Atharvashirsha & Gautam Buddha.
- Smita Bhagwat
- Aug 31, 2020
- 3 min read
Updated: Sep 1, 2020
विष्णुचे दशावतार आणि अथर्वशीर्ष संबंध !
वेदात वर्णन केलेल्या दशावतारात उत्क्रांतीवादाची संकल्पना आहे. जलचर मत्स्यावतारापासून सुरूवात करून मानवावतारात चढत्या क्रमाने द्वापरयुगातील राजकारणी श्रीकृष्णापर्यंत पोहोचल्यानंतरचा अवतार प्रबुद्ध मानवाचा! भगवान गौतम बुद्धाचा! या प्रबुद्ध अवतारातही भगवान श्री विष्णुने अथर्वशीर्षातील विचार पुढे नेला असल्याचेे सूचित करणारा एक प्रसंग आज विशद करायचा आहे.
एकदा बुद्धदेवांच्या शिष्याचा मुलगा त्यांना वंदन करून म्हणाला, "तातश्रींना उर्ध्व लागला असताना मला सहा दिशांचे पूजन कर, म्हणाले. चार दिशा मी जाणतो, असे सांगून मी त्यांना उरलेल्या दोन दिशा कोणत्या ते विचारले. पण त्यांच्याने बोलवेना. आपले नाव उच्चारून त्यांनी डोळे मिटले. मला पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यास आपणच मदत करा!"
"अवश्य! पित्याच्या आज्ञेचा शाब्दिक अर्थ घेऊ नकोस! त्यांनी सुचवलेल्या पूजनाचे स्वरूप धूप, दीप आरती... असे सीमित नाही. सहा दिशांचा उल्लेख श्रीगणेशाच्या अथर्वशीर्षात आहे. तो गूढार्थ जाणून घे!" भगवान बुद्धांची पुनित वाणी ऐकण्यास त्याने कान टवकारले. बुद्धदेवांचा प्रत्येक बोल तो अस्तित्वाची ओंजळ करून ऐकू लागला.
"पहिली दिशा पूर्व! सूर्य उगवतो ती वाच्यार्थाने पूर्व! तुझ्या पूर्वी जन्मलेले तुझे जन्मदाते! तुझे पालनपोषण, शिक्षण करणारे! तुला उत्तम संस्कार देणारे! ते वृद्ध झाले की त्यांची स्थूल पूजा करायची नसते. तसा तू पित्याशी चांगला वागला आहेस. तरी तुला सांगतो की या पूजेचे पाच पैलू आहेत. वृद्ध जन्मदात्यांचे भरण-पोषण करणे, परंपरेने मिळालेला वारसा जपणे, त्यांची मरणचाकरी नीट करणे आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या नावे गरजूस दान-धर्म करणे! अशी ही पूजा!"
"पश्चिम दिशा म्हणजे गृहस्थाश्रमी पुरुषाची पत्नी! ती पतीची जबाबदारी असते! त्याचा घरसंसार निगुतीने सांभाळते. पतीचे जन्मदाते, भावंडे, मुलेबाळे आणि पाहुण्याची सेवा करते. म्हणून पतीच्या वर्तनातून कृतज्ञता व्यक्त व्हावी. तीच पश्चिमेची पूजा! या पूजेचेही पाच पैलू! पत्नीस लक्ष्मीस्वरूप समजून मानाने वागवणे, तिचा इतर कुणी अपमान करू नये, यासाठी सतर्क असणे, घरच्या व्यवहारात लुडबूड न करणे, तिच्या देहमनाची काळजी घेणे आणि एकपत्नीव्रत आचरणे ही पश्चिमपूजा!"
"मानवी जीवनात मित्रांचे स्थान अनन्य! संकटकाळी ते सर्वार्थाने पाठबळ पुरवतात. मित्र म्हणजे उत्तर दिशा! या पूजेसही पाच पैलू! प्रसंगोपात मित्रास योग्य भेटवस्तू देणे, मित्राशी प्रेमाने वागणे, त्यास मदतरूप होणे, त्यास आपल्याहून हीन न समजणे आणि मनात मित्राविषयी निर्मळ भाव ठेवणे ही उत्तर दिशेची योग्य पूजा!".
