Kojagarati?
- Smita Bhagwat
- Oct 30, 2020
- 7 min read
Updated: Oct 30, 2020
आज शरदपौर्णिमा! महादेवीच्या जागराची पूर्णता करताना देवी भक्तांना कोsजागरती, हा प्रश्न विचारून कृपेचा वर्षाव करते तो दिवस! त्या दिवसापर्यंत आपण देवीभक्तीचे स्मरण करून इथे दीर्घकथा सादर करण्याचा वेगळा जागर केला. त्या दिर्घकथेचा हा शेवटचा भाग
तिसऱ्या दिवशी सकाळी पुजारी विष्णुभट देवळाच्या गाभाऱ्यात शिरले. स्तोत्र पठण करत ते निर्माल्य गोळा करत असताना त्यांच्या बोटास काही टोचले. पुजेच्या फुलात काटे नसावेत हा दंडक सारे कसोशीने पात. यासाठी खूप दक्षता घेण्यात येई. म्हणून त्यांनी तो भास ठरवला. पण पुन्हा टोचले. अधिक जोरात! कळवळून त्यांनी बोट बघितले. बोटावर रक्ताचा टपोरा थेंब दिसला. नवलाने ते निर्माल्य निरखू लागले, पण काही विशेष दिसले नाही. पण बोटावरील रक्त संशय शमू देत नव्हता. म्हणून बरेच निर्माल्य हात घेऊन त्यांनी मूठ आवळली. हातास अनेक सुया भोसकल्यागत वेदना झाली. हे गौडबंगाल कळेना नि काय करावे ते सुचेना. आश्चर्याचा भर ओसरला आणि त्यांनी निर्माल्य तबकात पसरले. निर्माल्यातील फूल-पत्रीत त्यांना खडीचे छोटे तुकडे दिसले. निर्माल्यात कपची? त्यांनी नवलाने मातेच्या मुखाकडे बघितले. मूर्तीच्या मुखाकृतीत बदल झाल्याचा त्यांना संशय आला. मातेच्या मुखमंडलावरून हात फिरवला तर तो स्पर्श खडबडीत वाटला. हे त्यांच्या आकलशक्तीच्या पलिकडचे होते. मातेच्या चरणाशी फतकल मारून ते हमसाहमशी रडू लागले. घरात कुणाचा मृत्यू झाल्यागत! शून्यात हरवलेल्या अवस्थेत! कितीतरी वेळ!!!!
बऱ्याच वेळाने शून्यतेवर विचारांचा चरा उमटला. मंदिराच्या नि मूर्तीच्या मालकास तसेच नगरपालास हे कळवण्याची गरज जाणवली. फरपटत्या चालीने ते मंदिराबाहेर गेले. सफाई करणारा मुलगा अंगण झाडत होता. त्यानी हाताच्या इशाऱ्याने त्यास बोलावले. पण तोंडून शब्द फुटेना. त्यांची विपरीत मुद्रा पाहून मुलगा झाडू टाकून त्यांच्याकडे धावला. विष्णुभटाचे डोळे अश्रुंचे अक्षयपात्रासारखे वाहात होते. दाटलेला कंठ बोलू देत नव्हता. तरी प्रयत्नाची शर्थ करून त्यांनी हातवारे करत चाचरत या तिघांना सत्वर बोलवून आणण्याचा आदेश दिला. अश्रू आवरेनासे झाल्याने ते पाठमोरे झाले. तो मुलगा नवलाने त्यांच्याकडे बघत होता. त्याची नजर टोचल्यागत त्यांनी मागे वळून बघितले. त्यास जागीच खिळलेला पाहून त्यांनी पटकन जा अशी खूण केली. तो धावत सुटला. श्रेष्ठी चंदनदास यांचे घर जवळ होते. तो प्रथम तिथे गेला. निरोप ऐकून चंदनदास बुचकळ्यात पडले. त्यांनी कारण विचारले. पण मुलास ठाऊक नव्हते. त्याने फक्त पुजाऱ्याची विपरीत अवस्था नेमकेपणी सांगितली. इतरांना निरोप द्यायची त्यास घाई होती. चंदनदासांनी मुलास ते इतरांना घेऊन येतील, असे विष्णुभटास सांगायला पिटाळले. काळजीने त्रस्त झालेले चंदनदास स्नानाचा मोह टाळून लगेच पडले.
