Kamal (Lotus)
- Smita Bhagwat
- May 11, 2020
- 3 min read
Updated: May 13, 2020
कमळ
नालस्य प्रसरो जलेष्वपि कृतावास्सय कोषेरुचिर्दंडे। कर्कशता मुखेSतिमृदुता मित्रे महान्प्रश्नयः ।।
आमूलं गुणासंग्रहव्यसनिता द्वेषश्च दोषाकरे। यस्यैषा स्थितिरम्बुजस्य वसतियुक्त्तैवतत्र श्रियः ।।
ज्याची नाळ जळात असूनही ज्याचा सुगंध अनेक कोस दूर दरवळतो, ज्याचा दंड (देठ) मृदू नसूनही मुख अतिकोमल आहे, ज्यास मित्रांचा विश्वास वाटतो, ज्यास गुणसंग्रहाचे व्यसन आणि दोषांचा द्वेष (नावड) आहे, तशा पाण्यात जन्मलेल्या कमळात लक्ष्मीचे वास्तव्य असणे योग्यच आहे!
आर्यांनी निर्माण केलेल्या भारतीय संस्कृतीतील प्रतिकोपासनेत कमळास अनन्य स्थान आहे. आर्यांची श्रेष्ठ विचारधारा आणि अनुपम जीवनश्रेणी यांचा सुभग समन्वय या प्रतिकात दिसून येतो. म्हणून कमळास आर्यनिर्मित भारतीय संस्कृतीचा पर्याय समजतात. भगवान विष्णुंच्या हातातील कमळ पाहून संत ज्ञानेश्वरांना सुंदर कल्पना सुचली. हाती कमळ घेणाऱ्या प्रभूंच्या मनात ज्ञानी भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा आहे, असे त्यांना वाटते. भक्ताने देवपूजा करणे, ही सामान्य बाब! पण प्रभूने भक्ताची पूजा करण्याची अभिलाषा बाळगणे, हे भक्ताचे महत्व सूचित करणारी लोभस कृती! सुंदरता प्राप्त करण्यासाठी सुंदर व्हावे लागते. कमलवत् जीवन जगणाऱ्यास कमल प्राप्त होते, असा गूढार्थ यातून प्रगट होतो.
आर्यांनी कमळाचे विविध अंगाने गुणगान केले आहे. गीतेत कमळास जीवन जगण्याचा आदर्श ठरवून भगवान म्हणतात…
“ब्रह्मण्या ध्याय कर्मणि संङ्ग त्यक्वा करोति यः। लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ।।“
आसक्ती रहित ब्रह्मार्पण वृत्तीने कर्म करतात, ते पाण्यात राहून कोरडे राहणाऱ्या कमलासारखे पापापासून अलिप्त राहतात. हा विचार संत कबीर थोड्या वेगळ्या रीतीने व्यक्त करतात. जीवनरूपी चादर काळजीपूर्वक वापरून होती तशी ठेवण्याचा विचार सादर करताना ते म्हणतात, “दास कबीरने जतनसे ओढी, ज्यो की त्यो धरि दीनी चदरिया…” कमलवत् जगण्याची क्रिया गीतेत अकर्मण्यावस्थेची पराकाष्ठा ठरवण्यात आली आहे!
चिखलात जन्मलेल्या कमळाची प्रतिकोपासना करून आर्यांनी परिस्थिती निरपेक्ष विचार व्यक्त केला आहे. आसपास चिखलाचे साम्राज्य असूनही कमळ रडगाणे रडत नाही. चिखलातून ‘वर’ उठते. कमळाची नजर फक्त त्यास फुलवू शकणाऱ्या सूर्यावर स्थिर असते. सूर्योदय झाला की उमलून सूर्यास्तास मिटणे ही सूर्यभक्तीची नि तेजाच्या पूजेची चरमसीमा आहे. अशी पूजा करण्याचा वसा घेणाऱ्यास आजुबाजुचे वातावरण कलुषित करू शकत नाही. त्याचा विकास कुणीही रोखू शकत नाही. म्हणून राक्षसघरी जन्मलेला प्रल्हाद, भक्तश्रेष्ठाचे पद प्राप्त करतो. काटेरी फांद्यातून वाट काढणारा कर्मव्यस्त गुलाब सर्वत्र सुगंधाची उधळण करतो.
