top of page
Search

Ganesh Atharvashirsh in Marahi

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Aug 27, 2020
  • 3 min read

Updated: Aug 29, 2020

काल म्हटल्याप्रमाणे विद्याधीश गणेशाच्या पर्वात आपण आज अथर्वशीर्षाचा अर्थ सोप्या माय मराठीत विशद करणार आहोत.

हे देवांनो, आम्हास कानांनी शुभ ऐकायला मिळो. डोळ्यांना चांगले बघण्याची संधी मिळो. देवांनी (निसर्गाने) सुदृढ अवयव दिलेल्या देहाने, आम्हास मिळालेले आयुष्य, देवाच्या (निसर्गाच्या) स्तवनात व्यतीत होवो.

सर्वश्रेष्ठ इंद्र, ज्ञानवान सूर्य, संकटनाशक गरूड आणि बृहस्पती आमचे कल्याण करोत. जीवनात शांतता नांदो.


ॐकाररूपी गणेशाला आमचा नमस्कार असो. तू ब्रह्मतत्व, सकलांचा कर्ता (निर्माता) सृष्टीस धारण करणारा, पोषण करणारा तसेच सृष्टीचा संहार करणाराही आहेस. हे ब्रह्मस्वरूप आणि नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप तूच आहेस. मी योग्य तेच नि खरे बोलावे, यासाठी तुझ्याविषयी बोलणाऱ्या, तुझे नाम श्रवण करणाऱ्या, दान देणाऱ्या आणि उत्पादक असलेल्या या शिष्याचे, पश्चिम, पूर्व, उत्तर, दक्षिण तसेच वरून नि खालून तूच रक्षण कर.


तू वेदादी वाङमय आहेस. चैतन्यस्वरूप ब्रह्ममय आहेस. तू सत्, चित्, आनंदस्वरूप अद्वितीय आहेस. तू साक्षात ब्रह्म, ज्ञान विज्ञानमय आहेस. हे समस्त विश्व तुझ्यापासून निर्माण झाले असून तुझ्या आधारशक्तीनेच स्थिर राहू शकत आहे. ते तुझ्यातच लय पावते आणि पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होते.


तूच पृथ्वी, पाणी, अग्रि, वारा आणिआकाश ही पंचतत्वे आहेस. 'परा पश्यन्ती, मध्यमा, आणि वैखरी' या चार वाणीही तूच आहेस. तू सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या पलिकडे आहेस. तू स्थूल, सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलिकडचा आहेस. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीन काळांच्या पल्याड आहेस. सृष्टीचा मूलाधार असल्याने तू स्थिर आहेस. उत्पत्ती, स्थिती आणि विलय या पलिकडचा आहेस. योगी सदैव तुझे ध्यान धरतात. कारण तू ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र,वायू, भुवर्लोक, स्वर्लोक आणि ॐकार सर्व तूच आहेस.

गण शब्दातील आदि 'ग्' प्रथम उच्चारून 'अ' चा आणि नंतर अनुस्वाराचा उच्चार करावा. तो अर्धचंद्राप्रमाणे असावा. तसेच तो तारकमंत्राने ॐकाराने यु्क्त असावा. पूर्ण मंत्र 'ॐगं' असे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. 'ग्' हे मंत्राचे पूर्वरूप तर 'अ' हा मंत्राचा मध्य आणि अनुस्वार या मंत्राचा कळस असून अर्धचंद्राकार बिंदू हे मंत्राचे उत्तररूप आहे! या मकारादी चारांपासून एक नाद तयार होतो. तीच गणेशविद्या!

या मंत्राचे ऋषी 'गणक' असून 'निचृत गायत्री' हा या मंत्राचा छंद आहे. गणपती ही देवता आहे. 'ॐगं' या मंत्ररूपाने दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो.

आम्ही एकदंतास जाणतो. वक्रतुंडाचे ध्यान धरतो. म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती प्रदान करो. ज्याला एक दंत असून पाश, अंकुश आणि दात धारण केलेले तीन हात आहेत पण चौथा हात वर देण्यास उचावलेला आहे. ज्याचे उंदिर हे वाहन आहे. ज्याच्या शरीराचा रंग लाल, सुपासारखे कान आणि पोट मोठे असून ज्याने लाल वस्त्रे परिधान केली आहेत. त्याने अंगाला लाल चंदनाचे लेपन केले आहे नि लाल फुलांनी त्याची पूजा केलेली आहे. असा भक्ताविषयी करुणा बाळगणारा, अविनाशी सृष्टीच्या आधी निर्माण झालेला नि प्रकृतिपुरुषाहून वेगळा असलेल्या गणेशाचे ध्यान धरणारा योग्यात श्रेष्ठ ठरतो. व्रतधारिणांच्या प्रमुखांना, व्रातपतीस, देवसमुदायांच्या अधिपतीस नमस्कार असो. लंबोदर एकदंत, विघ्नविनाशी, शिवपुत्र, वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो.


हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशीर्षाचा मराठी अनुवाद मनापासून वाचला तरी अथर्वशीर्षाचे महत्व कळते. मग गणेशाबरोबरच याच्या रचयित्यासही वंदन करण्यास हात आपसूक जुळतात. अथर्वशीर्षाचे पठण सकाळ-संध्याकाळ करावे. ते अशिष्यास न देण्याची भलावण करतात. फलश्रुतीत इतर फळांचाही उल्लेख आहे. वरवर विज्ञान जाणणाऱ्यांना ते अंधश्रद्धेचे प्रतीक वा खूळ वाटते. वास्तवात रोज दोनदा अथर्वशीर्षाचे पठण केल्याने रक्ताभिसरणात हितप्रद बदल होतो. परिणामी चित्त स्थिर होते. त्याचा परिणाम देहमनावर दिसून येतो. तो मनोविज्ञान जाणणाऱ्यास सहज जाणवतो.देह आणि चित्त एकाग्र झाल्यास होणारे कार्य यशस्वीच होते. अथर्वशीर्षात त्वम् ज्ञानमयो विज्ञानमयोसि म्हटले आहे, ते मनोविज्ञानास धरून असल्याचे योगी जाणतात.


हिंदवी स्वराज्याची संकल्पना तळागाळात पोहोचवण्याची समर्थ रामदासांची धडपड सर्वविदित आहे. त्या संदर्भात त्यांचे दोन प्रयत्न नजरेत भरतात. जनजागृतीसाठी सणांना सार्वजनिक रूप देणे आणि नव्या पिढीच्या उत्कर्षार्थ मनोबोधाचे श्लोक लिहिणेे. पहिल्या श्लोकात ते म्हणतात....

गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ।।

नमू शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ।।


हा वैचारिक जागर आपण गणेशाच्या मंगळवार पर्यंत चालू ठेवणार आहोत. उद्या भेटू.

शुभम् भवतु


 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page