Devanagari Script.
- Smita Bhagwat
- Aug 30, 2020
- 4 min read
गजाननाची निर्मिती देवनागरी लिपी.
महाभारत लिहिण्यास गणपतीने विशिष्ठ वर्णसंच तयार केला. म्हणून त्यास गणेशलिपी वा गणेशविद्या ही ओळख मिळाली. या लिपीत अ पासून ज्ञ पर्यंत सोळा वळणदार अक्षरात विशिष्ट नाद असल्याने त्याना स्वर म्हणतात. ३३ व्यंजने आणि तीन संयुक्त व्यंजनांनी तयार झालेल्या या ५२ चिन्हसंचास मुळाक्षरे म्हणतात. ० ते ९ पर्यंतचे अंक लिहिताना सुरुवातीला टेकवलेली लेखणी अंक लिहून होईतो उचलावी लागत नाही. ५२ मुळाक्षरांच्या (मूळ+अक्षरे) संचात पुढे सोयीस प्राधान्य देऊन नव्या चिन्हांची भर घालण्यात आली. काहीत विधायक बदल करून सर्व भाषांचे लेखन करण्यास सोयीची लिपी तयार झाली. ५२ मुळाक्षरांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे आणि बाराखड्या निर्माण झाल्या. सर्व चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ ५२ चिन्हांची अक्षर आकार ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जाण होणे पुरेसे असते! भारतीय भाषांसाठी तयार झालेल्या गणेशविद्या आधारित लेखनपद्धती वगळता कोणत्याही लिपीत अशी सोय नाही. मुळात हा वर्णसंच गणपती - देवाने निर्माण केला आहे. म्हणून आजच्या प्रचलित लिपीस देवनागरी लिपी म्हणतात. ही निर्मिती गणपतीहस्ते कशी घडली, या संदर्भात एक आख्यायिका उपलब्ध आहे! महर्षी व्यासांना महाभारत वेगाने लिहिण्यास लेखनिक म्हणून श्रीगणेश हवा होता. त्यांनी गणेशास विनंती केली. गणपतीने ती मान्य केली. पण त्याने लिहिण्यास प्रारंभ केला की लिखाणात खंड पडू नये, अशी अट घातली! म्हणजे महर्षींना अविरत कथन करावे लागणार! कथनात उसंत मिळावी आणि गणेशाची अटही पाळणे व्हावे, यासाठी महर्षींनी युक्ती योजली. ते गणपतीस म्हणाले की, महाभारत लिहिण्यास मानवी शरीराशी संबंध असेल असा नवा वर्णसंच हवा. त्यासाठी स्वतंत्र चिन्हेही हवी. म्हणजे नवी लेखन पद्धत विकसित कर! नव्याने विकसित केलेला वर्णसंच ध्वनीवर आधारित असावा. त्यामुळे उच्चारण आणि लेखनात सुसंगती निर्माण होईल. गणपतीस महर्षींची युक्ती कळली. पण त्यामुळे मानवास मानवी शरीराशी जोडलेला नवीन संच मिळून सर्वांचे कल्याण होणार आहे, हे ही कळले. म्हणून त्याने मनःपूर्वक महर्षींचे म्हणणे मान्य केले!
महर्षीव्यास कथन करत असताना गणपती त्यांच्या उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय निरीक्षण करत असे. कथनात ज्या ध्वनींचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर ही ओळख दिली. ज्या ध्वनींचा संबंध मानवी मणक्यांशी जाणवला, त्यांना त्याने व्यंजने नाव दिले. स्वर आणि व्यंजने आणि व्यंजनांच्या संयोगाने त्याने अनंत जोडाक्षरे निर्माण केली. ती वेगवान लिखाणास उपयुक्त ठरली. मानवी उच्चारांशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यास ही लिपी उपयुक्त ठरली! पंजाबी, बंगाली, गुजराती, उडिया वगैरे वापरातील भाषा तसेच आता वापरात नसलेल्या भारतीय भाषांच्या वर्णसंचात आणि देवनागरी लिपीत साम्य आहे. ही लिपी देवाधिदेव गणेशाने निर्मिली की नाही, यावर आस्तिक-नास्तिक वितंडवाद घालतात. पण ही जगातील सर्वाधिक उपयुक्त लिपी आहे, यात त्यांच्यात वाद नाही. संशोधनाची नोंद संशोधकाच्या नावाने करण्याची रीत आहे. शेकडो वर्षांपासून कवितेच्या रचनेत रचयित्याचे नाव गुंफलेले दिसते. ज्ञानदेव, नामदेव, समर्थ रामदास, कबीर.... अनेकांच्या काव्यात त्यांची नावे आहेत. साहित्यातील निर्मितीचे, तेच विज्ञान संशोधनाचे! संशोधकाचे नाव देऊन संशोधनाचा परिचय दिला जातो. उदा. शल्याने शरीर कापून ते दुरुस्त करण्याची पद्धत शोधली, म्हणून त्यास शल्यकर्म म्हणतात. रुग्णांची देखभाल करण्याची पद्धत शुश्रुताने विकसित केली. म्हणून त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात. डिझेल नामक शास्त्रज्ञाने इंधनाचा शोध लावला म्हणून डिझेल नाव वापरात आले. असे अनेक किस्से....
