top of page
Search

Gujarat, Garaba & Reality

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Oct 21, 2020
  • 4 min read

Updated: Oct 22, 2020


गुजरातचा गरबा! गैरसमज आणि वास्तव!!!

भारत उत्सवप्रिय देश आहे. विविध आख्यायिका आणि परंपरांची सांगड घालून संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी सणांची निर्मिती करणारा! प्रतिक पूजेचे महत्व सांगताना वैचारिक जागरण करणारा!

दिवाळी सणांची राणी! त्या आधी वैचारिक जागर सूचित करणारे नवरात्र! अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंत! काही ठिकाणी कोजागिरी – शरद पौर्णिमेपर्यंत! नवरात्र आणि गरब्याचे नाते आता गुजरातपुरते सीमित राहिलेले नाही. ते जगभर पसरले असले तरी त्या पाठचा खरा उद्देश फार कमी लोक जाणतात. हल्ली सणातून हेतू वजा करून विकृत उत्सवास प्राधान्य मिळत आहे. याचे प्रत्यंतर मध्यंतरी विचित्र रीतीने मिळाले. स्वतःस पुरोगामी बुद्धीप्रामण्यावादी म्हणवणारा एक महाभाग नवरात्रातील गरब्याविषयी कुतूहल असलेल्या परदेशी व्यक्तीस गरबा हे हिंदू शैलीतील डेटिंग आहे, असेे सांगत असताना ऐकले. म्हणून गुजरातेत खऱ्या अर्थाने पुरोगामी घरात जगलेला काळ आठवला. ते स्मरणही वैचारिक जागरच वाटले मला! म्हणून नवरात्रातील गरब्याच्या संदर्भात समाजातील गैरसमज आणि वास्तवाचा जागर सर्वांच्या संगतीने करावासा वाटला.

हल्ली समग्र विश्वात नवरात्रात गरबापर्व साजरे होते. शारदीय नवरात्रात दुर्गेच्या नऊ स्वरूपाची आराधना करतात. दिनचर्येत काम आणि आराम दोन्हीचे महत्व! पिंडी ते ब्रह्मांडी नि ब्रह्मांडी ते पिंडी हा आपल्या पूर्वसुरींनी धर्मभावनेत विणलेला विचार! 'अहं ब्रह्मास्मि' नि 'तत्वमसि' म्हणत साक्षात परमेश्वर आत्मसात करण्याचा विचार त्यांनी रुजवला. समस्त अध्यात्म्यास प्रतिकात्मक रूप प्रदान केले. भारतात मुख्य ऋतू उन्हाळा आणि हिवाळा! या दोन ऋतुंच्या बेचक्यात निर्मितीक्षम पावसाळा! स्कंद पुराणात अश्विन नवरात्रात प्रजापिता ब्रह्मदेवाचा दिवस व चैत्र नवरात्रात रात्रीची सुरुवात होते, असे विधान आहे.

अश्विनात शारदीय नवरात्र! तेव्हा घट देह व दीप आत्म्याचे प्रतिक समजून गुजरातेत स्त्रिया गवाक्षासारखी भोके कोरलेल्या घटात (मडके) दिवा उजळून दुर्गामातेभोवती फेर धरतात! ही शक्तीची आराधना असते! निष्क्रिय आराधना ठरते झोपेस निमंत्रण! म्हणून दीप उजळलेला घट डोईवर घेऊन नृत्य! या नृत्यात गर्भदीप - आत्म्यास असते महत्व! लोकभाषेत अपभ्रंश होऊन गर्भदीप शब्द ‘गरबा वा गरभा’ ठरला. आजच्या विकृत नृत्याशी मूळ गरबा संकल्पनेचा संबंध नाही.

नव म्हणजे नवीन आणि नऊही! म्हणून गुजरात नऊ दिवस देवीसमोर अखंड दीप प्रज्वलित ठेऊन हे पर्व साजरे करते. दिवा प्रज्वलित (उजागर) ठेवण्यासाठी वैचारिक व नृत्यमय जागरण! देवी पूजनात नऊ धान्यांची ताजी पत्री - ९ प्रकारची पाने! आपल्याकडेही देवीसमोर पूजेसाठी अशी विविध धान्ये पेरण्याची पद्धत आहे. शारदीय नवरात्रात दुर्गामातेच्या नऊ स्वरूपाची आराधना करतात. असुरी वृत्तीचे दमन नि दैवी शक्तीच्या अवतरणाची आस त्यात प्रतीत होते. महादेवीने राक्षसांचे निर्दालन करून प्राणीमात्रास शांतता प्रदान केली, यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे! दक्ष प्रजापती पित्याकडे यज्ञ स्थानी शिवाचा अपमान झाला. म्हणून त्यांच्या कन्येने यज्ञकुंडात उडी घेतली. सतीचे शव खांद्यावर घेऊन शोकमग्न श्री शंकर रानोमाळ फिरू लागले. त्यामुळे धरणी हादरू लागली. म्हणून भगवान विष्णूने सतीच्या शवास एक्कावन्न बाण मारून विद्ध केले. ते तुकडे जिथे पडले, ती ५१ स्थळे शक्तिपिठे ठरली. गब्बर पर्वताच्या अंबाजी क्षेत्री महासतीचे हृदय पडले; अशी आख्यायिका आहे. म्हणून तंत्र चूडामणी ग्रंथात एक्कावन शक्तीपिठातील अंबाजी हे स्थान सर्वाधिक महत्व पावले आहे.

