top of page
Search

Mahanirmitisathi... 3

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Oct 29, 2020
  • 3 min read

Updated: Oct 29, 2020

महानिर्मितीसाठी.... ३


टेकडीवरील दृश्य पाहून ब्रह्मदत्ताचे रक्त गोठले. मूर्ती झाकणाऱ्या फांद्या इतस्ततः उधळलेल्या! कोनाडा रिकामा! मूर्ती ठेवण्याची जागा कधीच बदलली नसूनही त्याने इतरत्र शोधले. रोज प्रसन्न भासणारी शांतता भेसूर वाटली त्याला! नालंदास जाण्याचा निर्धार करतानाही तो इतका सैरभैर नव्हता. महादेवीची मूर्ती चोरीस गेल्याने तो निराश झाला. मूर्ती विकून त्यास श्रीमंत व्हायचे नव्हते. जगन्मातेच्या इच्छेनुसार निर्लेप मनाने केलेली निर्मिती सुंदर देवालयाची शोभा व्हावी, हिच आस होती. मनात वैचारिक वादळ उठले... "माझ्यावर कुणी पाळत ठेवत असणार. म्हणून काम पूर्ण होईतो चोरी झाली नाही. पण महादेवीनेेच घडवलेल्या मूर्तीची तिने चोरी का होऊ दिली? तिच्या आज्ञेचे पालन करणाऱ्याहून मातेस चोर आवडला? जगतजननीनेही माझ्या जननीप्रमाणे माझ्या कष्टांवर इतरांना पोसले?" नगरात भेटलेल्या पहिल्या गावकऱ्याच्या आतिथ्यात, पुरजन डोळसपणे वेदधर्म आचरत असल्याचे त्यास जाणवले होते. आता या नगरातील वेदधर्म त्यास बेगडी वाटला. मनात आक्रोश दाटला. ढोंगी धर्म नि देव आणि देवतांविषयी मी ममत्व बाळगू नाही! मस्तकात पेटलेल्या ठिणगीने क्षणार्धात वणवा पेटवला. तिरमिरीत त्याने नालंदाची वाट धरली. त्याचा बहिश्चर प्राण असणारी पिशवी खांद्यावरच होती. रात्रीही विसावा न घेता तो पहाटे बौद्ध विहारात प्रवेशला. तरी मनात उद्वेग होताच. त्वरीत प्रमुख अर्हन्तांना भेटून त्याने लगेच दीक्षा घेण्याचा आग्रह धरला. ब्रह्मदत्त बौद्ध भिख्खु बनला.

***

दोन-तीन वर्षे आर्यावर्तात प्रचंड धामधूम माजली. धर्मवेडाने झपाटलेल्या म्लेंच्छांच्या धिंगाण्यात अहिंसा परमोधर्म म्हणत बौद्ध धर्मीयांच्या बेरकीपणाची भर! हाती तलवार न घेता नि मनाच्या अहिंसाचा विचार डावलून ते अहिंसेच्या प्रचारासाठी क्रूर युक्त्या अमंलात आणत होते. वेदधर्मावर अढळ श्रद्धा बाळगणाऱ्या कांचनपुरावर म्लेंच्छांनी जोरदार आक्रमण केले. पण तिथल्या शौर्यास भेकडपणाचा कलंक लागला नव्हता. म्लेंच्छांना पळता भुई थोडी झाली. पण धर्मवेड्या यवनांचे संख्याबळ मोठे! ते गप्प बसणारे नसल्याची प्रजेस जाणीव होती. सारे सावध होते. प्रजेच्या सहिष्णू वर्तनामुळे नगरात बौद्धविहार स्थापन झाला होता. कुणास त्या धर्माविषयी ममत्व नसून! मोजके दुबळे यवनांना भीत असले तरी! बौद्धविहाराचे प्रमुख धर्मप्रसारासाठी अशा भेदरटांना सांगत, "सम्राट अशोकाचे समर्थ पाठबळ लाभलल्या बौद्धधर्मास यवन बिचकून आहेत. बौद्धधर्माचा अंगीकार करणारा सुरक्षित राहतो!" त्यांनी नालंदास संदेश धाडला, "ज्ञानी नि समर्पित अर्हन्तास इथे पाठवल्यास धर्मप्रसाराचे कार्य सहज सिद्ध होऊ शकेल. लोखंड गरम असताना हातोडा मारणे हिताचे ठरते!" त्यानुसार नालंदाहून अर्हन्त वसुगुप्त कांचनपुरास आले. त्यांचे ज्ञान नि समर्पित काम जगजाहिर! ते सर्व शक्तीनिशी कामास भिडत! घाईने धर्मप्रसार सुरू न करता ते आधी प्रजेचे मानस जाणून घेत!