गोंधळल्या मनाने तिघे सत्वर मंदिरात गेले. तोवर विष्णुभटाचा आवेश ओसरला होता. त्यांनी देवीच्या गाभाऱ्याची सफाई केली. समस्त निर्माल्यातून दगडी कपची वेगळी काढून वाटीत ठेवली होती. पण सारे दिसताच पुन्हा हुंदका अनावर झाला. त्यांची भकास मुद्रा पाहून सारे घाबरले.
"काय झाले?" कोतवाल चंडवर्माच्या स्वरात कुतूहलमिश्रीत अधिकाराचे पडसाद होते.
"काय सांगू? भुताटकी की हा मातेचा प्रकोप तेच कळत नाही. हे बघण्यापेक्षा मी मेलो असतो तर बरे झाले असते!" विष्णुभटाच्या उत्तराने उलगडा झाला नाही. त्यांचे रडणे थांबत नव्हते. तिघे बावरले. अर्थहीनपणे भिरभिरणारी चंडवर्माची नजर कपचीभरल्या वाटीवर खिळली. नकळत ते उद्गारले, "हे काय? प्रसादाच्या वाटीत कपची का भरलीय?"
"कपचीचेच रामायण आहे.... !" विष्णुभट घटीत सांगून कळवळले, "मी प्रतिष्ठापना केलेली मातेची मूर्ती खंडीत झालेली पाहण्यापेक्षा माझ्या देहाची कपची आसमंतात का उधळली नाही?" ते पुन्हा रडू लागले.
"हे नीच काम केले कुणी?" संतापाने चंडवर्मा ओरडले "कुणाला जीव नकोसा झाला आहे?"
"ते ठाऊक नाही! काल रोजच्यासारखी मी सांध्यपूजा केली. मंदिराच्या महादरवाजास कुलूप लावले. गर्भगृहापासची अर्गला बंद करून घरी गेलो. महादरवाजाशी पहारा असतो. सकाळी आलो तेव्हा कुलूप मीच काढले. आत आलो तर हा प्रकार! लगेच मी अर्गलकडे धावलो. अर्गला बंद होती. सध्या यवनांच्या भयाची लटकती तलवार आहे. ते मूर्तीभंजक! कुणा चांडाळाने मंदिरात शिरून मातेची मूर्ती खंडित केली असेल. त्याने घाव मातेच्या मूर्तीवर नव्हे तर माझ्या काळजावर घातले, असे वाटते मला!" पुन्हा विष्णुभटास रडू कोसळले.
"नगरपाल!" श्रेष्ठी चंदनदास कळवळले, "आता दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी लागेल. त्या आधी समस्त देवालयाची शुद्धीही करावी लागेल. याचा खर्च खूप! युद्धामुळे व्यापार थंड पडला आहे. हा खर्च कसा झेपणार ते कळत नाही मला! शिवाय हा देवीचा कोप असला तर ते गळक्या घड्यात पाणी भरणे ठरेल...."
