top of page
Search

Makar Sankrant

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • May 18, 2020
  • 3 min read

सण, उत्सव, परंपरांचा मथितार्थ!


मथितार्थ शब्दाचा गूढार्थ जाणून घेण्यासारखा आहे. काहींना वाटते की मतीने (बुद्धी) स्वीकारलेला अर्थ तो मतीतार्थ! वास्तविक भाषाशास्त्रींच्या मते वैचारिक मंथनातून प्राप्त होणारे मथित (नवनीत) तो मथितार्थ! मंथन आणि मथित यांचे हे सायुज्य लोभस आहे. सण, परंपरा, उत्सवांपाठी गुंफलेल्या अख्यायिका… हे वैचारिक मंथन! सर्वांचा विचार सादर करण्यास पूर्ण ग्रंथ लिहावा लागेल. विजुने वेचलेल्या मोत्यांचा स्मिताने केलेल्या जागरातील हा सातवा मोती! प्रास्तविक नि मदर्स डे च्या लेखाचा समावेश केला तर नववा मोती! सप्ताहाच्या समाप्तीचा!

विषय बदलास संक्रमण म्हटले तर मकर संक्रांतीचा विचार माडून ही माळ पूर्ण करू.

मकर संक्रांत!

वर्षभरात सूर्य बारा राशीत फिरतो - एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमित होतो. जानेवारी महिन्याच्या मध्यावर तो मकर राशीत प्रवेशतो. ती मकर संक्रांत! भारताचे स्थान पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात! दक्षिण गोलार्धात गेलेला सूर्य, यावेळी उत्तरेस झुकू लागतो. दूर गेलेला सूर्य जवळ येऊ लागतो. सूर्य दूर जाणे ही प्रकाशात होणारी घट नि जवळ येण्यात प्रकाशाने झळाळण्याचा संकेत! म्हणून तिमिरातून तेजाकडे नेणारे हे संक्रमण सण बनले! सणात आर्यांनी सदैव वैज्ञानिक विचार गुंफला! ऋतुमानानुसार योग्य आहार, विहार आणि आरोग्याच्या विचारास अग्रक्रम दिला!

जानेवारी महिन्यात हिवाळा असतो. म्हणून आहारात स्निग्धता नि उष्णता हवी. तिळात स्निग्धता नि गुळात उष्णता! उष्ण बाजरीही महत्वाची! म्हणून गुळाची पोळी, तीळ पेरलेल्या भाकरीच्या जोडीस वांग्याचे भरीत नि तुरीचे दाणे घातलेल्या मुगाच्या खिचडीवर तुपाची धार! संक्रांतीच्या आदल्या दिवशीच्या धुंधुरमासाचा ठरला हा थाट! संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळगुळाचे लाडू! पुढे हिवाळा कमी होणार, याची जाणीव ठेऊन थंड प्रदेशात दुलईतून बाहेर पडून देह सूर्यप्रकाशात नाहू घालणे हवे. त्यासाठी थंड गुजराथेत पतंगोत्सव! संक्रांतीचा आदला दिवस, संक्रांत आणि किंक्रात असे तीन दिवस गुजराथेत साऱ्यांचा पतंगींसह गच्चीवर मुक्काम! पतंगांच्या मजेत देहास सूर्यकिरणाच्या ड जीवनसत्वात नाहू घालण्याच्या आरोग्यप्रद कृतीची भर! गुजराथेत पतंगप्रेम इतके भिनले आहे की या संदर्भात पेच लढणे, ढील देणे, खेचून धरणे… असे वाक्प्रचार निर्माण झाले. मराठीतही संक्रांत येणे ही उपमा आहेच की!