वसुगुप्त कांचनपुरात फिरू लागले. ठिकठिकाणी योद्धे तरुणांना प्रशिक्षण देताना दिसत होते. काही ठिकाणी शस्त्रांना धार काढण्याचे काम चालू होते. सर्वत्र शौर्याचा डिंडिम वाजत होता. देह-मनाने दुबळे मोजके लोक वगळता, बहुसंख्य प्रजेचा नगरपाल चंडवर्माच्या सामर्थ्यावर विश्वास होता. सर्वांना शौर्याचे आकर्षण! अहिंसा दुर्बलांचे शस्त्र ठरवणारे! प्रजेची मानसिकता तपासून ते मंदिरांकडे वळले. विविध मंदिरांचे निरीक्षण करून नगराच्या चामुंडामातेच्या मुख्य देवालयाशी पोहोचले. मंदिर अत्यंत नवे! तरी नगराच्या मुख्य देवालयाचा मान पटकावणारे! त्यास समर्थ कारण! मंदिरात महादेवीची आत्मसिद्ध मूर्ती असल्याची सर्वांना खात्री! वसुगुप्तासही बरेच जणांनी या मूर्तीविषयी सांगितले - विजयेंद्रजींना स्वयं महादेवीने हस्तनिर्देश करून बोलावले. वस्तुतः ते धनवंत नाहीत. ते ही मूर्ती चढ्या भावाने विकू शकले असते. पण त्या मूर्तीत आपले प्राण असल्याचा साक्षात्कार झाला, त्यांना! देवालयाचा खर्च चंदनदास श्रेष्ठींनी केला. सारे ऐकून वसुगुप्तांच्या मनात कुतूहल दाटले.


वसुगुप्त चामुंडा मंदिराशी पोहोचले तेव्हा संध्याछाया उतरू लागल्या होत्या. तरी प्रांगणात शस्त्रांना धार काढण्याचे काम संपले नव्हते. प्रशस्त सभागृहात देवीस साष्टांग दंडवत घालून वसुगुप्त गाभाऱ्यात गेले. तिथे सोन्याच्या समया झळाळत होत्या. देवीमाता जरतारी वस्त्रे नि सोन्या-मोत्याच्या असंख्य आभूषणांनी सजली होती! देवीचे दर्शन घेताना वसुगुप्तांची ब्रह्मानंदी टाळी लागली. अचानक ते दचकले, नवलाने डोळे विस्फारून बघू लागले. वस्त्राभूषणांच्या वैभवाचे त्यांना कौतुक नव्हते. आर्यावर्तातील कोणत्याही धर्माचे लोक मुळात वेदधर्मीय, हे विश्वसत्य! धर्मांतर केले तरी त्यांना प्रसंगी मूळ धर्म आठवतो. अर्हन्त समर्पित भावनेने धर्मप्रसार करत! तरी ते या नियमास अपवाद नव्हते. त्यांना देव-देवतांच्या रुप-गुणांची सखोल माहिती होती. म्हणून त्यांची नजर देवीच्या वैभववर नव्हे तर मुखमंडलावर स्थिरावली. क्षणार्धात त्यांच्या मनात वैचारिक वादळ उठले. मातेचे मुखमंडल निर्विकार आहे. चामुंडादेवी शौर्याचे प्रतीक! तरी या देवीच्या मुखावर ती आभा नाहीच. उलट मुखावर स्वाभाविक मृदू स्मित उमटू शकेल. तसे झाल्यास खरोखर बहार येईल.... वैचारिक घुसळण वेगवान बनली. आसपासच्या दुनियेचे भान सुटले. वसुगुप्तांच्या समग्र अस्तित्वास हादरा बसला. मातेकडे अनिमिष नजरेने बघताना ते शहारले. करुणामयी माता बालकास शांतवत असल्याच्या भावनेने अभिभूत झाले. अचानक उठलेले वैचारीक वादळ आपसूक शमले. मनाचा समतोल साधून ते मंदिरातून बाहेर पडले.

क्रमशः

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page