"खर्चासाठी वर्गणी जमवता येते. शांतिपाठ प्रकोप शांतवतो. पण..." मूर्तीचे मालक विजयेंद्रजींच्या कंठात आवंढा अडकला, "या मूर्तीत माझा प्राण आहे. मातेने मला साद घातली तो क्षण आजही मला स्पष्ट आठवतो!" त्यांची नजर अतीतात उतरली. "त्या अपरात्री मला मध्यरात्री जाग आली. अचानक गूढ अस्वस्थता दाटली. मला जसा बिछाना टोचू लागला. म्हणून पहाटही झाली नसताना मी उठून घराबाहेर पडलो. अज्ञात शक्ती मी कधीच जात नसे त्या खडकाळ टेकड्यांच्या परिसरात नेत होती. अचानक सोसाट्चा वारा सुटला. वृक्षांच्या फांद्या मोडून पडत होत्या. तरी भानभूल्या अवस्थेत मी टेकडीच्या विशिष्ठ भागात पोहोचलो. प्रथमच! तिथे पानाचा खच पडला होता. अचानक अपरिचित सुस्वर कानी पडला. मी आवाजाच्या दिशेने बघितले तर कोसळलेल्या झाडाच्या फांद्यातून मला मातेचा हात दिसला. साक्षात जगदंबा मला साद घालत असल्याची भावना ह्रदयात हिंदकळली. मातेच्या हातावरील फांद्या दूर करताच मला समग्र देवीदर्शन घडले. काळजात धडधड दाटली. उत्साहाने मी मातेस छातीशी धरले की मी मातेच्या कुशीत शारलो, याचा मलाही उमज पडला नाही. मी नखशिखांत मोहरलो. मातेला छातीशी घट्ट धरून मी घरी पोहोचलो तरी त्या भानभूल्या अवस्थेस नख लागले नाही. या जगदंबेशी माझी जन्मजन्मांतरीची जवळीक आहे, असे वाटले मला! तशी जवळीक नव्या मूर्तीशी जडणार नाही! ही मूर्ती मंदिरातून दूर होताच मी जीभ करडून प्राण देईन. अर्ध्या रस्त्यात का माझा त्याग केलास ते मातेस विचारायला स्वर्गाचे ठोठावण्यास मी धाव घेईन!!"
"शांत व्हा भूदेव! स्वयंभू मूर्ती बदलण्याची गरज नाही!" मातेच्या मुखावर नजर खिळलेले विष्णुभट उद्गारले.
"पण खंडित मूर्ती भ्रष्ट ठरवतात ना?" चंडवर्माने विचारले.
"होय. पण मला वाटते हा मातेचा प्रकोप नाही!" विष्णुभटांच्या स्वरात श्रद्धा झंकारली, "तुम्हाला पाहून माझ्या दुःखाचा भर ओसरला. मातेकडे बघितले तर मला तिच्या मुखावर वत्सल भाव दिसले. मातेच्या चामुंडा रुपास वत्सल जगन्मातेच्या स्वरुपात प्रगटण्याची इच्छा असावी, असे वाटले. म्हणून मला मंदिराचे शुद्धिकरण पुरेसे वाटते!" साऱ्यांनी मातेकडे निरखून बघितले. जाणवलेल्या बदलाने सारे विचारात हरवलेे! या घटनेचे अर्थघटन करू लागले. पक्षाचे पीस पडले तरी आवाज यावा अशी शांतता दाटली.
"शुद्धीकरणाचा विचार मला पटतो... " नगरपाल चंडवर्मा भारावल्या स्वरात म्हणाले, "मला वेगळ्या प्रकारच्या शुद्धीकरणाची एषणा आहे!" साऱ्यांच्या मुद्रेवर प्रश्न उमटला. "स्वयंभू मूर्तीचा योग्य बंदोबस्त असूनही मंदिरात शिरून कुणी मूर्ती भ्रष्ट केली तर तो माझ्या अक्षमतेचा पुरावा ठरेल!"
"तुम्हाला कुणी दोष दिलेला नाही! खर्च उचलण्यासाठी बहाणे काढू नका!" श्रेष्ठी चंदनदास म्हणाले.
