top of page
Search

Adhik Maas

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Sep 17, 2020
  • 4 min read

Updated: Sep 18, 2020

महत्व अधिक महिन्याचे!


सामान्यपणे भाद्रपदातील पितृपक्षातील सर्व पितरांच्याअमावास्येनंतर अश्विन महिना सुरू होतो. तो घटस्थापनेचा दिवस! आणि मातामह श्राद्धाचाही! पित्याच्या सर्व पूर्वजांचा आदर व्यक्त करणारे दिवस वर्षभरात वारंवार येतात. पण आईच्या पित्यास सन्मान देण्याचा हा एकच दिवस असतो. यंदा भाद्रपद अमावास्येनंतर अश्विन प्रतिपदा नाही. कारण यंदा आहे अश्विन अधिक मास! अधून मधून अधिक मास का येतो? इंग्रजी तारीख आणि महिन्याप्रमाणे का आपल्या महिन्यांच्या तारखा त्याच नसतात? आज अश्विन अधिक सुरू होत असल्याने, याचे कारण जाणून घेण्यात औचित्य आहे.


चंद्रास पृथ्वीप्रदक्षिणेसाठी प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत २८ ते ३० दिवस लागतात! त्यास म्हणतात चांद्र मास! चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते! पृथ्वी सूर्याभोवती ३६५.२५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यास म्हणतात सौर वर्ष! दरवर्षी दोन्ही प्रकारच्या कालगणनेत ११ दिवसांचा फरक पडतो. प्राचीन शास्त्रकारांनी हा फरक भरून काढण्यास ३२ महिने १५ दिवसांनी एक चांद्र मास अधिक धरण्याची भलावण केली. त्या महिन्यास पुढील चांद्रमासाचे नाव देण्याचीही! यंदा अधिक अश्विन आहे. पुढे १९ वर्षांनी पुन्हा अश्विन अधिक मास असेल चैत्र ते अश्विन आणि क्वचित फाल्गुन मास अधिक येतो. कारण तेव्हा सूर्यास एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास ३० दिवसांहून कमी वेळ लागतो. तेराव्या चांद्रमासात सूर्य संक्रमण करत नाही. म्हणून या अधिक मासास काही लोक मलमास म्हणतात. अधिक महिन्याचा स्वामी भगवान श्रीकृष्ण असल्याने त्यास पुरुषोत्तम मासही म्हणतात. या संदर्भात माझी गोष्टीवेल्हाळ आई - अम्मा मोहक अख्यायिका सांगत असे.


एकदा साऱ्या चांद्र महिन्यांची सभा भरली. त्यात अधिक महिन्यास निमंत्रण नव्हते. यास नजरचूक समजून भोळा अधिकमास सभेस गेला. सर्वांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. भोळ्या अधिकमासास हा अपमान कळला नाही. त्याने चर्चेत सामील होण्याचा प्रयत्न केला. साऱ्यांनी मलमास म्हणत त्यास हिणवले. आपापल्या कालखंडातील सण-वार नि व्रत-वैकल्ये सांगून त्याच्यासमोर टेंभा मिरवला. अधिक महिन्यास स्वतःचे नाव नाही. म्हणून त्यास पुढच्या महिन्याच्या नावाचा टेकू घ्यावा लागतो, असे म्हणत सर्वांनी त्याची कुबड्या घेणारा मास म्हणत चेष्टा केली. काहींनी त्यास सहस्त्रचंद्र दर्शनाच्या विधीत मलमासातील पौर्णिमा जमेस धरत नाहीत, असे सांगून त्याचा उपमर्द केला. सारे त्यास हसले. कुणी 'मल' शब्दाचा अर्थ सांगून नाक मुरडले! त्यामुळे अधिक महिना फार दुखावला.


घटना जुनी झाली तरी त्याची जखम भळभळत होती. त्यामुळे तो दिवसेदिवस रोड होत गेला. त्यात त्याची रया गेली. हे भगवान श्रीकृष्णास जाणवले, त्यांनी त्यास याचे कारण विचारले. उपेक्षेने घायाळ झालेल्या अधिक मासाची वेदना शब्दात भळभळू लागली...


