Father's day!
- Smita Bhagwat
- Jun 21, 2020
- 3 min read
Updated: Jun 21, 2020
Wish you happy Father's day! I am not able to allocate time to write a new blog every week. So please accept my sincere apologies for not posting regularly. I will return as and when possible.
फादर्स डे
जून महिन्याचा तिसरा रविवार म्हणजे फादर्स डे! पाश्चिमात्याचा हा सण ग्लोबल व्हिलेजची संकल्पना अंमलात आल्यापासून आपला झाला. आता आपल्याकडेही एकत्र कुटुंब अपवादानेच दिसत असल्याने हा सण औचित्यपूर्ण ठरला. या निमित्ताने पित्याच्या आठवणींचा जागर करताना मला त्यांनी एका विदेशी पित्याचे मनोगत सांगितल्याचे स्मरते. पुढे मीही ते वाचले. पुत्राचा जीवनमार्ग बदलत असताना, त्यास भेट देण्याच्या उद्देशाने माझ्या पित्यासारख्याच सुजाण पित्याने हे पत्र लिहिलेे.
प्रसंग पुत्राने जन्मघराचा निरोप घेण्याचा! पुत्र प्रवासाची तयारी करत होता. तेव्हा त्याच्या कामात अडथळा आणू नये, याची पित्यास जाणीव होती. प्रवासास निघालेल्या सुह्रदास तहान-लाडू भूक-लाडू देतात, तसे काही देण्याची इच्छाही! सामान्य प्रवासाहून हा जीवनप्रवास महत्वाचा! म्हणून या आगळ्या पित्याने पत्ररुपात मुलास वैचारिक तहान-लाडू भूक-लाडू दिले. पित्याने वाचले होते... आदर्श पित्याने मुलास ‘सडक’ बांधून देऊ नये. मुलाने स्वतःची ‘सडक’ स्वतः निर्माण करावी. म्हणजेच पित्याने मुलाचा जीवनमार्ग ठरवणारा हुकूमशहा बनू नये. पुत्राने स्वतःचा जीवनमार्ग स्वतः ठरवणे योग्य असते. पित्याने मार्गदर्शक व्हावे, पण पुत्राने त्याच मार्गावर चालावे, असा हट्टाग्रह नसावा. पुत्राचा ज्येष्ठ हितचिंतक बनताना जीवनाचा हितप्रद आराखडा सुचवावा. स्वत:ची सडक – निर्माण करताना पुत्राने तो आराखडा अवश्य वापरावा, पण पित्याने सांगितली तशी तंतोतंत सडक निर्माण करण्याची चूक करू नये. पित्याच्या विचारात त्याने स्वत:चा विचार मिसळला तरच तो मार्ग पुत्राचा होतो. या अनोख्या पित्यास हा विचार फार आवडला. म्हणून त्याने पुत्रास मार्गदर्शक ठरणारी आचारसंहिता कागदावर उतरवली. पुत्र घराचा निरोप घेत असताना हे कागद मुलास देताना पिता आर्द्र स्वरात म्हणाला, “पुढील जीवन प्रवासासठी ही पित्याने दिलेली भेट समज. ती अडचणींचे डोंगर पार करताना तुला मदत करील असे मला वाटते.“ आलिंगन देऊन त्याने पुत्रास निरोप दिला.
नव्या ठिकाणी पाय रोवण्याच्या प्रयत्नात मुलगा कामात गढला. पुढे वेळ काढून त्याने ते पत्र वाचले. मग पित्यास फोन करून सांगितले, “डॅड तुम्ही प्रेमाने दिलेली भेट मी रेफरन्सबुक सारखी वापरणार आहे. आजवर वा भविष्यात मला मिळणाऱ्या भेटीतील ती सर्वोत्तम भेट असेल, अशी मला खात्री वाटते. प्रसंगी यात मी भर घालणार आहे. माझ्या पुत्रास निरोप देताना भेट देण्यासाठी!” सांगताना त्याचा कंठ भरून आला. हे लिखाण एकट्याने वाचणे त्यास स्वार्थीपणा वाटत असल्याचेही तो म्हणाला. कृतज्ञता व्यक्त करून त्याने फोन ठेवला. काही दिवसांनी पुन्हा त्याने फोन केला. तेव्रूहा त्याने सर्वांना असे सुजाण वडील लाभत नाहीत, म्हणून या लिखाणाची पुस्तिका तयार व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. पित्याने हा विचार उचलून धरला. आणि Life’s Little Instruction Book नामक अनोखी पुस्तिका तयार झाली. या पुस्तिकेची अर्पणपत्रिकाही अनोखी आहे.
