Mother's day special
- Smita Bhagwat
- May 9, 2020
- 3 min read
नमस्कार मंडळी!
सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा देताना मला आई स्मरते. आम्ही तिला अम्मा म्हणत असू. सांजवात करून ती आमच्याकडून झोपाळ्यावर बसून, रामरक्षा, भीमरुपी, परवचा, मनाचे श्लोक... म्हणवून घेत असे. सणांच्या कहाण्या नि ऐतिहासिक घटना रसाळ भाषेत सांगण्यात तिचा हातखंडा! वेकेशनमध्ये ती आमच्याबरोबर भेंड्या लावताना (अंताक्षरी) सुरेल स्वरात भजने, नाट्यगीते नि चित्रपटगीतेही म्हणत असे. स्वरचित ओव्या ही तिची खासियत! स्पर्धा जिकल्यावर आम्हाला ढाल वा बक्षिसाव्यतिरीक्त तिच्याकडून खास बक्षिस मिळे. ती असे त्या यशस्वी अपत्याचे नाव गुंफलेली तिची ओवी! आपले नाव ऐकताना आम्हाला आनंद होत असे. या बक्षिसाचा मोह, आमच्या प्रगतीपाठची प्रेरणाच!
स्वातंत्र्याच्या चळवळीत हिरीरीने भाग घेणारा मोठ्या भावाचा मित्र तिला तारुण्यात आवडला. तो पाळण्यात असताना प्लेगच्या साथीत त्याच्या घरातील सारे वडील पुरुष निवर्तलेले! घरात नुकती मुंज झालेला भाऊ, विधवा आई, काकी नि चुलत बहिणी! त्यामुळे आर्थिक स्थिती बेताची! त्यात त्यास देशभक्तीचे - तिच्या जन्मदात्यांच्या मते भिकेचे डोहाळे! अशा तरुणास मुलगी देण्यास त्यांचा नकार! तिला मन मारून जगायचे नव्हते. कष्टमय जीवन स्वीकारून १९३८ साली, म्हणजे समाज बुरसटलेल्या विचारांचा असण्याच्या काळात तिने नेसत्या वस्त्रानिशी गृहत्यागाचे धाडस केले! भावलेल्या तरुणाशी पदर बांधण्यास! धनसंपन्न नसले तरी आरोग्यसंपन्न नि संस्कारसंपन्न असलेले ते आमचे अण्णा! त्यांच्यासंगे तिने स्वातंत्र्य संग्रामात उडी घेऊन कारावास सोसला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कार्याचे भांडवल करण्यास राजकारणात न पडता नेमस्तपणे गृहस्थधर्माचे पालन करू लागलेल्या तत्वपूजक स्वातंत्र्यसेनानीत या दांपत्याचा समावेश!
संसारात पतिचे पीठ नि पत्नीचे मीठ असावे, असा तिचा आग्रह! ती अल्पशिक्षित! तरी सुगरणपणा नि शिवणकलेच्या कौशल्यावर मदार बांधून तिने संसारास हातभार लावला. तिच्या कामास वा अल्प शिक्षणास अण्णा आणि काकांनी कमी लेखले नाही. ते तिला वाचनसामुग्री पुरवत. तिची स्मरणशक्ती अफाट! त्यात अभिजात वाचनाची भर पडल्याने सुशिक्षित म्हणवणाऱ्या कित्येकांपेक्षा ती बहुश्रुत आणि सुसंस्कृत झाली.
जीवन कष्टमय असूनही ती नवे शिकण्यास तत्पर असे. अण्णांनी तिला पोहायला शिकवले. बडोद्यातील मुजुमदारांच्या हौदावर ती स्त्रिया आणि मुलींना पोहायला शिकवत असे. ती अल्पशिक्षित आहे, असे कुणास वाटत नसल्याने, महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीत स्वीमिंग पूल करण्याचे ठरले तेव्हा तिला विचारण्यात आले. तेव्हा गुजराथेत गुजराथी माध्यमाची लाट आली होती. यास महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी अपवाद! त्यामुळे तिथे परदेशी विद्यार्थीही असत. म्हणून तिचा नकार! पण कप्तानबंधू निखळ पुरोगामी! स्विमिंग पूल तयार होत असताना अण्णांनी तिला इंग्लीश शिकवले. काकांनी स्वीमिंग विषयावरील पुस्तके देऊन तिच्या कलेस वैज्ञानिक बैठक पुरवली. तेव्हा मी हायस्कूलमध्ये होते. मग माझ्यावर प्रयोग सुरू झाले. स्विमिंग पूल तयार झाला तेव्हा ती आत्मविश्वासाने डवरली होती. स्विमिंगपूलवर ताठ मानाने वावरणारी, बोटींग क्लबच्या बोटीत जलविहार करणारी अम्मा आजही माझ्या स्मरणात ताजी आहे.