आर्यांना सारे ऋतुनुसार व्रत-वैकल्यात गुंफण्याची हौस! यात ज्ञान-विज्ञानाचा होणारा आदर लोभस! कॉलेस्टिरॉल शब्द प्रचलीत नसण्याच्या काळात, त्यांनी प्रत्येक सणाची आहारसंहिता ठरवली. व्यक्ती तितक्या प्रकृती, याचाही जाणीव ठेवली. तीळ आणि गूळ सर्वांच्या प्रकृतीस माफक असतीलच, असे नव्हे. म्हणून, या ऋतुत मिळणारी बोरे, आवळे, खजूर, ऊस, टमाटे… यांचेही महत्व जपले. संक्रांतीच्या व्रत-वैकल्यात या साऱ्यांचा समावेश करून त्यांनी चवीत वैविध्य आणि आरोग्यास पोषक अन्नाचे सेवन दोन्हीची सांगड घातली. व्रतांना धर्माची जोड दिल्याने, या संहितेची सहज अंमलबजावणी झाली. पाश्चात्य शिक्षणक्रमामुळे स्वत्व गमावलेली पिढीने, सारासार विचार न करता आपल्या प्रथांना मूर्खपणा वा अवडंबर समजणे योग्य नाही.


काळ परिवर्तनशील आहे. प्राचीन काळी बारा मग तेरा नि मग चौदा जानेवारीस येणारा हा सण आता पंधरा तारखेकडे झुकत आहे. हजारो वर्षांपूर्वी सणांच्या आचार संहिता तयार झाल्या! काळ आणि राहणीमानास अनुसरून त्यात बदल होणे योग्यच, पण जानेवारी महिन्यात हिवाळा असणे बदललेले नाही. म्हणून ते सारे बदलण्याची गरज नाही. पतंगोत्सवाच्या आनंदात सहज होणाऱ्या व्यायामासही महत्व आहे. आहारात योग्य बदल करणेही मान्य करावे! कारण त्यात हवेतील गारव्यावर मात करून देहास उष्मा पुरवण्याचा वैज्ञानिक विचार आहे. बोरे, टोमॅटोचे सार, आवळ्याची चटणी, तीळ पेरलेली भाकरी, गुळाची पोळी… सारे उष्णतावर्धक! कर्मकांड टाळल्यास पाप लागेल, या भयामुळे ते करू नाही. पण आहार-विहाराची संहिता टिकास्पद नाही, हे समजून घेतले पाहिजे. तीळ-गुळ वा गुळाची पोळी खाऊन गोड बोलता येते, असे नाही. पण बदलात नकारात्मक विचार नसावा. तार्किकतेस प्राधान्य देऊन प्रकृतीचा विचार करून आहार ठरवावा. मुंबईसारख्या ठिकाणी विशेष थंडी नसते. तिथे अतिरीक्त उष्णतावर्धक आहाराची फारशी गरज नाही. पण जिथे थंडी असते तिथे आहाराचे महत्व जपले पाहिजे. मकर संक्रांतीच्या सणात गोड बोलण्याची सवय अंगी बाणण्याचा विचार आहे. त्यासाठी तीळ-गुळ नि गुळाची पोळी खाणे अनिवार्य नाही.

हजारो वर्षांपूर्वी आपल्याला अमोल विचारांचा वारसा मिळाला. सहज मिळते त्याची अति परिचयात अवज्ञा होते. पण तसे होणे स्वागतार्ह नाही. मिळालेला सांस्कृतिक विचार, कालानुक्रमे योग्य बदल करून जपणेच योग्य! कारण त्यापाठी आपल्या पूर्वजांचा सर्वस्पर्शी विचार आहे. त्यांनी तो विचार कंटाळवाण्या पद्धतीने नव्हे तर रसाळ रीतीने सादर करण्याचे कौशल्य सिद्ध केले आहे! सारे सण साजरे कसे नि का करावे, या संहितेतही त्यांनी वैज्ञानिक विचार विणला. या मोत्याच्या रुपात हा सप्ताह पूर्ण होत असल्याने त्याची पुढे कधी चर्चा करू. या पुढे ब्लॉगवर चर्चा होऊ शकेल, असे विषय आठवड्यातून एकदा सादर होतील. त्यात सहभागी होण्याचे सर्वांना हार्दिक निमंत्रण आहे. आभार!

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

1 Comment


Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
May 19, 2020

मकरसंक्रांत उत्सव आणी अन्य आरोग्यप्रद सविस्तर माहिती दिली आहे.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page