top of page
Search

Mahanirmitisathi....3

Writer: Smita Bhagwat
Smita Bhagwat
Oct 28, 2020
3 min read

Updated: Oct 28, 2020

अनिर्वचनीय अनुभूतीने मोहरलेल्या मनासही हा खुळेपणा वाटत होता. नालंदास गेल्याविना तळ्या-मळ्यात स्थिती संपणार नाही असे समजून लगेच नालंदास जाण्यास फटकन उठलाही! पण सूर्य अस्ताचलास जात होता. रात्री धर्मशाळेत वास्तव्य करणे योग्य ठरवून तो नगरात प्रवेशला. गावात वेदधर्माचा प्रभाव जाणवला. प्रजा जागरुकतेने धर्मपालन करत होती. नजरेस पडलेल्या पहिल्या इसमास त्याने धर्मशाळेचा पत्ता विचारला. अतिथीस देव मानणाऱ्या गावकऱ्याने त्यास घरी नेले. अतिथीस भोजन देऊन तो स्वतः त्यास धर्मशाळेत पोहोचवायला गेला. उत्तम आतिथ्य आणि भरपेट जेवणामुळे ब्रह्मदत्तास लगेच झोप लागली. झोपेतही त्यास महादेवीची कृपा जोजवत नि शांतवत होती. स्पर्शानुभूतीने पुनित होत तो मोहरत होता. पहाटे जागा झाला तेव्हा अस्वस्थता निमाली होती. नदीवर स्नान नि प्राचीवंदना करून शुचिर्भूत देहाने तो उन्मनी अवस्थेत टेकडीवर गेला.


महादेवी बोट धरून चालवत असल्याचे जाणवत असताना त्याने दगडावर रेषा काढण्यास योग्य मृदू दगड शोधला. विशिष्ठ शिळा साफ करून त्याने नम्रपणे हात जोडले. मनोभावे प्रार्थना करून त्याने मृदू दगड हाती घेतला. अनायासे शिळेवर महादेवीची देखणी आकृती उमटली. स्वप्नात दिसली तशी सजीव वाटणारी! पुरेसे शिक्षण नसून हुबेहूब रेखाकृती जमली तशी शिल्पकलेत माहिर नसूनही मातेची मूर्ती तयार होईल, अशी श्रद्धा जन्मली. मनोमन वंदन करून त्याने जगन्मातेच्या कृपावर्षावासाठी याचना केली. धर्मत्यागाच्या विचाराची हकालपट्टी करून भारावल्या मनाने त्याने अनेक वर्षे बंद असलेल्य पिशवीची गाठ सोडली. गंज चढून अवजारे निकामी झाली असतील, या शंकेविना छन्नी आणि हातोडी काढताच तो शहारला.


नंतर प्रत्येक क्षण उन्मनी अवस्थेचे फलीत बनला. संवादाची गरज निमाली! मौनव्रत आणि महादेवीचे मार्गदर्शनच जीवन बनले. प्रत्येक प्रहाराने उडणारा कपचीचा तुकडा मातेस मंद गतीने शिळेबाहेर काढत होता. प्रहाराच्या नादब्रह्माचा झंकार नाण्यांच्या झंकाराहून कैक पटीने मोहक बनला. अनघड हातातून प्रगटणारे महादेवीचे रुप त्यास अधिकाधिक लीन करू लागले. हातोडी नि छन्नी हाती घेताच देहात पणजोबा प्रवेशल्यागत तो पुलकीत होई. प्रपिता ब्रह्मदत्त त्या जमान्यातले विख्यात शिल्पकार! मंदिरात त्यांनी घडवलेली मूर्ती असावी, यासाठी लोक जीव टाकत. दूर सुदूरचे लोकही! ते स्वयं ब्रह्मदत्त जणू प्रपौत्राच्या कायेत प्रवेशले.


