Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!
- Smita Bhagwat
- Apr 26, 2021
- 3 min read
Updated: Apr 27, 2021
आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू पावलेल्यांची असते. सप्तचिरंजीवात हनुमानाचा समावेश होतो. म्हणजेच त्यास मृत्यू नाहीो. म्हणून चैत्र पौर्णिमेस हनुमान जयंती नव्हे तर हनुमान जन्मोत्सव म्हणणे ते योग्य ठरवत. हनुमंतास ज्येष्ठ रामदास आणि स्वतःस कनिष्ठ रामदास म्हणवत. कारण...
राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञज्वाळातून प्रगट होऊन अग्निने त्यास पायसदान दिले. हा प्रसाद त्याने आपल्या तीन राण्यांना द्यावा, असा आदेश असल्याने दशरथराजाने पायस तीन द्रोणात विभागले. कौसल्या ज्येष्ठ राणी! त्याने प्रथम तिला प्रसाद दिला. म्हणून स्वतःस राजाची सर्वाधिक प्रिय राणी समजणारी कैकयी रुसली. प्रसादाचे सेवन न करता तिने तो द्रोण बाजूस सारला. तेव्हढ्यात एक घार आली. ती चोचीत द्रोण घेऊन उडाली. आकाशगामिनी घारीच्या चोचीतून द्रोण निसटला. तो नेमका ऋष्यमुक पर्वतावर तप करत असलेल्या अंजनीच्या ओंजळीत विसावला. त्यास शिवप्रसाद समजून अंजनीने पायस प्राशन केले. अंजनी केसरी नावाच्या वानराची देखणी पत्नी! सख्यांसह वनविहाराचा आनंद लुटत असताना, तिला पंचमहाभूतातील पवन उर्फ वायू वा मरुताने बघितली. तो तिच्या रुपावर भाळला. तिचे वस्त्र उडवून अदृश्य रुपात त्याने तिचा संग उपभोगला. अंजनीच्या पतीने तिला शक्तिमान संततीच्या प्राप्तीसाठी शिवाचे तप करण्याचा सल्ला दिला. तशी ती ऋष्यमुक पर्वतावर तप करत होती. अशी अख्यायिका आहे.
दशरथ राजास प्राप्त झालेले पायस प्राशन केलेल्या अंजनीने चैत्र पौर्णिमेस सूर्योदयाच्या सुमारास पुत्र प्रसवला. नवजात बालक अत्यंत सुदृढ! सुवर्णाची जन्मदत्त लंगोटी लेवून जन्मलेले! अंजनी हे आक्रित डोळे विस्फारून बघत राहिली. लगेच तिला बाळास भूक लागली असेल, असे वाटले. ती स्तनपानास सिद्ध झाली. पण बाळ उगवत्या सूर्याकडे एकटक बघत होते. लालचुटूक सूर्यबिंब त्यास पक्व फळ वाटले. ते फळ खाण्यास उत्सुक झालेले बाळ सूर्याकडे झेपावले. बाळाने सूर्यास गिळले तर समग्र विश्वात हाहाःकार माजेल, हे जाणवून इंद्राने ते टाळण्यास वज्र उगारले. ते अंजनीसुताच्या हनुवटीस लागून बाळ बेशुद्ध पडले. इंद्राचे वज्र हनुवटीस लागले म्हणून ते हनुमान नाव पावले. माता अंजनीचा पुत्र म्हणून आंजनेय, जन्मास वायू - मरुत कारण ठरल्याने मारूती आणि अंजनीचा पती केसरी असल्याने त्यास केसरीनंदन असे विविध परिचय लाभले. शंकराचा अंश असलेल्या या वायुपुत्राने दोन प्रतिज्ञा केल्या. एक ब्रह्मचारी राहण्याची आणि दुसरी सुवर्णाची जन्मदत्त लंगोटी ओळखणाऱ्याचे आजन्म दास्य करण्याची! त्यानुसार तो श्रीरामाचा दास झाला. रामभक्त म्हणून प्रतिष्ठा पावला. वानर असल्याने कपिश्रेष्ठही!
