Concept Of Chandani Padava.
- Smita Bhagwat
- Oct 26, 2020
- 3 min read
Updated: Oct 26, 2020
चंदनी वा चांदणी पाडव्यापर्यंत महादेवीचा वैचारिक जागर !
गुजरातच्या सागर किनाऱ्यावर वसलेली प्रजा महादेवीचा जागर कोSजागरती हा प्रश्न विचारून शरद पौर्णिमेपर्यंत वैचारिक जागर करते. मग वद्य पाडव्यास चंदनी वा चांदणी पाडव्याचा मान देऊन सागरकिनारी वैचारिक जागराचे पारणे करते. ते स्मरून आपण इथे तोवर महादेवीचा सण साजरा करणार आहोत. मात्र देवदेवतांना स्वतःहून अधिक भक्ताचे कौतुक असते, हे सूचित करणारी दीर्घकथा इथे क्रमशः सादर होणार आहे.
महानिर्मितीसाठी महानिर्वाण.
एकाकी निर्धन आयुष्यास कंटाळून ब्रह्मदत्त बौद्ध धर्माची दीक्षा घेण्यास जात होता. हा विचार त्यास फारसा पटला नसल्याने फरपटत्या चालीने नालंदास जाणे होत होते. ब्रह्मदत्त भलेपणापायी समस्यात अडकलेला सज्जन जीव! सम्राट अशोकाने बौद्धधर्माचा अंगीकार केल्यापासून बौद्धधर्मियांना अनेक सवलती मिळू लागल्याा. विद्यार्थ्यांची फुकट राहण्या-जेवण्याची सोय होत असे. त्ल्यायामुळे बेरकी लोक बौद्धधर्म स्वीकारून आयते भोजन मिळवत आळसात जगू लागले होते. त्यांना ना वेदधर्माचे ज्ञान होते की बौद्धधर्माविषयी आदर! ब्रह्मदत्तानेही दारिद्र्यामुळे बौद्धधर्म स्वीकारण्याचा विचार केला असला तरी तो आळशी नव्हता. दीक्षा घेतल्यावर बौद्धविहारात धर्माभ्यास करून गावोगावी धर्मप्रसार करावा लागतो, हे त्यास ठाऊक होते. तो प्रामाणिकपणे ते करणार होता. बौद्ध विहारात भिख्खुंची सोबत आणि जेवण मिळणे त्यास समस्यांचे निराकरण वाटत होते, म्हणून! तरी हा विचार सुखद वाटत नसल्याने त्याच्या चालीत नव्हता वेग की उत्साह!
पाय नालंदास जात असले तरी मन अतीत सावडत होते. तो वारणासीच्या वकुबहीन बापाचा ज्येष्ठ पुत्र! त्याचे पणजोबा ब्रह्मदत्त नामवंत शिल्पकार! पण त्यांचा पुत्र आणि पौत्र यात ते कसब नव्हते. ते मंदिराच्या धर्मशाळा नि ओवऱ्या बांधण्यास लागणारे फत्तर फोडत. ब्रह्मदत्तच्या आजोबांना नातवाची लांबसडक बोटे पाहून वडील आठवले. त्यांनी हौशीने पौत्राचे नाव ब्रह्मदत्त ठेवले. खरोखर तो इवल्या हाताने मातीची सुबक खेळणी नि मूर्ती बनवू लागला. नातवाचे पाळण्यातले पाय पाहून त्यांना आनंद होई. ज्या मंदिराच्या निर्मितीसाठी आपण फत्तर फोडले त्या मंदिरात पौत्राने निर्माण केलेली मूर्ती स्थापित व्हावी, अशी त्यांची मनीषा! ते स्वप्न पुत्राच्या डोळ्यात रेखून त्यांनी देह ठेवला. परवडत नसून ब्रह्मदत्तच्या पित्याने त्यास शिल्पशाळेत घातले. पण गरीब पाथरवटाचे स्वप्न नियतीने पूर्ण होऊ दिले नाही. ब्रह्मदत्ताचा पिता फत्तर फोडताना पाय घसरून दरीत कोसळला. त्याच्या नि ब्रह्मदत्ताच्या आजोबांच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडाल्या. ब्रह्मदत्ताच्या कोवळ्या खांद्यावर घराची जबाबदारी पडली.