"प्रभू, मला स्वतंत्र नाव नाही. म्हणून सारे मला पुढच्या महिन्याच्या नावाचा टेकू वा कुबड्यांची गरज पडते, असे म्हणून हिणवतात. माझ्यात नाही सण की व्रत-वैकल्य! 'मल' शब्दाचा अर्थ सांगून मला सारे हीन लेखतात. मला जीव द्यावासा वाटतो, प्रभू! पण ईश्वरेच्छेविना तेही होत नाही. हे मला किती असह्य वाटत असेल, याचा विचार करा नि मग मी का रोडावलो, असे विचारा! मला स्वतंत्र नाव द्या वा नामशेष करा! प्रभू यास कृपया अपमान समजू नका. हा आहे घायाळ मनाचा आक्रोश! चित्कार! म्हणून माझी इच्छा वाजवी ठरवा!"


अधिक मासाची दुःखद कैफियत ऐकून भगवान श्रीकृष्ण हेलावलेे. ते आश्वासक स्वरात म्हणाले, "तुझे अस्तित्व चंद्र-सूर्याच्या वर्तनातील फरकामुळेआहे. त्यामुळे तेे नष्ट नाही होऊ शकत! तुला स्वतःची ओळख देण्याचा मात्र मी अवश्य विचार करणार आहे. त्यासाठी मी सर्व महिन्यांची सभा भरवणार आहे. त्यात चंद्र-सूर्याच्या वर्तनामुळे चुकलेले दिवसांचे गणित सुधरविणारा महिना,असा मी तुझा गुणगौरव करीन! तुझ्या महिन्यात व्रत-वैकल्यासाठी विशिष्ट दिवशी नव्हे तर प्रत्येक दिवशी मानव पुण्यसंचय करील. सहस्त्रचंद्र दर्शनाचा विधी पोकळ उपचार करणारे लोक कधीही चंद्रदर्शन घेण्याची तसदी घेत नाहीत, अशा लोकांनी तुझा समावेश न केला तरी तू हिरमुसू नकोस! तुझ्या प्रत्येक दिवसावर माझी कृपादृष्टी असल्याची खात्री बाळग आणि खंगणे सोड!"


दिल्या शब्दास जागून श्रीहरीने लवकरच सर्व महिन्यांची सभा बोलावली. अधिक महिन्यास सभास्थळी येताना पाहून इतर महिन्यांनी त्यास अगांतुक लोचट ठरवले. पण अधिक महिन्याचे स्मित विरसले नाही. म्हणून साऱ्यांना नवल वाटले. ठरल्यावेळी श्रीहरींचे आगमन झाले. त्यांनी सभेचा उद्देश सांगितला. अधिक मासाचे महत्व सांगून त्यास चंद्र-सूर्याच्या फरकास सुधरवणारा मास, म्हणत त्याचा गौरव केला. अधिकमासास स्वतःचे नाव दिेले. आपले नाव प्राप्त केलेल्या अधिक महिन्यात - पुरुषोत्तममासात मोजके दिवस सण साजरा करण्यासाठी नसतील. व्रत करून पुण्य प्राप्त करण्याचे मोजके दिवसही या महिन्यात नसतील. पुरुषोत्तममासाचा प्रत्येक दिवस पुण्य संचय करण्यास समर्थ असेेल, अशी त्यांनी घोषणा केली. श्रीहरीचे कथन ऐकताना अधिक मासाची चर्या आगळ्या तेजाने झळाळत होती. तरीही त्यात अहंकाराचा उद्भव झाला नाही. तो नतमस्तक होऊन श्रीकृपा आत्मसात करत होता. ते पाहून भगवान श्रीकृष्णांनी अहंकाराचा उद्भव नसलेल्या अधिक मासाचे खूप कौतुक केले. त्या महिन्यात अहंकार गळून जावा, अशा सच्छिद्र पदार्थाचे दान करण्याचे महत्व विशद केले.


सभेत प्रवेश करताच झालेल्या टोमण्यांच्या वर्षावाने अधिकमासाचे स्मित का विरसले नाही, याचा सर्वांना उलगडा झाला. सर्वांनी भगवान श्रीकृष्णाच्या कथनास मान देऊन त्याच्या नव्या नावासाठी आदर व्यक्त केला. तेव्हापासून सुजाण लोक अधिक मासास पुरुषोत्तममास म्हणू लागले.