देवनागरी वर्णाक्षरात ग, ण, श ही अक्षरे इतर अक्षरांहून वेगळी आहेत. त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे! ही बाब लक्षणीय आहे. हा वर्णसंच गणेशाने निर्माण केल्याचा यात संकेत आहे. म्हणून धार्मिक प्रवृत्तीच्या समर्थकांना देवनागरीस गणेशविद्याही म्हणावे असेे वाटते. गणपती अथर्वशीर्षात 'ए सा गणेशविद्या...' असे म्हटले आहे. त्याचा संदर्भ श्रीगणेशाने देवनागरी लिपीचा मूळ वर्णसंच निर्माण करण्याशी जोडलेला आहे!
देवनागरी लिपीत १६ स्वर, ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखाशी तर व्यंजनांचा मानवी मणक्यांशी संबंध आहे. कान या शब्दाची सुरूवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे काहीसे क हे अक्षरचिन्ह दिसते. ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा, भिवई, पापणी मिळून ड चा भास होतो. दोन डोळे एकत्र पाहताना ळ चा भास होतो. झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो. अनेक अक्षरचिन्हे तपासल्यास असे प्रत्यय येतील. मुखाशी असलेल्या संबंधावरून देवनागरी लिपीतील ३३ व्यंजने आणि ३ संयुक्त व्यंजने मिळून ३६ वर्णांचे दंतव्य, तालव्य, ओष्ठव्य, मूर्धन्य, अनुनासिक हे पाच प्रकार तयार झाले. विविध व्यंजने उच्चारताना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवते. अभ्यासू व्याकरणकार आणि शरीरशास्त्राच्या जाणकाराने देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यातील एकास एक संबंध नोंदलेला आहे. हा एकास एक संबंध म्हणजे ३३ मणके आणि ३३ व्यंजने यांचा परस्पर संबध आहे. मानेच्या खाली कणा सुरू होतो. तिथपासून १ ते ३३ क्रमांक मणक्यांना दिल्यास कोणत्या क्रमांकाच्या मणक्याशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जोडले आहे ते कळते! भाषेतील ९९.९९ टक्के शब्द या लिपीतून हुबेहूब लिहिता येतात. म्हणून ही लिपी जगाची भाषिक एकात्मता साधू शकते, असा दावा करण्यात येतो. लेखन, उच्चारणातील सुसंगतीसाठी ही लिपी प्रसिद्ध आहे.
वैदिककाळात लिखाणासाठी भारतात उत्तरेत भूर्जपत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरत. भूर्जपत्राला उंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्रा, रफार, रुकार, उकार, अनुस्वार, चंद्र, हलन्त उपचिन्हे वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडतात. ताडपत्रास उंची कमी, रुंदी अधिक! दक्षिणी लिपीत ही उपचिन्हे वर्णाक्षरांच्या डावी, उजवीकडे लिहितात. अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात. भारतीय लिपीत लिहिताना कोणत्याही लिपीच्या तुलनेत कमी जागा, कमी कागद, कमी शाईचा वापर होतो. कागद कमी म्हणजे जंगलतोड कमी! शाईत शिसे व जड धातू वापरतात. शाई कमी म्हणजे शिसे व जड धातूंपासून होणारे प्रदूषण कमी! अंक लिहितानाही काटकसर होते. उदाहरणार्थ २१७७ इंग्रजीत Two thousand one hundred seventy seven इतकी सारी अक्षरे लिहितात. देवनागरीत दोन हजार एकशे सत्त्याहत्तर ही १३च अक्षरे पुरेशी असतात! देवनागरीत
होणारे लेखन इंग्रजीच्या तुलनेत सत्तर टक्के वेळ नि शाई वाचवते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते. देवनागरी लिपी पर्यावरणाचा विनाश कमी करण्यास उपयुक्त ठरते! याचा अधिक लाभ घेतल्यास कमी श्रमात
अधिक लिहिता येईल. शिक्षण, संशोधन, व्यापार, प्रशासन... सर्व क्षेत्रात ही लिपी आर्थिक बचत आणि पर्यावरण रक्षण सहज करील. देवनागरी लिपी भारतीय/जागतिक एकात्मतेचे साधन ठरेल. सर्वत्र ही लिपी वापरल्यास आपण अधिक सुखी आणि समृद्ध होऊ! हे घडवे यासाठी आपण श्री गणेशाची प्रार्थना करू.
ॐ नमोजी आद्या.....
शुभम् भवतु.



आमच्या बदलीच्या नोकरीमुळे तुम्हाला मातृभाषेत नव्हे तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेतपाठवावे लागले. तरी तुम्ही मातृभाषा आणि मुळातील राज्यभाषा गुजरातीत छान व्यक्तहोऊ शकता, याचा आनंद अनोखा आहे. इग्रजी माध्यामाच्या शाळेत शिकणाऱ्यांचे इंग्रजीत व्यक्त होणे यथायथाच असते. पण ज्यांना मातृभाषा नीट येते त्यांना सर्व भाषाच छान व्यक्त होता येते, या माझ्या मताचे तुम्ही उदाहरणअसणे मला आनंदीत करते. तुम्ही सदैव असेच असावे यासाठी ईशचरणी प्रार्थना!
तुझ्या ह्या लेखाचा विस्तार जबरदस्त आहे! व्यास मुनी आणि श्री गणेशच्या संवादाचे स्वरूप काय असेल? परा , पश्यति, मध्यमा, वैखरी कि आणखीन कुठली भाषा कि मग 'शब्दे वीण संवादु...'
इंडो-युरोपियन भाषांचे मूळ खूपच मनोरंजक आहे. या अंतर्दृष्टीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद!