top of page
Search

Guru Purnima

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Jul 4, 2020
  • 3 min read

Updated: Jul 5, 2020

महत्व गुरुपौर्णिमेचे


गुरु आणि शिक्षक यात सैद्धांतिक फरक आहे. शिक्षक उपजीविकेसाठी शिक्षण देतो तर गुरू तिमिरातून तेजाचा आणि असत्याच्या निबिड अरण्यातून सत्याकडे जाणारा मार्ग दाखवतो. शिष्यास कल्याणमार्गावर नेतो तो गुरू! जीवननात जन्मदात्याहून अधिक महत्वाचा गुरू! कारण जन्मदाता जातकास जन्म देतो नि गुरू जीवन! जन्माची पूर्णता मृत्यूत तर ज्ञान जातकास अमरत्वाकडे नेते. मृत्युहून अमरत्व श्रेष्ठ! तसा जन्मदात्याहून अमरत्वाचे ज्ञान देणारा गुरू श्रेष्ठ! गुरुकडून दीक्षा घेतात. दीक्षा शब्दाच्या उत्पत्तीचा संबध दीप्ती आणि क्षतीशी! शिष्याची क्षती दूर करून त्यास दीप्ती प्रदान करण्याच्या क्रियेस दीक्षा म्हणतात. गुरू असतो दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांचा विकास करणारा ध्रुवतारा! गुरुच्या अनुग्रहाविना ज्ञानी अपूर्ण ठरतो. म्हणून गुरुगृही जाणारा तो द्विज! पहिला जन्म मातेच्या कुशीत. दुसरा जन्म गुरु ज्ञान प्रदान करतो तेव्हा गुरुच्या कुटीत!

भारतीय संस्कृती गुरूला ब्रह्मा, विष्णू, महेशाचा एकत्रित सन्मान देते. गुरू आणि गोविंद (देव) यांचे एकदम आगमन झाले तर ईश्वराआधी नमन ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्गआज गुरुपौर्णिमा! आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी गुरू वंदना करण्याचा रिवाज आहे. गुरू आणि शिक्षक यात सैद्धांतिक फरक आहे. तसे इंग्रजीतही टीच आणि प्रीच समानार्थी शब्द नाहीत. शिक्षकाहून गुरुचा दर्जा उच्च! कारण शिक्षक उपजीविकेस मदत करणारे शिक्षण देतो. गुरू बोट धरून शिष्यास कल्याणमार्गाकडे नेतो! जन्मदात्यांपेक्षा नि ईश्वराहून गुरूचे स्थान महत्वाचे! जन्मदाते जातकास जन्म देतात. गुरू जीवन देतो. जन्माचा शेवट मृत्यू! जीवनाचे ज्ञान जातकास दाखवणाऱ्या गुरुला! गुजराती समाज सद्गुरुकडून पाच खकारांताची (ख ने सपणारा शब्द तो खकारांत) अपेक्षा बाळगतो! आँख, पांख, लाख,राख आणि साख! ज्ञान आणि वैराग्याची महती पटवणारी आँख - डोळा! यथायोग्य समजण्याची पारख गुरूपदेशात प्राप्त होते! एक डोळा पारख प्राप्त करतो नि दुसरा विराग! भारतीय संस्कृतीत विराग महत्वाचा! दुसऱ्या क्रमांकावर पांख - पंख! पंखात भरारी घेण्याचे बळ असण्यास महत्व! गुरुकृपेविना मनाचे पंख उघडत नाहीत वा इष्टानिष्टाच्या कात्रीत ते कापले जातात. गुरू पंख टिकवण्याची क्षमता निर्माण करतो. पंखातील बळास वैश्विक कक्षेस नेतो. ज्ञानरुपी जागर आणि पंखरुपी आचरण दोन्हीस महत्व! योग्य आचरणाविना ज्ञान पांगळे! नंतरच्या क्रमांकावर लाख! म्हणजे लक्ष्य! हेतू! हेतुविना जीवन अर्थहीन! जीवनास अर्थ प्रदान करण्याचे काम सद्गुरुचे! पुढे सद्गुरुच्या सान्निध्यात शिष्याच्या अहंकाराची राख होते. ही राख असते सद्गुरुच्या कपाळाचा श्रृंगार! शेवटी साख म्हणजे साक्ष! गुरुच्या साक्षीने शिष्य आशा प्राप्त करतो. ही आशा अडीअडचणीत मनोबळ टिकवून मोक्षाचा मार्ग दाखवते.