"दक्षिण दिशा गुरुची! दक्षिण दिशेस प्रणाम म्हणजे गुरुदेवास वंदन! विद्यादान, शिष्याचे जगणे जिणे होऊ न देता त्यास जीवन बनवण्यास मदत करणे, शिष्यास सदाचार शिकवणे... अशी अनेक महत्वाची कार्ये गुरू लिलया पार पाडतात. गुरुपूजेचेही पाच पैलू! गुरू येताच त्वरीत उभे राहून त्यांचा सन्मान सूचित करणे, त्यांच्या आज्ञेचे पालन करणे, गुरुने प्रदान केलेली विद्या आदराने आत्मसात करणे, गुरुदेवांचे काम स्वतः करणे, गरजेवेळी त्यांची शुश्रुषा करणे, सारे आत्मीयतेने करणारा शिष्य दक्षिण दिशेची पूजा करण्यात यशस्वी होतो!"
"वेदांचे लेखन करणाऱ्या ऋषी-मुनींना ईश्वर किंवा निसर्गातून ज्ञान प्राप्त झाले. त्यानुसार आर्य म्हणजे सुसंस्कृत आणि अनार्य म्हणजे असंस्कृत अशी संज्ञा तयार झाली. अशा आर्यांनी पाचव्या दिशेचा मान मस्तकावरील अथांग आकाशास दिला. आर्यांना आकाश ही व्यापक दिशा वाटते! सामान्य मानवापेक्षा साधु-संतांचे स्थान उच्च! ते मानवीजीवनाचे उर्ध्वीकरण करतात. कल्याणकारी मुक्तीमार्ग दाखवतात. साधु-संतांच्या पूजनाचेही पाच पैलू! मन, वाणी आणि कर्माद्वारे त्यांचा आदर करावा. निखळ प्रेम असेल तिथे ते सहज होते. या आदराची पाळे-मुळे खोल असावी. दंभमुक्त मनाचा जन्म सत्संगात होतो. समाजाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता ते समाजास भरभरून देतात त्यांच्या विषयी आदर बाळगणाऱ्या व्यक्तीचे उर्ध्वीकरण आपसूक होते. साधु-संतांची सेवा करणे नि आपत्कालात त्यांना मदत करणे ही पाचव्या दिशेची - अथांग आकाशाची पूजा!"
"मस्तकावरील दिशा आकाशाची तर पायाखालील दिशा धरणीची! खालच्या वर्गाची! म्हणजे नोकर चाकरांची! ते मालकाची मनापासून चाकरी करतात. मालकापूर्वी उठून मालक झोपल्यावर निजतात. यासाठी मालकाने क्रियाशील कृतज्ञ असावे. त्यांना हीन न समजता कुटुंबातील सदस्य समजावे. त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था नीट करावी. प्रसंगोपात त्यांच्या कामाची कदर करावी. हे सारे करणारा सहाव्या दिशेची पूजा करतो. सर्वत्र देव बघण्याच्या वृत्तीचे वर्णन करताना संस्कृत अथर्वशीर्षात म्हटले आहे... अव पश्चात्तात, अव पुरस्तात, अव दक्षिणातात, अव उत्तरातात, अव चोर्ध्वातात, अव धरातात. सर्वतोमां पाहि पाहि समंतात.... अशा रीतीने सहा दिशांचे पूजन करणारा भवसागर यशस्वीपणे पार करतो!"
प्रबुद्ध मानवावतारातील भगवान विष्णू उर्फ बुद्धदेवांची अमृतवाणी ऐकून तृप्त झालेल्या बुद्धशिष्यपुत्राने अत्यंत लीनपणे वंदन करून बुद्धदेवांचा निरोप घेतला.
आज अनंत चतुर्दशी! श्री गणेशास वंदन करून त्यांना निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती करण्याचा दिवस! या वैचारीक जागराावर स्वल्पविराम ठेवण्याचाही!
शुभम् भवतु



वाह! तुझे हे सगळे लेख वाचून नवीन पिढीच्या श्रद्धेस विश्वास लाभेल असे वाटते! गणपती बापा मोरया!