Janma Sanskruticha
- Smita Bhagwat
- Apr 30, 2020
- 3 min read
जन्म संस्कृतीचा
माझ्या लहानपणी मानववंशशास्त्र (Anthropology) शब्द वापरात नव्हता. तरी त्याविषयीही आम्हाला अण्णा नि काकांच्या गप्पातून कळले. मानव ही सृष्टीची सर्वोत्तम निर्मिती! तरी तोही प्राणीच! इतर प्राण्यांसारख्या त्यास दोन भुका! पोटाची नि इंद्रियशमनाची! पुढे मानवदेहात मन नामक अदृश्य अवयव अवतरला. त्याने प्रश्नाच्या माध्यमातून मानवाची विचारशक्ती जागृत केली. प्रश्न जिज्ञासेचे रूप! उत्तरांना तो ज्ञान म्हणू लागला. मग मानवास, सोबती हवेसे वाटू लागले. एकट्याने भटकणारा मानव टोळी करून राहू लागला. अनेक टोळ्यातून गावे, शहरे, राज्ये, देश नि खंड निर्माण होणे हे मानवाच्या सहवासाच्या भुकेने, समाजाची निर्मिती करणे होते.
पुढे मानवास पडणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढू लागली. ज्ञानप्राप्तीची इच्छा त्याची तिसरी भूक ठरली. तिने मानवास इतर प्राण्यांपासून वेगळे केले! हिमालयाच्या खोऱ्यात नि अशिया खंडात या भूकेने वेग घेतला. त्यामुळे भारत, चीन नि जपान या देशात शेती होऊ लागली. पुढे फूल-फळांची निर्मिती, कापूस, त्यातून कापड नि वस्त्रे…. प्रगतीपथावर मानव धावत सुटला.
हिमालयात उगम पावलेल्या नद्यांच्या परिसरातील जमीन सुपिक! तिथल्या प्रजेच्या मनोभूमीतही सात्विक विचार प्रगटले. त्यामुळे हिमकन्यांच्या काठी वेदकाल अवतरला! या प्रजेच्या मनात यज्ञाचे आकर्षण! इथल्या सुबत्तेमुळे इतर प्रदेशातून लोक येऊ लागले. म्हणून मूळ प्रजेस आपली स्वतंत्र ओळख गरजेची वाटली. ते स्वतःस आर्य म्हणवू लागले. आर्य ही जात नसून सुसंस्कृत व्यक्तीसाठी वापरलेले विशेषण आहे! आर्य अधिक असलेला प्रदेश आर्यावर्त ठरला! आर्यांची ज्ञानाची भूक तीव्र! या भुकेस त्यांनी संस्कृती नाव दिले! संस्कृतीने मानवास इतर प्राण्यांहून उच्च स्तरावर नेले!
आर्य अभ्यासू! श्रुतीच्या माध्यमातून त्यांचे उच्चार स्पष्ट! खणखणीत! तसे उच्चार इतर लोकांना जमत नसत. स च्या जागी ते ह म्हणत. सिंधू म्हणताना त्यांच्या तोंडून हिंदू शब्द उमटे. त्यामुळे सिंधू नदीच्या पलिकडून आलेल्या प्रजेने या मूळ प्रजेस - आर्यांना हिंदू म्हटले. त्यामुळे आर्यांना आपली अधिक स्पष्ट आणि वेगळी ओळख निर्माण करणे हवेसे वाटले. त्यासाठी त्यांनी ध्वजाची निर्मिती करायचे ठरवले. ध्वज कसा असावा, या संदर्भात सविस्तर चर्चा केली. प्रातःकाळी मन प्रफुल्लीत असते तेव्हा उत्तम विचार सुचतात, हे त्यांना जाणवले होते. पंचमहाभूतांसाठी आर्यांच्या मनात कृतज्ञता! पहाटे प्राचीस सहस्त्ररश्मींच्या उगवत्या किरणांचा रंग, त्यांना यज्ञाच्या ज्वाळांसारखा वाटे. प्रभाती प्राजक्ताचा सडा पडतो. ही केशरी देठाची शुभ्र फुले आर्यांना खूप आवडत. एकही फूल स्वतःकडे न ठेवता सारी फुले वसुधेस अर्पण करणारा प्राजक्त त्यांना वैराग्याचे प्रतिक वाटे! देठाचा रंग प्रभातीच्या सूर्यकिरणाशी साधर्म साधतो, असेही! साकल्याने विचार करणाऱ्या कल्पक आर्यांच्या मनात देखणा विचार प्रगटला आणि त्यांनी प्राजक्ताच्या फुलांची देठे चुरडून पाण्यात घातली. त्यात पांढरे वस्त्र भिजवले. वस्त्राने प्राजक्ताच्या देठांच्या रंगाबरोबर सुगंधही आत्मसात केला. म्हणून आर्यांनी त्यास कौतुकाने पारिजात ध्वज म्हटले. सूर्यकिरणांचा नि यज्ञातील ज्वाळांचाही तोच रंग! म्हणून प्रसंगी त्यास ते अरुणकेतु, सूर्यकेतु, अग्निकेतुही म्हणत. अशा रीतीने आर्यांची भाषासमृद्धी वाढीस लागली.
मानवी तसेच सर्व सजीवांच्या जीवनास पंचमहाभुते पोषक असल्याचे आर्यांना जाणवले! म्हणून त्यांनी पंचमहाभुतांना देवत्व प्रदान केले. तेव्हढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सर्वाभूती परमेश्वर, हा विचार वाहता केला. प्रत्येक सजिवात देवत्व आहे, हे सूचित करण्यास विविध प्रतिकांची निर्मिती केली. त्यांची आयुधे, समृद्ध भाषा नि कल्पकता! या आयुधांच्या मदतीने त्यांनी रुपककथा रचल्या. ऋतुमानास अनुकूल ठरणारी आहार-विहार विशद करणारी संहिता तयार केली. त्यात ज्ञान-विज्ञानचे महत्व जपण्यास लोभस परंपरा निर्माण केल्या. या परंपरांचा गूढार्थ समजून घेणे हा सुखानुभवच!
प्रतिक म्हणजे मौनाची भाषा! परमशांतीचे संगीत! संस्कृतीचा महिमा गाणारे मूक गीत! त्यात बिंदुत सिंधूचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य! शब्दांविना संवादण्याची क्षमता! संकेतातून शास्त्राची रहस्ये उलगडण्याची क्षमता ध्वनित करणारे विज्ञान! प्रतिकोपासना म्हणजे जीवनाची खोली जाणण्याची साधना! पण पुढे अर्थ समजून घेणे थांबले नि यांत्रिकतेने परंपरा राबवल्या जाऊ लागल्या. म्हणून परंपरा अट्टाहास ठरल्या. हास्यातील आनंद आणि रुदनातील कारुण्य हरपले. सेवेतून समर्पणाचे उच्चाटन होऊन फळास प्राधान्य मिळाले. भक्तीतून तादात्म्य वजा झाल्यामुळे उरली नाही संसारात अनुरक्ती की सन्यासात विरक्ती! म्हणून प्रतिकोपासनेचे ज्ञान बाजुला राहून वाढीस लागली टर उडवण्याची उथळ मानसिकता! प्रतिकोपासनेसाठी मनमंदिरात दीप प्रज्वलीत होणे अपरिहार्य! प्रतिके लोभस सांस्कृतिक विचारधारा सहजतेने संक्षेपात प्रगट करतात. जसे संसारात विरक्त भावनेने राहणाऱ्यास जलकमलवत् म्हणणे पुरेसे ठरते.
प्रतिष्ठित प्रतिकात बिंदूत सिंधू सूचित करण्याचे सामर्थ्य आहेच, पण साध्या प्रतिकातही खोल अर्थ सामावला आहे. कुंकूमचर्चित कपाळ इंग्रजांच्या आगमनानंतर स्त्रीचा प्रांत ठरला. तरी महापूजेचा आरंभ पुरूषानेही कपाळी कुंकू आणि गंध रेखून करायचा असतो. कुंकवाचे स्थान दोन भुवयांच्या मध्ये! ती जागा आज्ञाचक्राची! आज्ञाचक्राने योग्य आज्ञा द्यावी, यासाठी आज्ञाचक्रास कुंकुंमाचा सन्मान! विविध प्रतिकांची उपासना समजून उमजून केल्यास ती अंधश्रद्धेऐवजी बौद्धिक कृती ठरेल. आणि वैचारिकदृष्ट्या जीवन अधिक समृद्ध होईल. सशक्त विचार करून हे पटल्यास अवश्य स्वीकारण्यात संकोच बाळगू नका. मंगळवारी आपण प्रतिष्ठित प्रतिकांचा विचार सुरू करू.


