Kalash
- Smita Bhagwat
- May 7, 2020
- 3 min read
कलश
भ्रातः कांचनलेपगोपितबहिस्ताम्राकृते सर्वतो। मा भैषी कलशः स्थिरो भव चिरं देवालयस्योपरि ।।
ताम्रत्वं गतमेद कांचनमयी कीरितिःस्थरा तेSधुना । नान्सतत्त्वविचारप्रणयिनी लोका बहिर्बुद्धय ।।
सुवर्णलेपनाने ताम्ररूप झाकले गेलेल्या कलशा, तू भय न बाळगता मंदिराच्या शिखरावर चिरकाळ स्थिर अस! तुझी कांचनमय किर्ती चिरस्थायी झाल्यामुळे, तुझे ताम्रपण लोपले आहे. अंतर्दर्शन कळण्याची क्षमता असणाऱ्या सुजाणांना तुझे महत्व कळते. ते बाह्यरुप बघून तुझे ताम्रपण उघडे पाडणार नाहीत. हे आहे मंदिराच्या सोनेरी कलशाचे वर्णन! कांचनाहून किर्ती महान आणि सुवर्णहून सोनेरी जीवन श्रेष्ठ, या भावनेचा उद्घोष! मंदिराच्या शिखराचे स्थान प्राप्त केलेल्या कलशाने किर्तीमय जीवन प्राप्त केले असल्याने त्यास मुळच्या हीनतेचे भय नाही. तद्वत हीन कुळात जन्मलेला, महान कार्य करून बुलंदीस पोहोचला की त्यास कुळाचे लांछन उरत नाही. महर्षी वाल्मिकी, जन्माने कोळी असले तरी ते हीन ठरत नाहीत. सत्कर्माची किर्ती सुवर्णाच्या तेजास फिके पाडते, असा
यात गूढार्थ सामावलेला आहे.
भारतीय संस्कृतीत जन्माहून कर्तृत्वास अधिक महत्व आहे. भावपूर्ण जीवन ही भारतियांची खासियत! भावना बदलताच व्यवहार बदलतो. शेंदूरलेपन होताच दगडाचा देव होतो. भावना म्हणजे जीवन नि भावशून्यता हा मृत्यू!
म्हणून म्हटले आहे,,,
‘देवे तीर्थे द्विजे मंत्रे दैवेज्ञे भेषजे गिरौ । यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी ।।‘
देव, तीर्थ, ब्राह्मण, मंत्र, वैद्य, ज्योतिषी, गुरू… विषयी भावना बाळगावी तसे फळ मिळते. म्हणून आर्यांनी सूर्यास उष्ण गोळा न म्हणता, सूर्यदेव म्हटले. पावसाच्या पाण्यास वरुणदेव समजून पूजनाचा अधिकार दिला. कलश वरुणदेवतेचेही प्रतीक!
हिमकन्यांच्या तीरी आर्य संस्कृती विकासित होत होती. तेव्हा पाऊस पडला नाही तर सारे नष्ट होईल, हे त्यांना जाणवले. पाऊस वर्षभर नसतो! वरुणदेवांची उपासना वर्षभर कशी करता येईल, असा त्यांना प्रश्न पडला. उत्तर शोधताना त्यांना तलाव, विहिरी, नाले, निर्झर, नद्या, समुद्र… सारे जलप्रवाह पावसामुळे छलकतात, हे जाणवले. म्हणून कलशात पाणी घेऊन त्यात वरुणदेवतेचे दर्शन नि उपासना करणे सुचले. त्यांनी रसाधिराज वरुणदेवाची कलशात स्थापना केली. कलश भारतीय संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक बनला, असे अभ्यासक म्हणतात.
वरुणदेवाचा आदर करण्यास शुभप्रसंगी कलशाच्या साक्षीने पुण्यहवाचन करतात. कलशास वंदन करून गणेशस्थापना होते. स्वस्तिक रेखाटन आणि कलशस्थापना होताच सूर्य आणि वरुण आसनस्थ झाल्याची भावना अभिभूत करते. कलशातील पाणी, सामान्य जल असूनही, कलशस्थापना होताच त्यास वरुणदेवाची ओजस्विता प्राप्त होते.
तत्त्वायामि ब्राह्मणी वंदमान स्तदाशास्ते यजमानो हविर्भिः। एहळेमानो वरूणोहवोध्यु मा न आयुः प्रमोषीः ।।
म्हणजे हे वरूणदेवा, तुला प्रणाम करून यज्ञात आहुति देणारा मी, तू आमच्या आयुष्यात घट करू नकोस, अशी याचना करतो. हा श्लोक वरूणास निमंत्रित करतो. वरूणदेवाची प्रतिष्ठापना करून त्या दिव्य जलाचा देहावर अभिषेक करत प्रार्थना करतात. कलशवंदनेचा श्लोक अत्यंत भावपूर्ण आहे. या भावनेमुळे कलशात पिंडात सामावणाऱ्या ब्रह्मांडाची व्यापकता स्थापित होते. आर्यांनी छोट्या तांब्याच्या प्रतीकात सर्व देव, वेद, समुद्र, नद्या, गायत्री, सावित्री, सरस्वती… यांची स्थापना केली. निखळ शांतीच्या भावनेतून सर्व समावेशक भावना साकार करण्याचा हा प्रयास आहे भव्य आणि लोभस!