मानव परिस्थितीचा गुलाम वा पराधीन आहे, हा नैराश्यसूचक विचार आर्यांना मंजूर नाही. हीन कुळात जन्मलेली व्यक्ती कर्तृत्व गाजवून स्वतःचे उर्ध्वीकरण करू शकते. हा विचार आर्यांनी निर्माण केलेल्या तत्त्वज्ञानात अग्रभागी आहे. कर्दमाच्या गलिच्छ अंधारात जन्मूनही तेजाची पूजा करून विकास पावणारे कमळ नामक प्रतिक, त्याचे उत्तम उदाहरण आहे!
कमळ सौंदर्याचेही प्रतिक आहे! परमेशाचे वर्णन करताना, आर्य वारंवार कमळाची उपमा देत. हस्तकमल, नेत्रकमल, शिरकमल, करकमल…. साहित्यातून कमळ दूर करणे म्बणजे माता सरस्वतीचा शृंगार हिरावणे ठरेल. ज्याच्या साहित्याच्या संदर्भात ‘उपमा कालिदासस्य’ असे म्हणण्यात येते, त्या कालिदासाच्या साहित्यात आणि पंडितराज जगन्नाथांच्या अन्योक्तीत वारंवार कमळाची वर्णी लागलेली दिसते. राजा भर्तृहरी म्हणतात, “कमळविहिन सरोवराचे दृश्य माझ्या ह्रदयात शूळ भोसकल्याची वेदना निर्माण करते!“ पाणी आणि कमळाची शोभा अन्योन्याश्रयी आहेत! म्हणून म्हणतात, “पयसा कमल कमलेन पयः पयसा कमलेन विभति सरः“ पाण्यामुळे कमळास आणि कमळामुळे पाण्यास शोभा येते. पाणी आणि कमळे सरोवराची शोभा आहेत.
असंख्य पाकळ्या असलेल्या कमळास शतदल वा सहस्त्रदल म्हणतात. या पाकळ्या भारतीय संस्कृतीच्या अनेक जाती, जमाती, संप्रदाय आणि पंथांचे प्रतीक आहेत. फुलांच्या परागाकडे आकृष्ट होऊन भ्रमर फुलांवर झेप घेतात. तद्वत वेदांच्या ज्ञानपरागांकडे आकृष्ट होऊन जगातील सुजाण मानवभ्रमर आर्यांनी निर्माण केलेल्या भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होतात. विश्वाच्या कोनाकोपऱ्यात भारतीय संस्कृतीचे गुणगान होते. कमळ म्हणजे आदर्श अनासक्ती! मांगल्याचा महिमा! प्रकाशाचे पूजन! सौंदर्याचे सर्जन, आणि आदर्श मानवी जीवनाचे दर्शन! म्हणून त्याचा समावेश देव नामक संकल्पनेत आदराने केला जातो. ब्रह्मा कमलासनी, विष्णू कमलहस्त, लक्ष्मी कमलजा आणि सूर्यास नभाच्या नील सरोवरातील रक्तकमळ म्हणतात.
एक कवि कमळास उद्देशून म्हणतो, “हे पुंडरिका, (श्वेत कमळ) लोकधात्री लक्ष्मी तुझ्यात निवास करते. जगन्मित्र सूर्याची तुझ्यावर अपार प्रीती आहे, भ्रमरास तुझ्या प्रेमात कैदी होणे आवडते, कोणत्याही फुलाशी तुझी तुलना होऊ शकत नाही. तुझ्यासारखा तूच!“
माझी अम्मा (आई) रांगोळीत कमळ, फुले तसेच चैत्र पाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत चैत्रांगण काढत असे. रांगोळीची शोभा वाढेल अशा ठिकाणी हळद आणि कुंकू यांचे ठिपके ठेवत असे. या जागरात विजूच्या स्मृतीगंधात मातेच्य सुरेख रांगोळीतील कमळाचे स्मरण करणे स्मिताला आनंदाचे वाटते.
आर्यांच्या परंपरेतील रांगोळी नामक मोती आपण पुढे ओवणारच आहोत.



सायली, धन्यवादहून खूप काही अधिक.
दाखले, अनेकविध संदर्भ, संस्कृत श्लोकांसह तुमची लेखनकमळे अशीच फुलत राहोत आणि आम्हा वाचकांना सुखवत राहोत!
test
वाचून आनंद झाला. लव्ह यू ऑल.
Wow...I like lotus, now added more respect. Very good article.