Ganesh Chaturthee Utsav
- Smita Bhagwat
- Aug 22, 2020
- 3 min read
Updated: Sep 1, 2020
आज गणेश चतुर्थी! ॐकार हे श्रीगणेशाचे आदिबीज आहे, असे म्हणतात. त्यातील अ कार ब्रह्मा, उकार विष्णू मकार महेश असल्याचे प्रतिपादन करण्यात येते. म्हणून प्रसंगी माझ्यासारख्या सामान्यजनांना प्रश्न पडतो की श्रीगणेशास शिवपुत्र म्हणावे की शिवपिता? आपल्यासारख्या अविद्वानांच्या मनात उठणारे प्रश्न बहुतांशी अनुत्तरित राहणार असतात. म्हणून शिवपुत्र की शिवपिता या प्रश्नात डोके शिणवण्यापेक्षा विघ्नहर्त्या वरदविनायकाच्या चरणी नतमस्तक होणे आपल्याला आवडते. आज गणेशचतुर्थीच्या निमित्ताने आपण श्री गणेशाची प्रार्थना करू.
आजपासून सर्वत्र गणेश पूजन आणि मंत्रपुष्पांजलीचा जागर होईल. पण फार कमी लोकांना त्याचाअर्थ कळतो. संस्कृत मृतभाषा ठरण्यापूर्वी, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात रस घेणाऱ्या स्वातंत्र्यसेनानीच्या घरात मी जन्मले. मला वडीलांकडून खूप माहिती मिळालीे. मंत्रपुष्पांजलीत आदर्श लोकशाहीची संकल्पना आहे, असे ते म्हणत. त्या वयात लोकशाही कळत नव्हती. आजही भारतीय लोकशाही पाहून मन चक्रावते.
गणेशोत्सवाचे महत्व सांगताना ते म्हणाले होते, “मंत्रपुष्पांजली आदर्श राष्ट्रगीत आहे! एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा सामावणारी ती विश्वप्रार्थना! पूर्वसुरींनी जाणतेपणी प्रस्थापित केलेला रिवाज! मंत्र यांत्रिकतेने न म्हणता, अर्थ समजून म्हणावे!” जे मी जाणते ते संस्कृत मृतभाषा ठरल्यावर वाढलेल्या पिढीस कळवणे मला कर्तव्य वाटते. नव्या पिढीने त्याचा जागतिक खेड्यात (ग्लोबल व्हिलेज) प्रसार करून पुढच्या पिढीसही कळवावे, हे या लेखनाचे प्रयोजन! ते वाचताना काहींना व्यक्तिमत्व विकासाचा सुखद काळ आठवेल. ज्यांना हे ठाऊक नसेल त्यांना गणेश चतुर्थीच्या सुमूहुर्तावर मंत्रांची आशयघनता कळेल, यासाठी गणेशोत्सवात दिलेली अर्थपूर्ण चतुश्लोकी भेट!
यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन्तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देव: ।।१।। देवांनी यज्ञाच्या माध्यमातून यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी! पूर्वी देवताे निवास (स्वर्गलोकी) करीत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं।कामेश्वरो वैश्रवणो दधातु कुबेराय वैश्रवणाया महाराजाय नमः ।।२।।
सर्वकाही (प्रसह्य) अनुकूल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर, कामनार्थी अशा मला (माझ्या) सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो.
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति।।३।।
आमचे राज्य कल्याणकारी असावे. ते सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. लोकराज्य असावे. आसक्तिरहित, लोभरहित अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. हे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्षांपर्यंत सुरक्षित राहो.
तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।....
अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हिच कामना. सर्वांना समान संधी देणारी, सर्वांना हितकर संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकास करून देणारी ही विश्वप्रार्थना! सर्वमत पंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या राज्य संपूर्ण मानवजातीत सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असो, या भावनेचा, या प्रार्थनेत उद्घोष आहे.