ब्रह्मदत्त शिक्षण थांबवून बापाचे काम करू लागला. सुरुवातीस ते पुरेसे ठरलेे. पण वाढत्या वयाच्या भावंडांची भूक वाढली. त्यांनी श्रमात वाटा उचलला असता तर काम फार कठीण नव्हते. लाडावलेल्या भावंडांना आईने योग्य सल्ला न देता कुटुंबाची जबाबदारी ज्येष्ठाची ठरवली. ब्रह्मदत्ताने नातेवाईकांकडे मदत मागितली. पण कुणी ना मदत केली की त्याच्या आईस धाकट्यांना कामाला लावण्याचा सल्ला दिला. ब्रह्मदत्त दोन पाळ्यात काम करू लागला. दुप्पट काम करून तो घरी येई तेव्हा सारे जेऊन झोपलेले असत. त्यास उरलेले खाऊन वा प्रसंगी पाण्याने पोट भरावे लागे. श्रमलेल्या लेकराचे अर्धपोटी राबणे कुणाला स्पर्शत नसताना, प्लेगची साथ आली. श्रीमंत लोक गाव सोडून गेले. कुटुंबास धड पोसणे न जमणाऱ्या ब्रह्मदत्तास ते जमले नाही. काबाडकष्ट नि प्रसंगी पाणी पिऊन भूक सोसण्याची सवय असल्याने तो साथीतही तगला. त्याच्या जिवावर जगणऱ्यांच्या देहास नव्हती कष्टाची सवय की सहन करण्याची धमक! ब्रह्मदत्ताच्या घरावर मृत्युचा झाडू फिरवून साथीने निरोप घेतला.
घरात शून्यावकाश दाटला. आधी कष्ट होते. आई नि भावंडांच्या उर्मटपणामुळे जीव मेताकुटीस येई. तरी जीवन हेतुपूर्ण वाटे. पण मग शून्यावकाश दाटला. अपार कष्टांची गरज उरली नव्हती. घरात मन रमत नव्हते. म्हणून तो पुन्हा कामाला लागला. पण फत्तर फोडण्याही मन रमेना. शिल्पकलेची आवड खुणावू लागली. मोठ्या कुटुंबास मदत करणे जमले नाही तरी एकट्या व्यक्तीस मदत करणे कुणी जमवील. सज्जन नातेवाईकांच्या घरी काम करत शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण करता येईल, या आशेने तो काही श्रीमंत नातेवाईकांना भेटला. पण त्याचे कष्ट डावलून साऱ्यांनी आग पाखडली. कुणी त्यास कुटुंबाची काळजी घेणे न जमलेला माणूस म्हटले तर कुणी दाहक नजरेने भाजून काढले. एकाने तर स्वजनांचे स्थलांतर न जमवून त्याने कुटुंबाची हत्या केल्याचा आरोप केला. सोशिक ब्रह्मदत्त बिथरला. रीकामे घर भकास वाटत होते. म्हणून ह्रदयशून्य नातेवाईकांना स्वधर्मीय म्हणू नये, असे वाटले. त्यापेक्षा करुणेस प्राधान्य देणारे बौद्धधर्मीय बरे, असा विचार करून त्याने धर्मत्यागाचा निर्धार केला. निरवानिरव करण्याचा प्रश्न नव्हता. घरात चिंध्यासादृश कपडे नि थोडे पिठच होते. मध्यरात्री उठून त्याने साऱ्या पिठाच्या भाकरी केल्या. उपयुक्तता गमावलेली पण त्यास जीव की प्राण असलेली शिल्पकलेच्या अवजारांची पिशवी, भाकरी नि चिरगुटे घेऊन त्याने तिरमिरीत घर सोडले.
क्रमशः


Comments