अति परिचयात अवज्ञा होते तसे आईस गृहित धरले जाते. यास मी अपवाद नाही. शिस्त लावणाऱ्या आईवर मी खूपदा नाराज असे. ते तिला कळत असणारच, हा विचार गेल्या काही दिवसांपासून मला अस्वस्थ करत असताना मदर्स डे आला. तिच्या क्षमाशीलतेसाठी कधी कृतज्ञता व्यक्त केली नाही, ही रुखरुख मनात असल्याने लिहिण्याचा विचार केला तर एकाही आठवणीत ती एकटी भेटेना.
काका आर्थिक समस्येस न जुमानता इंग्लंडला शिक्षण घेऊन आलेले! त्यांना बडोदेकर प्रतिअत्रे म्हणत. आजही त्याचे गुजराथ क्रिडा मंडळ होते तो रस्ता वसंतराव कप्तान मार्ग नाव पावला आहे. तरी त्यांची विद्वत्ता धाकट्या वहिनीशी संवाद साधताना कधी अडसर बनली नाही. म्हणून अम्माच्या व्यक्तिमत्वात आता मला त्या काळी विरल ठरणारे पुरोगामी कप्तानबंधुही दिसतात! त्यामुळे तिच्याविषयी लिहिण्याचे ठरवताच, कानात या त्रिमूर्तींच्या एकत्रित आठवणींचे स्मृतीगान निनादू लागले.
आपल्या संस्कृतीत जन्मदात्यांचे अद्वैत अभिप्रेत असते. आपण आई-वडील असे एकदम म्हणतो. आजची मी, या त्रिमूर्तीने पाजलेल्या बाळकडूचे फलीत! गुजरातीत पित्यास बापा - म्हणजे पाव भागाची बा म्हणतात. संगोपन प्रक्रियेत काकांना बहुतेक ठिकाणई स्थानच नसते. पण सर्व बाबतीत कप्तानबंधू उजवे नि अपवाद ठरणारे! म्हणून मदर्स डे ला फक्त मातेस नव्हे तर अम्मा-अण्णा नि काकांना विनम्र अभिवादन करणे मला आवडले. माझ्या सुनेने ब्लॉगवरील आठवणीत आईच्या आठवणीही असू देत, हा विचार मांडला होताच. त्यास दुजोरा देत मदर्स डेच्या निमित्ताने या तिघांना मानवंदना ठरेल असे पुस्तक किंड्लवर टाक, असे मुलगा म्हणाला. नव्या तंत्रज्ञानाशी जवळीक साधताना त्या दोघांचे मार्गदर्शन नि सहकार मला लाभतो. म्हणून त्याचे कौतुक करायची संधी टिपणेही मला आवडले. मदर्स डेच्या निमित्ताने जन्मभूमीस जननीचा दर्जा देण्याची शिकवण देणाऱ्या त्रिमूर्तीस स्मरणे, मला सुखानुभव वाटतो आहे. अस्तु.

आता भेटू मंगळवारी!!


सायली,
प्रारब्धाने दिलेल्या आजीमुळे तुझी आई आणि परिणामी तू ही अशी छान घडली आहेस. माझ्याही प्रास्तविक लेखात मी अशी का आहे, याचं उत्तर दिलं होतं. आज हा वैचारिक (स्मिता) भागवत सप्ताह संपवत आहे. आता चर्चा होऊ शकेल, असा विषय पसंतकरीन म्हणते. मात्र आठवड्यातून दोनदा हे बंधन न ठेवता आठवड्यातून एकदा वा प्रासंगिक स्वरुप विचाराझीन आहे. प्रतिक्रियेसाठी औपचारिक आभार मानणं अनौपचारिक संबंधात बसत नाही, खरं नं?
अहाहा, किती सुंदर आठवणी आहेत ! मातृदिनाचे औचित्यही खासच... माझी आजी (आईची आई) तिनेही लग्नाआधी मुलगा स्वतः पारखला होता त्या काळात. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे भांडवल न करता, किती निस्पृह ! आई-वडील -काका असे मिळणं विलक्षण आहेत या मोजक्या आठवणीही
धन्यवाद. तुमच्या सारख्यांच्या प्रतिक्रिया वाचताना मनात उमटलेल्या - हे कंटाळवाणं वाटेल का, या प्रश्नाचं सुखद उत्तर मिळून उत्साहात वाढ होते. कारण वाचणाऱ्यांच्या प्रतिसादाविना लेखनानंद साजरा होत नाही. म्हणून पुनश्च आभार🤔🌷🙏
मातृदिनाच्या निमित्ताने लिहिलेला तुमचा लेख छान आहे व त्यावेळी मुलीने घराबाहेर पडणे, निश्चितच धाडसाचे होते. त्याहून तुमच्या मातोश्री इंग्लिश शिकल्या , पोहायला, बोटिंग शिकल्या वगैरे सर्वच कौतुकास्पद आहे. त्रिवार सलाम त्यांच्या धैऱ्याला, नवीन नवीन गोष्टी शिकण्याला व शिकवण्याला. प्रमोद तेंडुलकर
If Aji saw my Marathi reading speed then I'm sure she would feel more than just happiness ;-)