मंत्रपुष्पांजलीमुळे पुराणकालापासून आपल्याकडे लोकशाहीची संकल्पना फुललीे. मथुरेस राजा उग्रसेन अंधक आणि वृष्णीक प्रजाजनांचे मत विचार करून राज्य करत असे. पण कंसाने प्रजेस तुच्छ लेखून हुकूमशाही आणली. म्हणून कृष्ण-बलराम यांनी त्यास पदच्युत करून गणराज्याचाअनुरोध केला. कालानुक्रमे अनेक बुद्धिमंतांनी ही परंपरा पुढे नेली. त्यात विष्णुगुप्त चाणक्य उर्फ कौटिल्य या राजकारण आणि अर्थपटुचा विशेष उल्लेख करायला हवा. नंदराजाच्या हुकूमशाहीच्या विरोधात विष्णुगुप्ताने आवाज उठवला. तळागाळातून चंद्रगुप्त निर्माण केला. आज प्रेसिडेंट वा राष्ट्रपती म्हणतात त्यास त्यावेळी राजा म्हणत. राजे प्रजेचे मत विचारात घेऊन राज्य कारभार बघत.
पुढे समर्थ रामदासांनी स्वराज्याच्या संकल्पनेचा विचार तळागाळात पोहोचवण्यास आपल्या सणांना सार्वजनिक रूप प्रदान केले. त्यासाठी या रामभक्ताने सुखकर्ता दुःखहर्ता... लवथवती विक्राळा... अशा आरत्या लिहिल्या. आज शतके उलटली तरी या आरत्या लोक जाणतात. ते राष्ट्रगुरू ठरले. अष्टप्रधान मंडळाच्या मदतीने प्रजामत जाणून घेणारा जाणता राजा त्यांनी निर्माण केला. त्या आदर्शाचे अनुकरण करून लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची चळवळ उभारली. अनेक सहस्त्रके ओलांडून ही परंपरा आपल्यापर्यंत पोहोचलीे. तिचा अर्थ समजून घेऊन आपण आदर्श लोकशाही निर्माण केली पाहिजे. शाब्दिक टिका न करता क्रियाशीलतेची कास धरली पाहिजे यासाठी हा लेखन प्रपंच! गणेश ही विद्येची देवता! ज्ञानमार्गास क्लिष्ट न समजता ज्ञानप्राप्तीचा वसा घेणे हा खरा गणेशोत्सव! तो समजून उमजून साजरा व्हावा, यासाठी चला आपण गणेशवंदना करून विघ्नहर्त्यास साकडे घालू. सर्व पंथांना समान वागणूक देणारी लोकशाही निर्माण व्हावी यासाठी गौरी-गणपतीचा जाणता जागर करत म्हणू...
विघ्नहर्त्या विनायका तुला पार्वतीची आण। आदर्श लोकशाही निर्माण कर, तुझे आठवीन गुण ।।
शुभम् भवतु.

शुभम् भवतु.
.


धन्यवाद. माझे वडील म्हणत की आपण रामदासांसारखे शिकवण देण्यास समर्थ नाही. तरी त्यांची उक्ती थोडी अंमलात अवश्य आणू शकतो. म्हणून जे जे आपणास ठावे ते ते इतरांना सांगावे इतकं आपण करू शकतो. 🌷🙏
मंत्रपुष्पांजली आपण सर्वजण म्हणतो, परंतु म्हणतांना बऱ्याच जणांना त्याचा अर्थ माहित नसतो.
याचं विश्लेषण करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
Thanks Siddharth for your positive comment.
Blog on Celebration of Ganesh Chaturthi festival as directed by Swamy Ramdas and purpose behind the celebrations gives idea of thoughts given for its celebration by earlier generation.
It is for the new generations to pick up the real purpose and intentions behind its celebration as intended by Swamy Ramdas is nicely written.
काय म्हणू? जे पेरत गेले ते पाषाणावर न पडता चांगल्या जमिनीवर रूजले , याची वारंवार जाणीव होण्याइतकं या वयात दुसरं सुख नाही. असाच संवेदनशील रहा असा आशीर्वाद आणि ईशचरणी प्रार्थना.❤️