पहिल्या रात्री धर्मशाळेचा पत्ता जाणण्यास तो गावात गेला होता. भेटलेल्या पहिल्या इसमाने त्यास भोजन दिले होते. चांभारचौकशा दूर, या वाटसरूने त्यास उपकारकर्त्या गावकऱ्याचे वा गावाचे नाव किंवा कोतवालाची माहिती विचारली नव्हती. गावकऱ्यास तो आत्मरत नि आदरणीय वाटला. त्याच्या घरी घेतले ते शेवटचे भोजन! मग जणू तहान-भुक हरपली. वृक्षांची फळे नि पुण्यसलीला नदीचे पाणी पिऊन त्याचा जीव तरारू लागला. सूर्यास्त होईतो तो काम करी. टेकडीवर आपसूक एक कोनाडा तयार झाला होता. त्या कोनाड्यात झाडांच्या फांद्यानी मूर्ती झाकून तो अवजारे काखोटीस मारून धर्मशाळेत झोपायला जाई. रोज तीच दिनचर्या! कित्येक दिवस! धर्मशाळेतील इतर लोकांकडे त्याचे लक्ष नसे. व्यवस्थापकास या अबोल मुशाफिराविषयी कुतूहल वाटे. पण ब्रहमदत्ताच्या मुखावरील आभा त्यास काही विचारण्यापासून रोखत असे.


जगन्मातेची मूर्ती तयार झाली. स्वप्न सत्य बनलेले पाहून ब्रह्मदत्त सुखावला. महादेवीची कमनीय मूर्ती न्याहाळताना त्याची समाधी लागली. रोज तोच मूर्ती घडवत असूनही त्यास ती स्वकृती वाटेना. मातेश्वरी आपणहून शिलेबाहेर प्रगटली, असे वाटले. शिलेबाहेर येण्यास मातेने आपले माध्यम वापरले, या विचाराने मनात अपार कृतज्ञता दाटली. मूर्ती घडवल्याचा विसर पडला. सश्रद्ध मनाने तो मातेसमोर लीन झाला. नकळत नजरेत शिल्पकार ब्रह्मदत्त अवतरल्याचे जाणवले. ते गुणगुणले, "मूर्ती कमनीय आहे, पण..." शिल्पकार पण नावाच्या फत्तरावर अडखळला. मूर्तीचे सतर्क निरीक्षण त्याच्या मनात तुफान उठवू लागले. "मूर्तीच्या भावविहीन मुखावर वत्सल भाव मुखरीत झाले नसल्याने ती सामान्य स्त्री वाटत आहे. असीम वत्सल भाव हा मातेचा शृंगार! जगतजननीच्या मुखावर वात्सल्य प्रगटलेच पाहिजे!". कलाकाराच्या मनात आग्रह दाटला. पण हे अत्यंत नाजुकाईने करण्याचे काम संध्याच्छायाच्या धूसर प्रकाशात नव्हे तर लख्ख प्रकाशात करावे लागेल! घाईस सर्वनाशाची आई म्हणतात, ते स्मरत त्याने सकाळी मूर्तीवर निर्णायक हात फिरवायचे ठरवले. नेहमीप्रमाणे मूर्ती कोनाड्यात झाकून तृप्त मनाने तो धर्मशाळेत गेला.


पहाटे जोराचे वारे सुटले. वातावरण विलक्षण थंड झाले. पण ब्रह्मदत्तच्या मनात कृतज्ञ विचारांची ऊब होती. शांत मनाने त्याने स्नान करून सूर्यवंदना केली. आज मूर्ती पूर्ण होणार, या विचाराचा थरार रोमांचित करत होता. निर्मितीकार्यात गुंतलेल्या ब्रह्मदत्तने मूर्तीचे काय करायचे, याचा विचार केला नव्हता. मूर्ती तयार झाल्यावर त्यास ती देखण्या मंदिरात स्थापित व्हावी असे वाटले. त्याच विचारात तो टेकडीवर गेला. पण....

 
 
 

Recent Posts

See All
So long, Mother....

There are certain beings who have walked on this earth just to balance out the residual effects of their past karma. They are neither interested in wealth nor power nor fame. As soon as they are done

 
 
 
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page