मोठ्या कलशास कुंभ म्हणतात. नव्या घरात प्रवेशताना प्रथम जलकुंभ ठेवण्याची प्रथा आहे. जलपूर्ण कुंभासाराखे नवे घर भावपूर्ण आणि नवपल्लवित व्हावे असा मंगल आशय यात यूचित होतो. कलश किंवा कुंभावर हिरवीकंच पाने आणि त्यावर श्रीफळ ठेवल्याने त्याची शोभा वाढते. काही ठिकाणी महानुभावांचे स्वागत करताना डोईवर श्रीफळयुक्त कलश ठेवलेल्या कुमारिकांनी सामोरे जाण्याची प्रथा आहे. देवदर्शन घेतले पण मंदिराचा कळस बघितला नाही तर दर्शनास पूर्णत्व लाभत नाही. कलश म्हणजे टोक वा अंतिम अवस्था! म्हणून ज्ञानदेव माऊलींनी गीतेस मंदिर आणि शेवटच्या अध्यायास कळशाध्याय म्हटले.
गुजराथेत नवरात्रात देवीपूजनात कलशास महत्व असते. पण या कलशात प्रज्वलीत दीप ठेवतात. अशा पूजेस गरबा म्हणतात. कलशातील दीप विझू नये यासाठी कलशास गवाक्षासारखी भोके पाडतात. या कृतीस गरबा कोरणे म्हणतात. अशा कलशात दीप ठेऊन स्त्रिया अंबामातेभोवती फेर धरतात, त्यास गरबा घुमणे म्हणतात. पूजेतील मूळ आशय जाणून न घेता हल्ली त्याचा विपर्यास झालेला दिसतो वस्तुतः गरबा, गर्भदीप शब्दाचा अपभ्रंश आहे. देहास घट आणि आत्म्यास दीप म्हणण्याचा रीवाज आहे. घट फोडून आत्मदीप मुक्त होतो, ते निधन! गुजराथी भाषेत घटस्फोट शब्दाचा गूढार्थ मरण आहे.
कलश हे मानवी देहाचेही प्रतीक आहे. देह पवित्र आणि दर्शनीय आहे. पण कुठवर? जीवनरूपी जल आणि प्राणरूपी ज्योत तेवत असेल तोवर! निष्प्राण देह, देवहीन मंदिर! अभद्र! कलशातील पाणी विश्वातील अगाध जलराशींचा अंश आहे. तद्वत देहरूपी कलशात वास्तव्य करणारा जीवात्मा हा विश्वातील व्यापक चैतन्याचा अंश आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “ममैवांशी जीवलोके जीवभूतः सनातन।” संत तुलसीदास म्हणतात - ईश्वर अंश अविनाशी, चेतन, अमल सुखराशि! देहरूपी घटातील जलरूपी जीवात्मा, घटाचा स्फोट घडवून आणून विश्वातील प्रगाढ चैतन्यप्रवाहात मिसळणे ही जीवनमुक्ती! अशी मुक्ती मानवी जीवनाची सिद्धी! सामान्य जलबिंदूत सिंधुदर्शन करवणारा कलश पूर्णतेच्या अनुभूतीचे प्रतीक! म्हणून पूर्णत्व प्राप्त करण्याच्या इच्छेचे प्रतीक ठरला!
ज्यास हल्ली गरबा म्हणतात, त्या मुळातील कलशाचे खाली चित्र आहे. या मातीच्या कलशास गवाक्षासारखी भोके कोरलेली आहेत, तो हा गर्भदीप.
या मोत्यानंतर आपण ओवणार असलेल्या मोत्याचे नाव आहे कमळ!



सुंदर माहिती, स्मिता मावशी ! आपल्या परंपरेतील प्रतीके त्यामागचे गर्भितार्थ समजून घेताना पूर्वजांविषयीचा आदर भरून येतो
धन्यवाद अमोल. तुमच्या आणि त्याही पुढच्या पिढीसाठीच ब्लॉगच्या पहिल्या सप्ताहाचे लेखन केलेले आहे. ते तुम्हाला आवडले आणि तुम्ही ते कळवले, यासाचा आनंद आहे. पुनश्च धन्यवाद.
ब्लॉग खूप चांगला आहे. तुम्ही खूप चांगला फॉन्ट निवडला आहे. मी ब्लॉग वाचक नाही परंतु फॉन्टमुळे मला आपला ब्लॉग वाचण्यास भाग पाडतो. माहिती खूप चांगली आहे आणि कृपया लिहीणे सुरू ठेवा. मातृदिनाच्या शुभेच्छा
तू आणि काहींनी फोन करून मला हा गर्भदीप थोडा विद्रुप का आहे, ते विचारले म्हणून सर्वांसाठी हे उत्तर - धोळावीरा या ठिकाणी केलेल्या उत्खननात सापडलेला हा प्राचीन गर्भदीप आहे. तो भट्टीत विशिष्ठ रीतीने अधिक पक्का केलेला मातीचा घट आहे. जमिनीत खूप काळ दाटला गेला असूनही तो फुटला नाही, हे त्याचे वैशिष्ठ्य! त्याचा आकार थोडा बदलला (डिफॉर्म) झाला असला तरी मोहेंजोदरा हरप्पा काळच्या सिव्हिलायझेशनच्या दृष्टिने त्यास महत्व आहे. म्हणून तो खास जपण्यात आला आहे.
तुम्हा सर्वांच्या फोनमुळे हे विशद करण्याची संधी मिळाली, हे मला आवडले.
खूप छान माहिती मिळाली. ह्यात ले सर्व मला माहित न्हवते.👌👌👌