तोवर लोक जावयास दशमग्रह म्हणत. कारण बहुसंख्य जावयात अहंकाराचा ताठा असे. लाडक्या लेकीस तसेच तिच्या पित्यास तो बोटावर नाचवत असे. अधिक महिन्यास पुरुषोत्तम मास नाव मिळाल्यावर या अहंकारावर जणू सर्वांना उपाय सापडला. मग जावयास दशमग्रह न म्हणता ते लाडक्या लेकीचा रमण म्हणू लागले. त्यास विष्णुचे रुप समजून सच्छिद्र खाद्यपदार्थ (अनारसे, म्हैसूरपाकाच्या वड्या, वगैरे) देऊ लागले. या पदार्थातील छिद्रातून जावयाचा अहंकार, मीपण वगैरे अनिष्ट वृत्ती गळून पडाव्यात अशी इच्छा सूचक रीतीने व्यक्त करू लागलेे.


अख्यायिकेचे कथन संपवून सुजाण अम्मा म्हणत असे, "अख्यायिकेत सत्य नसले तरी त्यातील विचारात तथ्य अवश्य असते! ते आदेशाच्या रुपात सांगितले तर परिणाम साधू शकत नाही. कारण आदेश कुणी आनंदाने ऐकत नाही. पण कथा-कहाण्या रसपूर्वक ऐकल्या जातात, ही जनसामान्यांची मानसिकता विचारात घेऊन आपल्या पूर्वजांनी अनेक तथ्य अख्यायिकेत गुंफली."


अशा आपल्या चतुर आणि ज्ञानी पूर्वजांना मनःपूर्वक अभिवादन करून आपण पुरुषोत्तम महिन्याचे स्वागत करू!

शुभम् भवतु

🤔🌹🙏🙏🙏

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

3 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Oct 07, 2020

नमस्कार

प्रकृतीची काळजी घेणे चालू असताना तुम्ही प्रतिक्रिया दिलीत यासाठी प्रमोदजी मला फार आनंद झाला. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छामुळे लेखन चालू राहते, अशी माझी भावना आहे. माझे वडील म्हणत की सुजाण आणि सच्च्या वाचकांचा सिंहाचा वाटा असतो, हे कधी विसरू नकोस. ते मला पटते.

Like

tendulkarp
Oct 06, 2020

अधिक महिन्याबद्दल लहानपणापासून आमच्या आईकडून ऐकत आलो आहे. कारण सर्वपित्री अमावस्या आली

की ती शिधा एका ताटात काढून मला मागील दरवाज्यात ठेवायला सांगून त्या ताटाची थोडक्यात पूजा करायला सांगायची. नमस्कार करून झाल्यावर ताटातील तो शिधा मी आमच्या भटजींना (गुरुजींना) त्यांच्या घरी नेऊन देत असे. त्यावेळी तीने सांगितलेले एव्हढेच लक्षात आहे की हा शिधा ज्या स्त्रीला नवरा आणि मुलगा आहे तिने मुलाकडून म्हणजे नातवाने आजोबांना (आईच्या पित्याला) अर्पण करायचा असतो.


स्मिताताईंच्या या लेखाद्वारे सखोल माहिती मिळाली. त्यांनी लिहिलेली माहिती म्हणण्यापेक्षा प्रत्येक सणाचे किंवा विधीचे महात्म्य अभ्यासपूर्ण सर्व सामान्यांना समजेल अशा भाषेत लिहिलेलं असतं म्हणून ते जास्त वाचनीय असतं. पुराणातील आख्यायिकांच्या मागे काहीतरी सार दडलेलं असतं. त्याला काही तरी अर्थ असतो.


प्रमोद तेंडुलकर

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Sep 18, 2020

पुरुषोत्तम मासाचे महत्व सामान्य लोकांना समजवायचे काम

आख्यायिकेने छान रीतींने केले आहे. अधिक मास का उध्दभवतो ते छान रीतींने

सांगितलं आहे.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page