“अनेक रीतीने माझा गुरु ठरलेल्या माझ्या पुत्रास अर्पण.” इतके लिहून न थांबता पिता लिहितो - बेटा तुला खूप दूरचे दिसावे यासाठी मी किती मदत करू शकणार? तुला खांद्यावर घेऊन मी तुझ्या नजरेची व्याप्ती वाढवली. आता मी बघू न शकलेल्या नि माझ्या खांद्यावरून तुला दिसलेल्या जगाचे वर्णन करून तू मला अधिक जग दिसल्याची अनुभूती घडवशील ना?
या पुस्तिकेचा लेखक अमेरिकन असला तरी त्याची शिकवण जागतिक ठरणारी आहे. दिवसंदिवस वाढणाऱ्या स्पर्धेमुळे लेकराच्या काळजीत वडील आग्रही बनू लागले आहेत त्यात मुलांची विचारक्षमता खच्ची होत आहेत. म्हणून या आगळ्या विचारांचे संक्षिप्त रूप मराठीत नमूद करावेसे वाटले....
पुत्रा, तू सदैव उत्तम पुस्तके विकत घे. आज वेळ मिळाला नाही तरी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू ती वाचू शकशील. सदैव उत्तम प्राप्त करण्याची कामना बाळग. लो एम इज अ क्राईम हे लक्षात ठेव. विचार महान असावेत आणि त्याचवेळी छोटे आनंद कमी महत्वाचे नसतात हे लक्षात ठेवावे. उत्तम आहे ते आपली किंमत मागणारच! ती देताना खळखळ करू नये. कुणीही परिपूर्ण नसते, ही जाण जागती ठेव. झीज सोसण्याचा वसा घे. कारण घासला जातो तो गंजत नाही. वा गंज चढल्यास तो घासल्याने दूर होतो, असे म्हणू. पूर्णत्व हे मिथक आहे. म्हणून ते सदैव एक वीत दूर असते. तू सतत सुधारण्याचा वसा घे. सुधरवणे संपते; सुधारणे संपत नाही. प्रयत्न जिंकण्यासाठी असावा पण हार पदरी पडल्यास स्वीकारण्याची खुली मानसिकता असावी. हरणाऱ्यास तुच्छ लेखू नये. परमेश्वराने कुणालाही रिकाम्या हाताने धाडलेले नाही. कुठे हार तर कुठे जीत, हे जीवनमर्म आहे. जीवनाच्या समरांगणात विजयी व्हायचे असेल त्याने पराभवांचा स्वीकार करावा. पराभवाची कारणे जाणून घेऊन सुधारणा करावीे. स्वयंकेंद्री वृत्तीचा त्याग करणारा दुसऱ्याच्या यशात आनंद मानतो.
गाठ सोडवण्याकडे कल असावा. गाठ कापण्याचा अविचार करू नये. आशा सोडू नये. निराशा शब्दात आशा दडली आहे. कोणतेही काम करणारी व्यक्ती तुच्छ नसते, याची जाणीव ठेव. प्रत्येक कामाकडे सन्मानाने बघ. तुझ्या पश्चात तुझ्या आठवाने इतरांंचा कंठ भरून यावा, असे जीवन जग. नजरेसमक्ष सदैव काही सुंदर असू दे. फ्लॉवरपॉटमध्ये एक रानफूल तरी ठेवण्याची सवय अंगी बाण. ते रानफूल तुला जीवन सुंदर असल्याची जाणीव करवील. मला वेळ नाही, असे म्हणू नये. सर्वांच्या दिवसास असतात तितके तास तुझ्या दिवसासही मिळाले आहेत. विशिष्ट कामासाठी वेळ नाही, याचा अर्थ तू महान आहेस, असा नसून तुला ते करायचे नाही, असा होतो.
या पुस्तिकेचे स्मरण मला फादर्स डे साजरा केल्याचे समाधान देते. हे मूळ भाषेत वाचण्याची इच्छा असलेल्यासाठी आणि ज्याचे श्रेय त्यास देण्याच्या सद्भावनेने सांगते की लेखकाचे नाव आहे, जॅक्सन ब्राऊन! शुभम् भवतु.
पूर्व प्रसिद्धी अंतराळ इ मॅगेझिन.


Comments