સુંદર વિવેચન !
वैष्णवी, मनापासून आभार. सुजाण कवयित्रीची कॉमेंट निश्चितच महत्वाची आहे. शिंग मोडून वासरात शिरण्याची मला आवड आहे. तरी वासरांना ते कितपत आवडतंय, ते बघण्याचीही उत्सुकता असतेे. आताच्या वेगवान काळात पाच वर्षात पिढी बदल होत असलेला जाणवत असल्याने विशेष! माझ्याहून वयाने लहान असलेल्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या वाटतात. मोठ्यांच्याही प्रतिक्रियांना महत्व आहेच, पण वय वाढतं तशी ज्येष्ठ मंडळी कमी होतात, ही जगरहाटी आहे. मंगळवारी स्वस्तिक प्रतिकासंदर्भात पोस्ट लिहिन. कशी वाटली ते कळणं आवडेल. पुनश्च आभार!
अतिशय सुंदर...संस्कृतीचा आरंभ...त्यात झालेले बदल...काळाच्या ओघात चुकीच्या पद्धतीने पूढे आलेले किंवा विस्मृतीत गेलेले...खूप छान मांडलत तुम्ही तेही अगदी कमी शब्दात...फार आवडलं..मला या प्राचीन संस्कृती तल्या प्रतिकांबद्दल खूप उत्सुकता आहे..इकडून तिकडून खूप वाचलं..आपण अजून सविस्तर लिहावं...स्त्री वाद्यांनी गुलामगिरी म्हणून नाकारलेली प्रतिकं..लिहा तुम्ही....कालच ओशोच्या एका प्रवचनात हा बिंदूत सिंधू कन्सेप्ट ऐकला आणि आज तुम्ही इतकं सुंदर लिहीलेलं वाचलं...खरंच आर्य हुषार..बुद्धीमान होतेच..म्हणूनच पुढे बहूदा जे जे उच्च दर्जाचे किंवा बुद्धिवंत आणि गुरूप्रमाणे त्याच्या नामोल्लेखात आर्य हा शब्द येतो..
अजून खूप लिहा..खूप आहे तुमच्याकडे..आमच्या साठी जेवढं घेऊ तेवढं थोडं आहे
अतिशय सुंदर...संस्कृतीचा आरंभ...त्यात झालेले बदल...काळाच्या ओघात चुकीच्या पद्धतीने पूढे आलेले किंवा विस्मृतीत गेलेले...खूप छान मांडलत तुम्ही तेही अगदी कमी शब्दात...फार आवडलं..मला या प्राचीन संस्कृती तल्या प्रतिकांबद्दल खूप उत्सुकता आहे..इकडून तिकडून खूप वाचलं..आपण अजून सविस्तर लिहावं...स्त्री वाद्यांनी गुलामगिरी म्हणून नाकारलेली प्रतिकं..लिहा तुम्ही....कालच ओशोच्या एका प्रवचनात हा बिंदूत सिंधू कन्सेप्ट ऐकला आणि आज तुम्ही इतकं सुंदर लिहीलेलं वाचलं...खरंच आर्य हुषार..बुद्धीमान होतेच..म्हणूनच पुढे बहूदा जे जे उच्च दर्जाचे किंवा बुद्धिवंत आणि गुरूप्रमाणे त्याच्या नामोल्लेखात आर्य हा शब्द येतो..
अजून खूप लिहा..खूप आहे तुमच्याकडे..आमच्या साठी जेवढं घेऊ तेवढं थोडं आहे
प्रशांत मत मांडल्याबद्दल मनापासून आभार. यात औपचारिकता नाही. नव्या पिढीच्या लोकांना ही माहिती कळावी आणि त्यांनी त्यांच्या मुलांना द्यावी,या हेतुने ही स्मृतींची माळ ओवायला घेतली आहे. ती नव्या पिढीस कंटाळवाणी तर वाटत नाही ना, हा प्रश्न मनात आहे. तुमच्या प्रतिक्रियेमुळे पावती मिळल्यागत विश्वास निर्माण झाला. म्हणून आभार.