"खर्च पेलण्याची क्षमता माझ्यात नाहीय, श्रेष्ठी! कुणी दोष दिल्या न दिल्याने वस्तुस्थिती बदलत नाही. ही घटना षट्कर्णी होऊन नगरात पसरली तर प्रजेच्या मनात नगरपालाविषयी संदेह निर्माण होईल. शत्रुचे फावेल. मला वाटते ही घटना आपणा चौघांनाच ठाऊक आहे तर..."
"काय? तुमची अब्रू जपण्यास आई जगदंबेस शुद्धीकरणापासून वंचित ठेवणे कुणासही पटणार नाही!" विष्णुभट संतापले.
"तुम्ही मी काय म्हणतो ते पूर्णपणे ऐका हो!" नगरपाल कळवळले. पटत नसूनही साऱ्यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली, "शुद्धीकरण झालेच पाहिजे. फक्त पारंपारिक पद्धतीने ते करण्याचा आग्रह नको, अशी मी विनंती करतो. न करे नारायण आणि ही बातमी फुटली तर बौद्ध भिख्खू आणि यवन आपापल्या धर्माचा प्रसार करायला टपलेलेच आहेत. पुरजनांच्या मनात विष कालवून ते बाटवण्याचे सत्र सुरू करतील. विष्णुभटांनी लक्ष वेधले म्हणून मी मातेस निरखले. त्यात समाधी लागली नि मातेच्या मुखावर आश्वासक भाव पाहून मी उन्मनी अवस्थेत गेलो. यावेळी माता मला साद घालत असल्याचे जाणवलेे!" सारे चमकले. चंडवर्म भारावल्या स्वरात बोलतच होते, "मला गदागदा हलवून मातेने माझ्याशी संवाद साधला. अवघा देह शहारण्लायाजोगा. आई जगदंबा आदेश देत होती - मला स्पर्श करण्याचे साहस केले त्या पाप्याच्या रक्ताने माझे पादप्रक्षालन कर. तेच माझे शुद्धीकरण! केवळ मंत्रजागर करून शुद्धिकरण होत नाही. प्रसंगी वेगळ्या प्रकारचे शुद्धिकरण योग्य आणि हितकर असते. मलाही वाटते की परधर्माच्या आक्रमणास खीळ घालायची तर हा उत्तम उपाय आहे!"
क्षणभर वातावरणात मौन दाटले. चंडवर्माचा विचार सर्वांना आवडला. तरी संदेह सरत नव्हता. म्हणून विष्णुभटाकडे बघत चंदनदास बोलू लागले, "पण तोवर मातेस पूजेविना ठेवावे लागेल. खंडित मूर्तीची शुद्धीरणाविना पूजा होत नाही!"
विष्णुभट उत्तर देण्यापूर्वी नगरपाल उत्तेजित स्वरात म्हणाले, "खंडित मूर्तीची पूजा होत नाही, हा प्रतिवाद योग्य आहे. पण यास अपवाद समजून मी जननी जगदंबेपाशी अठ्ठेचाळीस तासांची मुदत मागतो. या काळात मी पाप्याचे मस्तक अर्पून त्याच्या रक्ताने मातेचे शुद्धिकरण करण्याची हमी देतो. ते न जमले तर माझे मस्तक अर्पण करून मातेच्या खंडित मूर्तीचे शुद्धिकरण करण्याचे वचन देतो!" सारे आदराने चंडवर्माच्या मुखावरील दृढ निश्चयाची आभा बघत राहिले. सर्वांना हा नवा विचार रोमांचक वाटला. चार जणांच्या सभेत ही घटना अठ्ठेचाळीस तास गुपित ठेवण्याचे ठरले. प्रत्येकाने मातेसमक्ष नतमस्तक होऊन गुप्ततेची शपथ घेतली. चंडवर्माच्या प्रयत्नास यश दे, अशी आळवणी करून सारे मंदिराबाहेर पडले.
