top of page
Search

माझ्या प्रिय मम्मीस, शेवटचा प्रणाम

Writer: anaghaprabhudesai6
anaghaprabhudesai6
Aug 12
2 min read

मम्मी, तु अचानक अशी सोडून जाशील असं कधीच वाटलं नव्हतं. तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरून निघणार नाही.

तु फक्त माझी मम्मी नव्हतीस, तर माझा संपूर्ण आधार होतीस. संकटसमयी पाठीशी उभी राहणारी माझी ढाल होतीस. लहानपणापासून तु माझ्यासाठी घेतलेले कष्ट, केलेले संस्कार आणि दिलेले अथांग प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या सुखात सुखावणारी आणि माझ्या दुःखात ढसाढसा रडणारी तु एकमेव होतीस.

तुझ्या लेखणीची आणि कर्तृत्वाची उंची मोजणे शब्दांच्या पलीकडचे आहे. दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवून जवळ जवळ १०० पुस्तकांचे लेखन करणे ही केवळ एक साहित्यिक उपलब्धी नाही, तर तुझ्या अथांग ज्ञानाची साक्ष आहे. एका बाजूला सरदार पटेलांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा इतिहास आणि महाराष्ट्रातील शूर योद्ध्यांची शौर्यगाथा तु तुझ्या साहित्यातून जिवंत केलीस; तर दुसऱ्या बाजूला कौटुंबिक समुपदेशक (Family Counsellor) म्हणून विस्कटलेले संसार पुन्हा जोडून हजारो कुटुंबांना नवजीवन दिलेस.

तुझ्या शब्दांनी नेहमीच आमच्या आयुष्याला एक सुंदर आकार दिला. तुझे मराठी आणि गुजराती भाषेवरचे प्रभुत्व केवळ तुझ्या लेखनातच नाही, तर आमच्या संस्कारांतही उतरले आहे. एका बाजूला मराठी भाषेतील संथ, हळवा गोडवा आणि दुसऱ्या बाजूला गुजराती भाषेतील जिव्हाळा आणि आत्मीयता—या दोन्ही संस्कृतींचा सुंदर संगम तु तुझ्या लेखनातून आणि व्यक्तिमत्त्वातून आम्हांला दाखवलास. आमच्यासाठी तु लिहिलेले सर्वात सुंदर महाकाव्य म्हणजे तुझे आई असणे.तू शब्दांची किमयागार आहेस. तुझा हा साहित्याचा वारसा, तुझी दोन्ही भाषांवरील माया आणि तुझे विचार आमच्या हृदयात नेहमीच जिवंत राहतील.

तु केवळ कागदावर इतिहास लिहिला नाहीस, तर अनेकांच्या आयुष्यात प्रेमाचे नवे पैलू जोडले. तुझ्या शब्दांमध्ये इतिहास जिवंत करण्याचे सामर्थ्य आहे आणि तुझ्या स्वभावात तुटलेली मने सांधण्याची माया आहे. तु आम्हांला केवळ जगणे शिकवले नाहीस, तर एक आदर्श आयुष्य कसे असावे याचा वस्तुपाठ दिलास. तुझा हा साहित्याचा आणि समाजसेवेचा वारसा आमच्यासाठी सर्वात मोठी पुण्याई आहे.

आज तु डोळे मिटले आहेस, पण तुझे शब्द, तुझा तो मायेचा स्पर्श आणि तुझा हसरा चेहरा माझ्या मनात नेहमी जिवंत राहील. तु शिकवलेल्या मार्गावर चालून मी एक चांगली व्यक्ती बनण्याचा नक्की प्रयत्न करेन.

मम्मी, तु जीथे कुठे असशील, तीथे तुला शांती मीळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढच्या जन्मीही मला तुच मम्मी म्हणून मिळावी, हीच माझी एकमेव इच्छा आहे.

तु मार्गदर्शक आहेस, तु आमची प्रेरणा आहेस.

तुझी खूप आठवण येईल मम्मी... खूप खूप मिस करेन तुला!

 

तुझीच ठुम्मी (Swati Bhagwat / Anagha Prabhudesai)

 
 
 

Recent Posts

See All
Mummy!

माझी मम्मी खरे सांगू तर, अशी वेळ इतक्या लवकर येईल असे कधी वाटलेच नव्हते. जुलै आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये सासरे आणि पप्पा या दोन्ही पितृतुल्य छत्रछाया अचानक हरपल्या; पण 'मम्मी पाठीशी आहे' हा एक मोठा वि

 
 
 

1 Comment


prabhudesai.shrikant
Aug 14

So Sad.We All are with you.May her Soul Rest in eternal peace Take care

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page