Mahanirmitisaathi Mahanirvan 2
- Smita Bhagwat
- Oct 27, 2020
- 3 min read
Updated: Oct 27, 2020
महानिर्मितीसाठी महानिर्वाण. २
गावाची हद्द ओलांडून ब्रह्मदत्त पुढे गेला. लहान-मोठ्या टेकड्यांनी बनलेला उंच सखल रस्ता पार करणे जिकिरीचे होते. प्रसन्न सकाळ सरली. मध्यान्नीचा सूर्य आग ओकू लागला. उदास मनाने चालणाऱ्या ब्रह्मदत्तास थकवा जाणवला. विसावा घेण्यासाठी तो एका शिलेवर बसला. अचानक मनात हुरहूर दाटली. कारण न कळल्याने त्याची अर्थहीन नजर भिरभिरली. सभोवती अनेक शिला होत्या. त्यातील एका शिलेतून आवाज येत आल्याचा त्यास संशय आला. शिलेतून बाहेर पडण्यास कुणी त्याची मदत मागत असावे. तार्किक कसोटीवर हा भास होता. या खुळचटपणाचा त्यास राग आला. तरी जगन्माता साद घालत असल्याचे वाटत राहिले. विवेकबुद्धीने त्यास जरब दिली - "जगन्मातेने तुला साद घालावी असा तू महापुरुष आहेस? साधनांचा मोह सुटत नसला तरी अवजारांंना नि तुझ्या अपूरत्या विद्येस गंज लागला आहे, हे कळत कसे नाही तुला!"
विचार पटला. तरी मन खुळेपणा सोडीना. म्हणून त्याने स्थान बदलले. गर्द सावलीतल्या लांबरुंद शिलेवरून ती विशिष्ट शिला दिसत नव्हती. घनदाट सावलीत त्यास भूक जाणवली. भाकरी खाताना तीव्र उष्मा तलखी वाढवत होता. भरले पोट डोळे जड करू लागली. त्रस्त मनात उदास विचार आला, "नालंदास कुणी प्रतीक्षा करत नाहीय. तिथे तातडीने पोहोचण्याची निकड नाही तुला!!" जगात कुणीही आपली प्रतीक्षा करत नाही, हा विचार त्यास सैरभैर करू लागला. झोपल्यास नैराश्य कमी होईल, असे समजून त्याने लांब-रुंद शिळेवर देह पसरला. लगेच झोप वाटावी अशी ग्लानी आली. अस्वस्थ मनात जागेपणी मनात घुसलेला विचार स्वप्नरुपात प्रगटला.
आसपासच्या टेकड्या आणि वृक्ष देव-देवतांच्या रुपात प्रगटले. साऱ्यांच्या नजरेत अतीव रोष! ब्रह्मदत्त बावरला. त्यास रोषाचे कारण कळेना. साऱ्यांची नजर जणू आग ओकत होती. वृक्षांच्या फांद्यानी वेदधर्माच्या उत्थानासाठी शस्त्ररुप धारण केले. टेकडीवरील छोटी झुडपे बौद्ध भिख्खुंच्या रुपात प्रगटली. शस्त्र उगारलेल्या देवदेवतांना घाबरून काही भिख्खु पळत सुटले. कुणी देवतांच्या चरणाशी लीन झाले. ब्रह्मदत्त डोळे विस्फारून हे प्रलयंकारी दृश्य बघत होता. अचानक त्याच्या रोखाने त्रिशूळ रोखून एका महादेवीने गर्जना केली. "सारे विश्व वेदधर्माच्या उत्थानासाठी कंबर कसत असताना हा मूर्ख इथे झोपला आहे?" ब्रह्मदत्तास गदागदा हलवत देवीने सरबत्ती सुरू केली, "कोण तू? इथे का लोळतो आहेस?"
"महादेवी!" हात जोडून तो व्यथित स्वरात म्हणाला, "संसारतापानं माझं घरदार, स्वजन सारं गिळंकृत केलंय. या वैफल्याच्या दरीतून बाहेर येणं जमत नसलेला मी तुच्छ जीव!? बौद्ध विहारात जाण्यास घर सोडलेला! पण देवी हा निर्णयही सहन होत नाहीय मला! म्हणून पावलात वेग नाहीय माझ्या! द्विधा मनःस्थिती थकवत असली तरी मन मोकळे करता यावे असा कुणी स्वजन नाहीय. म्हणून...."
"म्हणून धर्मत्याग करायचा? सारे धर्म एकच उपदेश करतात, मग स्वधर्माचा त्याग का करावा?" महादेवीच्या स्वरात सात्विक संतापाचा टणत्कार होता. शरणागती स्वीकारून महादेवीचरणी झोकून देऊन तो कळवळला...
"महादेवी! जगतजननी!! भवानी!!! अल्पमती बालक हौशीने धर्मत्याग कत नाहीय. मातेश्वरीचे मार्गदर्शन लाभले तर बालक कल्याणमार्ग आचरील. माते बालकास क्षमा करून मार्गदर्शनाचे वचन दे! ते मिळेतो मी हे पाय सोडणार नाही!"
"स्वधर्मासाठी देह ठेवण्याची तयारी असेल त्यानेच मातेश्वरीच्या मार्गदर्शनाची मनीषा बाळगावी! भेकड भेदरटांमुळेच वेदधर्माची पडती होते आहे!" महादेवी समीप उभ्या असलेली देवता परखडपणे म्हणाली. ब्रह्मदत्ताच्या लीनतेस नख लागले नाही. म्हणून मातेश्वरीच्या मुद्रेवर मंद स्मिताचे चांदणे फुलले. स्नेहाने ब्रह्मदत्ताच्या मस्तकी हात फिरवून माता बोलू लागली....
"वत्सा उठ! वैफल्य झटक! माझा वरहस्त लाभल्याची खात्री बाळग! कामाला लाग! मनात नव्याने प्रगटलेला विचार अर्थहीन नाही. ते अवश्यंभावि आहे! जीवन-मरण, नफा-नुकसान... प्रापंचिक विचारांना तिलांजली देऊन शुभकार्याचा श्रीगणेशा कर. यश तुझ्या प्रतिक्षेत खोळंबले आहे. माझ्या अनोख्या रुपाची निर्मिती तुझ्या हस्ते होईल! अवश्य होईल!" ब्रह्मदत्तास स्नेहल नजरेने नाहू घालून महादेवी अंतर्धान पावली. तळमळणाऱ्या ब्रह्मदत्तास गाढ झोप लागली. झोपेत परमशांती जाणवत होती. जाग आली तरी परमशांतीस नख लागले नाही. मनाच्या गाभाऱ्यात महादेवीच्या आशीर्वचनाचे पडसाद घुमत होते. शब्दांच्या पलिकडील भावनेचा मथितार्थ प्राप्त करताना पुन्हा त्याची नजर विशिष्ठ शिलेकडे वळली नि तो शहारला. कारण आधी त्रिशूळ उगारून मग कृपेचा वर्षाव करणारी महादेवी त्याच शिळेतून प्रगटली होती. अनाम सुखद संवेदनेने त्याच्या देहावर काटा फुलवला. मनात महादेवीचे अमृतबोल घुमू लागले. नकळत तोंडून शब्द उमटले, "जगतजननीचा आशार्वाद लाभला त्याला काही कमी पडणार नाही! हे स्वप्न नाही. हेतुशून्य जीवनास हेतू प्रदान करण्यास महादेवीने प्रदान केलेले अवश्यंभावि आहे!"
क्रमशः


Comments