प्रार्थनेने मन किंचित शांतवले तरी चौघेही अस्वस्थ होते. चंडवर्माची अस्वस्थता शिगेस पोहोचली. त्यांनी लगेच मातेच्या मंदिराभोवती सामान्य प्रजेस जाणवू नये असे सुजाण हेरांचे जाळे गुंफले. तरी त्यांची अस्वस्थता घटली नाही. धार काढलेल्या तलवारीची धार बोथट झाली नसूनही त्यांनी पुन्हा धार काढली. सूर्य अस्ताचलास गेला. दिवसपाळीच्या हेरांना काही विपरीत दिसले नाही. रात्रपाळीचे हेर येताच दिवसपाळीचा म्होरक्या नगरपालास अहवाल देण्यास गेला. दिवसभरात कुणीही अपरिचित व्यक्ती देवळाकडे फिरकली नाही, हे ऐकून चंडवर्माच्या बेचैनीने चरमसीमा ओलांडली. वद्य चतुर्दशीची काजळकाळी रात्र होती. पुजारी विष्णुभटाने देवीच्या गाभाऱ्यातील नंदादीपात तेल ओतले. मागच्या दारास अर्गला लावून त्यांनी मंदिराच्या महादरवाजास कुलूप लावले. सारे सुरक्षित असल्याची खात्री करुन घेऊन ते घरी गेले. नीरव शांततेत फक्त रातकीड्यांचा आवाज! साध्या कपड्यातील हेरांची गस्त जनसामान्यांना न जाणवणारी! रात्र गहिरी झाल्यावर उगवतीच्या दिशेस गस्त घालणाऱ्या हेराच्या नजरेस संशयास्पद हालचाल जाणवली. ढगळ कपडे घातलेली व्यक्ती मंदिराकडे जात होती. मुख्य दरवाजाकडे ढुंकूनही न बघता ती शांतपणे मागील भागी गेली. आवाज न करता दारावरची अर्गला दूर करून ती व्यक्ती महादेवीच्या गाभाऱ्यात प्रवेशली. तशीच दक्षता घेऊन चाणाक्ष हेराने बाहेरून अर्गलेने दरवाजा बंद केला. सहकाऱ्यास मागच्या दरवाजावर लक्ष ठेवण्याचे काम सांगून तो नगरपालाच्या घराकडे धावला.
गाभाऱ्यात प्रवेश केलेल्या व्यक्तीने शांतपणे नंदादीपाच्या वाती पुढे सरकवून अधिक प्रकाश मिळवला. महादेवीस नमस्कार करून त्याने कपड्यात लपवलेली पिशवी काढली. त्यातील छन्नी आणि हातेडी काढली. लगेच जगदंबेच्या मुखावर छन्नीचे मुक्त नर्तन सुरू झाले. लवकरच काम संपवून त्याने मातेकडे बघितले. जगदंबेच्या स्नेहल मुखावर वत्सल स्मिताची लोबस शोभा प्रगटली होती. अर्हन्त वसुगुप्तांचे ओठ समाधानाने हसले. मनात स्वधर्मासाठी देह ठेवण्याची तयारी असेल त्यानेच मातेश्वरीच्या मार्गदर्शनाची मनीषा बाळगावी, हे महादेवीच्या सखीचे बोल रुंजी घालू लागले. महादेवीनेही जीवन-मरण, नफा-नुकसान... साऱ्या प्रापंचिक विचारांना तिलांजली दे आणि कार्याचा शुभारंभ कर, असा आदेश देऊन यश तुझ्या प्रतिक्षेत असेल, असे म्हटलेच होते. ते बोल त्यांच्या ह्रदयकुंभात घुमू लागले. क्षणभर वाटले - या क्षणी मृत्यू आला तर खेद नव्हे समाधान असेल.