आता जमाना आला आहे गुरू-शिष्य 'मिलीभगत' करणाऱ्यांचा! लोकांना मूर्ख बनवणारे शठ, गुरू शिष्याचे सोंग वठवू लागले असल्याने प्रत्येकास सद्गुरू लाभेलच, असे नाही. म्हणून कुणाला गुरुचे स्थान देण्यापूर्वी हजारदा विचार करावा लागतो. अशावेळी भारतीय संस्कृतीत दोघांचा सार्वत्रिक गुरू म्हणून स्वीकार झाला आहे. महाभारतरुपी तेलाचा दीप प्रज्वलीत करणारे महर्षी व्यास आणि त्या दीपास गीतेचे तेज प्रदान करणारे श्रीकृष्ण! फळाचा मोह न ठेवता कौशल्याने केलेल्या कर्माचे महत्व पटवणारे भगवान श्रीकृष्ण 'कृष्णम् वंदे जगद्गुरूम्' ठरतात. महाभारतात एकलव्य आणि कर्ण या शिष्यांची उदाहरणे बोलकी आहेत. जात आडवी आल्याने गुरुकृपेपासून वंचित राहिला असूनही गुरुदक्षिणेत अंगठा कापून देणारा निर्मोही एकलव्य आणि जात लपवून दुर्योधनाच्या उपकाराचे मोल चुकवण्यास विद्या प्राप्त करणारा कर्ण! सर्व प्रकारच्या मानवी मानसिकतेचे महाभारतात दर्शन घडते. महाभारतात नाही ते जगात कुठेही नाही, असे महर्षी व्यासांच्या महाभारताचे महत्व! म्हणून गुरुपौर्णिमेस व्यासपौर्णिमाही म्हणतात.


सद्गुरू स्वामी वरदानंद भारती म्हणतात

गु शब्दस्त्वन्धकारस्था, रु शब्दस्तन्निवर्तकः । तयोर्ऐक्यं परब्रह्मं गुरुरित्याभिधीयते ।।

म्हणजे 'गु' या अक्षराने मनातील अज्ञानरुपी अंधार व 'रु' या अक्षराने त्याचे निवारण करणारा ज्ञानरुपी प्रकाश प्रतीत होतो. अशा या अक्षरांनी 'गुरू' हा शद्ब बनतो. तो म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म होय.

म्हणून म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महोश्वरः । गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मैश्रीगुरवेनमः ।।



आज समाज वैचारिक ग्लानीत मुर्छा अनुभवत आहे. म्हणून आपण सारे मिळून प्रार्थना करू - मुर्छित समाजास गुरुकृपेने जागृतीचा आँख लाभो. जागृत नजरेच्या समाजपुरुषास हितकर पंख फुटोत. पुरुषार्थाचे पंख दोन! जप आणि तप! पहिला पंख वैश्विक शांती प्राप्त करणारा! दुसरा आंतरिक पावित्र्य प्रदान करणारा! हे दोन पंख पसरून समाजपुरुष गगन भरारी घेवो. गुरुकृपेन त्यास करुणा प्राप्त होवो. मुर्छित समाजात बुद्धसिद्धनिर्माण होवोत.


सर्वेsत्र सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयः ।

सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ।।

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Salyl Bhagwat
Salyl Bhagwat
Jul 05, 2020

पहिल्या गुरुला (जननीला) गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Jul 05, 2020

गुरू आणि शिक्षक यात सैद्धांतिक फरक आहे. गुरुचें विविध पैलु उलगडत, गुरुचे महत्व फार सुंदर रीतीने

दाखवले आहे।गुरु आणि गोविंद दोघे समोर आले तर आधी कोणाला नमस्कार करायला हवा तर गुरुनां आधी

नमस्कार का करायचा, ते छान सांगितले आहें. गुरु पोर्णीमेचे महत्व छान रीतीने दाखवले आहे. आभार.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page