Jagar Vidyadhishacha 2
- Smita Bhagwat
- Aug 28, 2020
- 3 min read
गणेशप्रिया दुर्वा
श्री गणेशास प्रिय दुर्वा.
दुर्वा एक प्रकारचे गवत आहे. त्यास हरळी असे म्हणतात. या प्रकारच्या गवताच्या पुढल्या तीन पानांना दुर्वा ही ओळख प्रदान केलेली आहे. या गवताचा रंग पाचूसारखा हिरवाकंच असतो. गणपतीस दुर्वा अतिप्रिय असल्याचे आपण बालपणापासून ऐकत आलो आहोत. मानवमात्र स्वकेंद्रित प्राणी आहे. तो स्वतःस प्राणी म्हणवून घेत नसला तरी! आपण देवाची (निसर्गाची) सर्वोत्तम निर्मिती आहोत, असे त्यास वाटते. कारण इतर प्राण्यांना अवगत नसलेली वाचासिद्धी मानवास मिळालेली आहे. मस्तकाचा उपयोग करण्याची मानवी क्षमताही अपार आहे. म्हणूनही त्यास प्राणी म्हणवून घेणे रुचत नाही. मस्तकाचा उपयोग करणाऱ्या मानवाचे कोणतेही कर्म हेतुशून्य नसते. मग गणेशास दुर्वा वाहण्याचे कामही हेतुपूर्णच असेल, असे मानण्यास नक्कीच जागा आहे! म्हणून...
आपल्या सणवारांचे हेतुपूर्ण रिवाज जाणून घेऊन तसे करणे, हे विचारशील मानवास शोभेसे नाही. यास भक्ती तर अजिबात म्हणता येणार नाही. आपल्या पूर्वजांनी मानवहिताचा विचार करून सर्व रिवाज निर्माण केले आहेत. निसर्गाने आपल्याला बुद्धी आणि विचारशक्तीची अमोल भेट दिली आहे. म्हणून कोणताही रिवाज यांत्रिकपणे अंमलात आणणे म्हणजे निसर्गाने प्रदान केलेल्या अमोल भेटीचा अवमान करणे ठरेल. गणेशास आपण विद्येची देवता तसेच ज्ञान विज्ञानाचे साक्षात रूप समजतो. म्हणून गणेशपर्वात ज्ञानाची कास धरून रिवाजांपाठचा अर्थ जाणून घेण्यास - वैचारिक जागर करण्यास महत्व आहे. चला तर मग सुरूवात करू, गणेशास दुर्वा वाहण्याचा प्रघात का पडला असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापासून!
या प्रश्नाचे अत्यंत सोपे उत्तर देण्यात येते – गणपतीला प्रिय म्हणून! पण मग हा प्रश्न नवा उपप्रश्न निर्माण करतो. प्रत्येक कर्म विचारपूर्वक करणारा मानव विनाकारण काहीही करत नाही. मग गणपतीला दुर्वा प्रिय आहेत, असे आपल्या पूर्वजांनी सांगण्यापाठचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर शोधताना यजुर्वेदात दुर्वेचे महत्व सांगणारा एक श्लोक वाचण्यात आला. काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि। एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन च।। (यजुर्वेद १३.२०) हे दुर्वा, एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर. म्हणजेच तुझा विस्तार करून आम्हाला समृद्ध कर. या प्रार्थनेपाठी महत्वाचे आर्थिक कारण असल्याचे जाणवते.
गणपती म्हणजे गणाचा अध्यक्ष! या प्रकारच्या लोकशाहीत त्यास राजाही म्हणत! वैदिक काळात गायी, घोडे, शेळ्यामेंढ्या.... सारे मानवाच्या उपयोगी पडणारे पशु! बैल-शेतीला! गाय-दूध, दही आणि तुपाला! घोडे प्रवासाला आणि युद्धाला! शेळ्यामेंढ्या मांस आणि वस्त्रांसाठी! (त्या काळी अधिकांश लोक पशुंचे चर्मा वस्त्र म्हणून धारण करत असत. या सर्वांचा आहार असलेल्या गवतास त्या वेळी अपार महत्व प्राप्त होणे स्वाभाविक होते. त्यातही हरळी प्रकारच्या गवतात अनेक गुण असल्याने हिरव्याकंच दुर्वा गणाध्यक्षास प्रिय असे म्हणण्यात आले. म्हणून राज्यात दुर्वांची भरपूर कुरणे असतील तर पशु ह्रष्टपुष्ट होतील आणि प्रजाजन समृद्ध होतील, हा हेतुपूर्ण विचार त्यापाठी आहे. शिवाय वैदिक काळी आपल्या पूर्वजात वाळलेल्या दुर्वांचाही खूप उपयोग करून घेण्याचे कौशल्य दिसून येई. वाळलेल्या दुर्वांची ते निगुतीने बसण्यासाठी आसने तयार करत.