जगन्मातेच्या मुखावरील वत्सल भाव बघताना अर्हन्त वसुगुप्ताची समाधी लागली. बौद्ध भिख्खुच्या कलेस दाद देण्यासाठी मातेश्वरी समाधानाचे स्मित उधळत असल्याची भावना थरार निर्माण करत होती. कर्तव्यपूर्तीचा रोमांच अनोखा असूनही मनात अहंकार नव्हता. ब्रह्मदत्ताची अगतिकता क्षमेस पात्र ठरवून मातेश्वरीने त्यांच्या हस्ते उरलेले काम पूर्ण करवून घेतले यासाठी कृतज्ञता हिंदकळली. मनात 'इदम् न मम' या भावनेचा उद्घोष दाटला. भानभूल्या अवस्थेत मातेस वंदन करण्यासाठी अर्हन्त वसुगुप्त मातेच्या चरणावर मस्तक ठेवून कृतकृत्य भावना व्यक्त करते झाले. तोच...
वसुगुप्त उन्नतमस्तक होण्यापूर्वी त्यांच्या मानेवर चंडवर्माची धारदार तलवार कोसळली. तिने ब्रह्मदत्त - नव्हे अर्हन्त वसुगुप्तचे मस्तक कबंधापासून वेगळे केले. त्या प्रखर घावाने उडवलेली रक्ताची चिळकांडी थेट चंडवर्माच्या मिशीत पोहोचली. मातेच्या शुद्धीकरणाचे समाधान अनुभवणाऱ्या चंडवर्मास या रक्ताचा स्पर्श थरारक वाटला. छाती अभिमानाने तटतटली. नगरपालाच्या कार्यास दाद देण्यासाठी मातेच्या मुखावर असीम वात्सल्य दृग्गोचर झाल्याची जाणीव त्यांना नतमस्तक करत होती. परधर्मापासून वेदधर्माचे रक्षण करण्यास देवीने आपल्याला माध्यम बनवले या जाणीवेने त्यांना अभिभूत केले. नकळत त्यांची नजर मातेच्या चरणी लोळण घेणाऱ्या अर्हन्त वसुगुप्ताच्या मस्तकाकडे वळली. पुजारी विष्णुभटाने मातेच्या शुद्धिकरणाच्या हक्क नगरपालास दिल्याची जाणीव पुनित करत असताना, मिशीत अडकलेला रक्ताचा थेंब त्यांच्या छातीवर घरंगळला. त्या स्पर्शाने देहाचा रोम रोम ताठरला. स्वर्गाच्या मार्गास लागलेला ब्रह्मदत्ताचा आत्माही अनोख्या समाधानाने पुलकीत होता. पूर्वाश्रमात अर्धे राहिलेले कार्य उत्तराश्रमात पूर्ण करण्याचा थरार अनोखा होता. कारण या महानिर्मितीसाठी त्यांनी आनंदाने महानिर्वाण स्वीकारले होते. महादेवीने सुचवलेली निर्मोहिता आत्मसात करता आली, ही कृतार्थता कबंधाशी फारकत घेतलेल्या मस्तकाच्या नेत्रात झळाळत होती.
चंडवर्मा मंदिरात गेल्याची वार्ता वाऱ्याच्या वेगाने नगरात पसरली होती. विष्णुभट, श्रेष्ठी चंदनदास आणि विजयेंद्रजी यांच्या मागे समग्र नगर मंदिराकडे धावले. सारे विरलपळाचा आनंद लुटत नगरपालाचे कौतुक करत होते. त्याचवेळी विजयेंद्रजींना अपराध्याच्या मस्तकावरील नेत्रगोल, जगदंबेच्या मुखावर उमटलेले तृप्त वात्सल्य आणि चंडवर्माची कृतार्थता यात अनाम साम्य जाणवले. कारण कळत नसल्याने डोळे विस्फारून हे आक्रित बघत होते. हे गूढ उकलत नसल्याने ते आळीपाळीने सर्वांकडे बघत होते. कितीतरी वेळ!!
या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमे नमः



Comments