हनुमान आणि श्रीरामाचे नाते अजोड आहे! रामक्षेत मारुतीच्या सामर्थ्याचे वर्णन करताना त्यास जितेंद्रियम् बुद्धिमताम् वरीष्ठम् म्हटले आहे. श्रीरामाविषयी हनुमंताने म्हटलेला एक श्लोक अत्यंत सूचक आहे. "देहेदृष्ट्या तु दासोsहं । जीवदृष्ट्या त्व दंशकः । आत्मदृष्ट्या त्वमेवा sहं । इति मे निश्चिता मती।।" म्हणजे 'हे श्रीरामा, देहदृष्टीनेे मी तुझा दास आहे! जीवदृष्टीने मी तुझा अंश आहे! पण आत्मदृष्टीने तू आणि मी एकच आहोत!' दासाची भूमिका सेवाभक्ती हनुमंताच्या सेवाभावात संपूर्ण समर्पण आहे! 'देव शोधाया गेलो, तो देवचि होऊनि गेलो,' अशी त्याची अवस्था आहे. म्हणून ....
राम-रावण युद्धात मारुतीचा होता सिंहाचा वाटा ! त्यानेच सीता कुठे आहे, ते शोधले. तिला श्रीरामाची मुद्रिका देऊन आश्वस्त केले. लक्ष्मणास मरणप्राय मुर्छा आली तेव्हा द्रोणागिरी आणून त्याचे प्राण वाचवले. अनेकांना संकटातून मुक्त करणारा म्हणून तो संकटविमोजक वा संकटहरण नाम मिळाले. खुद्द श्रीरामावर एकपत्नी व्रताचा भंग होण्याचे आरिष्ट ओढवले तेव्हा ते मारुतीनेच दूर केले. म्हणून श्रीरामाने त्यास चिरंजीवित्वाचे वरदान दिले. कलियुगात जिथे रामसंकीर्तन असेल तिथे कोणत्या ना कोणत्या रुपात उपस्थित असू शकण्याचा अनोखा वर दिला. पुढे द्वापारयुगात भीम वायुपुत्र असल्याने मारुती त्याचा ज्येष्ठ भ्राता आहे, असे समजण्यात येते.
महाराष्ट्रात समर्थ रामदास स्वतःस कनिष्ठ रामदास आणि मारुतीस ज्येष्ठ रामदास समजत. म्लेंच्छांच्या राजवटीत महाराष्ट्राने गमावलेली अस्मिता जागृत करण्यास समर्थांनी विविध प्रयत्न केले. त्यात अकरा मारुतींच्या निर्मितीचा (शहापुर एक, मसूर एक, चाफळ तीन, उंब्रज एक, माजगाव एक, बाहे एक, मनपाडळे एक, शिराळे एक.) महत्वपूर्ण हिस्सा आहे. जनसामान्यांच्या मनात बळाच्या उपासनेची संकल्पना ठसवण्यासाठी त्यांनी सोप्या मराठी भाषेत मारुती स्तोत्र लिहिले. भीमरुपी महारुद्रा.... हे स्तोत्र साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी लिहिले असूनही अजून खूप घरात रामरक्षेसोबत म्हणण्यात येते. मारुतीची पूजा म्हणजे बळाची उपासना, असे सांगून त्यांनी अनेक बलोपसाना केंद्रे निर्माण केली. ती शिवाजीराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या भावि इमारतीस पक्क्या विटा पुरवणारे कारखाने ठरली. म्हणून महाराष्ट्रात या देवतेची श्रद्धेने पूजा होते.
श्रीरामाच्या आणि मारुतीच्या जन्मास दशरथ राजास प्राप्त झालेल्या पायसदानाचा अंश कारण ठरला. म्हणून सश्रद्ध लोक चैत्र पौर्णिमेपर्यंत रामोत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात गावोगावी पेढ्या मारुती, पंचमुखी मारुती, भिकारदास मारुती, पत्र्या मारुती..... अशी अनेक मंदिरे आहेत.
अशा हनुमानाचा आज जन्मोत्सव! म्हणून या भक्तश्रेष्ठाच्या शक्तीचा अंश प्राप्त करण्यास प्रभू रामचंद्राकडे विनम्र याचना करताना उभयतांचा जयजयकार करू. 'सीयावर रामचंद्रकी जय। पवनसुत हनुमानकी जय।।'
शुभम् भवतु.


Comments