपूर्ण पोरकेपण दाटून आले. आज तिला जाऊन चार आठवडे झाले, तिच्या नसण्याने माझ्या जगण्यात चिरंतन रिक्तपणा निर्माण झाला आहे, जो कधीही भरून येणे शक्य नाही. तिच्या विना कसे जगायचे हे मी अजूनही चाचपडत शिकत आहे.
जगासाठी ती एक प्रभावी व प्रगल्भ व्यक्ती होती—अनेक विस्कटलेल्या संसारांना सावरणारी, दुभंगलेल्या मनांना करुणेची फुंकर घालून दिशा दाखवणारी एक संवेदनशील समुपदेशक; मराठी आणि गुजराती भाषेत जवळ जवळ शंभर पुस्तकान मधून व्यक्त झालेली एक प्रगल्भ, आदरणीय साहित्यिक. तिच्या शब्दांत एक अलौकिक, अंतर्मुख करणारे सामर्थ्य होते, प्रत्येक वाचका ला एका क्षणासाठी स्तब्ध होऊन स्वतःच्या अंतर्मनाचा ठाव घेण्यास प्रवृत्त केले. तिला लाभलेला प्रत्येक मानसन्मान आणि पुरस्कार म्हणजे तिने आयुष्यभर इतरांचे विचारविश्व समृद्ध करण्यासाठी केलेल्या जीवनतपश्चर्येचीच साक्ष होती.
पण या पुरस्कारांच्या, लौकिक कौतुकाच्या पलीकडे, ती माझ्या साठी…
केवळ आणि केवळ माझी ‘मम्मी’ होती.
लोकांनी तिच्या शब्दांमधली प्रज्ञा अनुभवली, तर मी तिच्या कुशीतली निखळ माया,जगाने तिच्यात एक विचारवंत, लेखिका आणि मार्गदर्शक पाहिली; मला मात्र तिच्यात कायम ममतेची अखंड सावली अनुभवता आली. आयुष्याकडे अलिप्त तरीही अपार करुणेने पाहण्याची तिची दृष्टी हीच माझ्या जगण्याची सर्वात मोठी शिदोरी ठरली.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत, काळाने तिची अतिशय कठोर परीक्षा घेतली. ज्या स्वाभिमानी, चैतन्यमय स्वातंत्र्याने ती अखंड जगली, त्यावर शारीरिक व्याधींनी मर्यादा आणल्या. त्या नाजूक, असहाय्य घटकांमध्ये आमच्या नात्यांचे बंध अलगद उलटले. मी तिची आई झाले—तिच्या छोट्या-मोठ्या गरजा जपणे, तिच्या कोमेजलेल्या मनाला आश्वस्त करणे आणि त्या व्याकुळ क्षणांमध्ये तिच्या अंतर्मनापर्यंत मायेचा पाझर पोहोचवणे. त्या शांत रात्री च्या घटकांमध्ये तिचा हात माझ्या हातांत घट्ट धरून ठेवणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र क्षण होते.
तीव्र वेदनेतही श्रीकृष्ण, समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकोबांच्या विचारांचे स्मरण होताच तिच्या डोळ्यांत अलौकिक तेज चमकायचे. इतक्या देहयातनांमध्येही तिचा मूळ आत्मभाव मात्र तसाच राहिला. शरीर थकू शकते, पण जागृत आत्मा सदैव अजिंक्य असतो, हे तिने प्रत्यक्ष जगून दाखवले.
तिने अगदी मनापासून आणि सहजपणे स्वीकारलेले तिचे जीवनसूत्र होते:
"मनुष्य धर्म परमोच्च धर्म"
ती मला नेहमी आग्रहाने सांगायची—माणसांना कधीही चौकटीत जखडू नकोस, आधी त्यांच्यातील ईश्वरी अंशाला, मानवी आत्म्याला साद घाल. कोणाविषयीही पूर्वग्रह बांधण्याआधी माणसाला माणूस म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न कर, ही तिची शिकवणच आज माझ्या साठी अनमोल आहे.
प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यावर तिने गोविंदाग्रजांची ‘प्रेम आणि मरण’ ही भावस्पर्शी कविता माझ्यासमोर उलगडली.
तिने अत्यंत हळुवारपणे समजावून सांगितले की, प्रेम आणि मरण हे एकाच धाग्याचे दोन पदर आहेत—निःस्वार्थ प्रीती आणि अहंकाराचे संपूर्ण विसर्जन माणसाला मृत्यूच्या भीतीत लोटत नाही, तर त्या महाप्रवासाकडे एका शांत, समाधानी आणि सहज लयीत घेऊन जाते.
तिने दिलेला सर्वात सात्त्विक आणि चिरंतन मंत्र माझ्या अंतःकरणात कोरला गेला आहे:
"आयुष्याचा परमोच्च शेवट शून्य अहंतामध्येच सामावलेला असतो." Life concludes with zero ego.
हे शब्द तिने केवळ उच्चारले नाहीत, तर मनात कुठलीही कटुता, क्लेश अथवा अढी न बाळगता, अत्यंत धीरोदात्तपणे, शांत चित्ताने आणि असीम सन्मानाने तिने या नश्वर जगाचा निरोप घेतला.
हजारोंसाठी ती एक विचारवंत, समुपदेशक आणि लेखिका असेल; पण माझ्यासाठी माझी मम्मी च राहील.
"घरातील प्रत्येक कोपरा आज शांत आहे,
तिच्या नसण्याने जणू वेळच थांबली आहे.
पण तिच्या आठवणींचा सुवास अजूनही दरवळतोय,
जो मला पुढे जाण्याची ताकद देतोय."


Comments