मानवमात्रास मृत्यू नकोसा वाटतो. मानवी मनातही अमर होण्याची स्वाभाविक इच्छा असते. उन्हाळ्यात वाळलेले माळरान पाऊस पडताच हिरवेगार होते. शेकडो वर्ष सुप्तावस्थेत राहूनही दुर्वांकुर पाऊस पडताच तरारून वर येऊन सर्वत्र जीवनाचा आनंद पसरवतात. माणसाच्या मनातही आपल्या संततीच्या माध्यमातून अमर राहण्याची इच्छा प्रगट होते. दुर्वा गणपतीला अर्पण करून मानव परोक्षपणे अमरत्वाचे वरदान मागतो. राज्यात दुर्वेची भरपूर कुरणे असतील तर प्रजा समृद्ध होईल, हा विचार होता. कारण त्या वेळचे संपूर्ण जीवनचक्र हिरव्या गवतावर निर्भर होते. आताही तसेच आहे. भाद्रपदात सर्वत्र रानावनात हिरव्याकंच दुर्वा डोलू लागलेल्या दिसतात. पण पुढच्या पावसाळ्यापर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहण्याची गरज असते. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुंपासून या कुरणांचे रक्षण करावे, ही अपेक्षा असते. ती दुर्वांकूर वाहून व्यक्त करण्यात येते.
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवू शकतात. पर्वतांना आणि नद्यांच्या किनाऱ्यांना ढासळू देत नाही. (इरोशन) पाण्याला स्वछ आणि निर्मळ करतात. हिरवीगार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतात. सूर्यप्रकाशात प्राणवायू उत्सर्जित करतात. म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीनेही दुर्वेस महत्व आहे.
दुर्वा शब्दाची उत्पत्ती ‘दुर्व’ या धातूपासून झाली आहे. दुर्वा शब्दाचा अर्थ नष्ट करणे असा आहे. दुर्वा त्रिदोष नाशक असतात. वात, पित्त आणि कफ या दोषांना दुर्वा संतुलित करतात. म्हणून आयुर्वेदिक औषधात दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सकही (नॅचरोपॅथ) औषधात दुर्वेचा वापर करणे पसंत करू लागले आहेत. वैदिक ऋषी दुर्वेचे औषधी गुण जाणून होते.
जसे सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करण्यात येते, तसेच मानवी जीवनास स्वस्थ, पुष्ट आणि आरोग्य प्रदान करणारी दुर्वा गणाध्यक्ष - म्हणजेच राजाला अर्पण करून, त्याचाकडून दुर्वेची कुरणे सुरक्षित ठेवण्याची विनम्र विनंती करण्यात येते. त्याच परंपरेचे आपण आजही जतन करत आहोत. त्यासाठी आपण गणपतीला दुर्वा वाहून नतमस्तक होतो.
श्री गणेशाला २१ दुर्वा वाहण्याचा रिवाज हेतुपूर्ण आहे. श्री गणेशाला अर्पण करण्याच्या दुर्वा कोवळ्या असाव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्यात. समिधा एकत्र बांधतो, तशा दूर्वा एकत्र बांधाव्यात. एकत्रित बांधल्याने त्यांचा गंध खूप काळ टिकतो. दुर्वा अधिक काळ टवटवीत रहाव्यात, यासाठी त्यांना आधी पाण्यात भिजवाव्यात. दुर्वा वाहताना पात्यांचा भाग आपल्याकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाकडे असावा.
हे दुर्वांचे महत्व समजून घेऊन गणेशपूजा करताना अनोखा आनंद प्राप्त करा.
शुभम् भवतु.



वाह! दुर्वा गवत चा balancing इफेक्ट असतो हे योग्यांना आवडत असणार! तुझा ब्लॉग वाचून तुझी सांख्य भक्ती असेल असे वाटते... गणपती बाप्पा मोरया!
Very informative blog. Importance and valuable use of this Special type of grass is very well written.
खरे आहे. घाईत यांत्रिकतेने मंत्र म्हणण्यापेक्षा अर्थ समजून म्हटले तर अनिर्वचनिय आनंद मिळतो. पण वेळ नसल्याचा फोबिया एव्हढा आहे की छोट्या गोष्टीही त्या भयापोटी टाळून लोक निर्मळ आनंदास मुकतात.🤔😏🙏
दोन्ही लेख छान आहेत. माहिती खूप महत्त्वाची आहे. किती छोट्या गोष्टी सगळ्या चा अर्थ बदलतात
👌