अंबाजी गुजरातचे उत्तर टोक! राजस्थानास भिडलेले! म्हणून गर्भदीप मस्तकी धारण करून दुर्गेच्या प्रतिमेभोवती रिंगण घालून गरबा घुमणे गुजरातेत सुरू झाले. लगेच स्वविचारांची भर घालून राजस्थानने ते आत्मसात केले. नवरात्राचे नऊ दिवस दुर्गादेवीची स्वारी व्याघ्र, हत्ती... नऊ विविध वाहनांवर आरूढ असते. पहिल्या दिवशी दुर्गा शैलपुत्रीा, दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा,चौथ्या दिवशी श्री कुष्मांडा, पाचव्या दिवशी श्री स्कंदमाता, सहाव्या दिवशी श्री कात्यायनी, सातव्या दिवशी श्री कालरात्री, आठव्या दिवशी श्री महागौरी आणि नवव्या दिवशी श्री सिद्धीदात्री स्वरूपात प्रगटते. प्रत्येक रुपात देवीची अनोखी खासियत! गुजरातेत तीन शक्तिपीठे आहेत. अंबाजी व्यतिरिक्त महेसाणा जिल्ह्यातील तीर्थधाम बहुचराजीस ‘बाला त्रिपुरसुंदरी’ रूपात देवी प्रगटली. या स्थानापासून २ किलोमीटर दूर शंखलपूर हे सुबक स्थान आहे. तिथे दुर्गामातेचे प्रागट्य झाले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बडोद्याजवळ पावागढ हे कालीमातेचे स्थान आहे. अमदावाद, बडोदा, सुरत, नवसारी ... गुजरातेत सर्वत्र नवरात्रीपर्व उत्साहाने साजरे होते. तो उथळ फॅशन महोत्सव नसतो. पेठ वा बोळास गुजरातेत शेरी म्हणतात. शेरी गरब्यात अंबामातेची हेतुपूर्ण आराधना होते. गुजरातेत आराधना होणाऱ्या महादेवी दुर्गामातेचे स्वरूप अत्यंत भव्य आणि मोहक असते. ती संहारक शंकराची अर्धांगिनी! तिच्यात संहारकशक्ती असणे योग्यच! मातेने प्रत्येक हातात विविध दिव्यास्त्रे धारण केली आहेत. देवी भागवतात या संदर्भात सुरस माहिती आहे.

भारत कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शेतीची कामे संपत आल्यावर होणारे शरदाचे आगमन उत्साहाने साजरे होते. शारदीय नवरात्र, कोजागिरी पौर्णिमा को जागरती? हा प्रश्न विचारून सुबत्तेत जागराचे महत्व प्रतिपादित करणारी! सणांची राणी दिवाळी! या सणात अधिक आनंदाने उत्सव साजरा होतो. मानव समाजप्रिय आहे. स्वजनांसोबत ज्ञान आणि मौजमजेची लयलूट करणे त्यास प्रिय! पण पश्चिमेचे अंधानुकरण करणाऱ्या प्राप्त भारतीय समाजात आता ज्ञान म्हणजे तंत्रिकक्षेत्र नि अध्यात्म हे थोतांड, असे म्हणण्याचा रिवाज स्थापित झाला आहे. भौतिक सुखाच्या अतिरेकी सोसात चंगळवाद वाढीस लागला आहे. सुखी जीवनाची संकल्पना चुकीची नाही. पश्चिमेचे ज्ञान प्राप्त करणेही योग्यच! पण त्या ज्ञानाचा स्वीकार म्हणजे आपल्या मूलभूत ज्ञानाचा धिक्कार, हे समीकरण चुकीचे आहे. आपले मूलभूत ज्ञान हेतुपुरस्सर अलक्षित (दुर्लक्षित नव्हे. लक्ष गेलेच नाही ते अलक्षित) ठेवण्यात येत आहे. म्हणून मला फ्रान्समध्ये भेटलेल्या एका तरुणाचे हेतुपूर्ण वाक्य हल्ली वारंवार आठवते. त्याच्या स्मरणात आजोबांच्या अंधुक आठवणी असल्या तरी त्यास हवे असलेले संदर्भ वडील देऊ शकत नसल्याने तो व्यथित स्वरात म्हणाला होता, “My father is the generation who lost knowledge that my grandfather had!”

नवरात्राच्या या शक्तीपर्वात तरुणांनी आपल्या ज्ञानाच्या मूळास भिडण्याचा निश्चय करावा. हा निश्चयच त्यांना योग्य मार्ग दाखवील. ज्ञानसागरातील सारे मोती प्राप्त होणे केवळ अशक्य! पण जे मोती गवसतील ते पुढच्या पिढीस दिले पाहिजेत. ही खरी इस्टेट! आपल्या साऱ्या पूजा प्रतिक पूजा! सर्वा भूती परमेश्वर या संकल्पनेचे स्वागत करणाऱ्या! म्हणून आपण भूतमात्राचा देवात समावेश करतो. काळाच्या उदरात गडप झालेले ज्ञान पुन:प्राप्त करण्याचा दृढनिश्चय ही शक्तीची खरी महापूजा! तसा निश्चय करून नवरात्राच्या या शक्तीपर्वात ज्ञानदेवीची आराधना सुरु करू. चला एकमुखाने म्हणू, “जय अंबे जय पार्वती, जय जय देवी सरस्वती!!!”


शुभम् भवतु


ree

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page