Mystical Jwalamai Temple.
- Smita Bhagwat
- Oct 18, 2020
- 3 min read
Updated: Oct 24, 2020
आक्रिते ज्वालामाई मंदिराची!
आज नवरात्राच्या तिसऱ्या रात्री ज्वालामाई मंदिराविषयीची अधिक माहिती करून घेऊ. चौदाव्या शतकात सुलतानाने हिंदूंचा छळ करण्यास ज्वालादेवी यात्रेवर कंबरतोड कर लादला. त्यामुळे प्रजेत माजलेली दंगल दडपण्यास त्याने साधूंना यथेच्छ बडवण्याचा आदेश दिला. त्यात सैनिकांनी उन्मत्त होऊन ज्वालामुखी मंदिरावरही आक्रमण केले. तेव्हा या सात्विक ज्योती ज्वाळा बनल्या. त्यातून असंख्य मधमाशा उसळल्या. त्या आक्रमकांना इतक्या डसल्या की आघाडीचे सैनिक तत्काळ मरणशरण झाले. पिछाडीचे सैनिक जीव घेऊन पळाले. सुलतान घाबरला. नंतरही मंदिरावर धर्मांध आक्रमण झाले, तेव्हा प्रत्येक वेळी ते मधमाशांनी जिंकले. म्हणून भाविकांनी ज्वालादेवीस मातृस्थान दिले. ते मंदिरास ज्वालामाईचे मंदिर म्हणू लागले.
पुढे अकबराने ज्वालामाईवर अविश्वास दाखवला. ज्वालांवर मोठा जाड तवा ठेवला तर थोडे लोखंड विरघळले तरी मग ज्योती विझतील, अशी अपेक्षा बाळगून त्याने तसा आदेश दिला. पण ज्योती तवा फोडून तळपत राहिल्या. मग अकबराने ज्योती विझवण्यास पाण्याची मदत घ्यायचाफतवा काढला. पण तसे करताच उसळलेल्या वाफेने पहिल्या फळीच्या सैनिकांचा जीव घेतला. पिछाडीचे सैनिकही पोळले होते. ते अकबराकडे धावले. त्यांना पाहून अकबर घाबरला. त्याने हिंदू प्रजा अशा पापाचे क्षालन करण्यास काय करते ते जाणण्यास विद्वान ब्रंह्मवृंदास पाचारण केले. त्यांनी या आधी असा अगोचरपणा कुणी केला नसल्याने यावर उपाय ठाऊक नाही, असे सांगून काढता पाय घेतला. नाईलाजाने त्याने दरबारात सरदारांचे मत विचारले. हिंदू सरदारांनी ब्रह्मवृंदाची री ओढली. एक बेरकी यवन सरदार विखारी स्वरात हिंदू देवता सोन्यास भुलतात, असे म्हणाला. समर्थनार्थ त्याने हिंदू मंदिरात देवतांच्या शिरावर सोने-चांदीचे छत्र असते, ते कुणीतरी पापक्षालनासाठी दानात दिलेले असते, असेही!
हा अपराध मोठा! म्हणून किंकर्तव्यमूढ अकबराने सव्वा मण सोन्याचे छत्र घडवण्याची घोषणा करून सोनारांना निमंत्रण धाडले. पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. म्हणून अकबर पुन्हा हिंदू पंडीतांकडे धावला. गयावया करत त्यांची क्षमा प्रार्थून सोनारांचे मन वळवण्याची विनंती केली. पंडितांनी सोनारांना राजाज्ञा न पाळणाऱ्यास होणाऱ्या सजेचा धाक दाखवून छत्राचे काम करण्यास उद्युक्त केले. सोन्याची छत्री मंदिराच्या सिलिंगवर मातेच्या - ज्योतींच्या वर लटकवण्यास अकबर जातीने ज्वालामुखी गावी गेला. विधीवत् पूजा करणारा ब्रह्मवृंद नि सोनारांसह! पूजेत वाहिलेले कुंकू पिवळ्याधम्मक सोन्याच्या छत्रीवर फार लोभस दिसत आहे, असे तो मनापासून म्हणाला. विधीवत् पूजा झाल्यावर ज्योतींवर छत्र धरील अशा रीतीने छत्री लटकवण्याची कारवाई सुरू झाली. छत्र लटकवताच क्षणार्धात बावन्नकशी सोन्याची छत्री काळी ठिक्कर पडली. अकबराने वांरवार नाक घासून क्षमा मागितली. पण उपयोग झाला नाही. म्हणून निराश अकबर, कोणत्याही धर्माच्या विश्वासास नख न लावण्याची शपथ घेऊन हरल्या मनाने परतला.
पुढे अनेकांनी या काळा पडलेल्या धातुची रासायनिक प्रक्रिया जाणून छत्री यथावत करण्याचा प्रयत्न केला. पण छत्रीचा रंग बदलला नाही. ब्रिटीशांच्या राजवटीत छत्राचा छोटा तुकडा तोडून इंग्लंडच्या अत्याधुनिक प्रयोगशाळेत रासायनिक परिक्षण-निरीक्षण करण्यास पाठवला. तिथेही हा काळा धातू अगम्य ठरला. कोणत्या रासायनिक प्रक्रियेमुळे बावन्नकशी सोन्याचे छत्र काळवंडले याचा वैज्ञानिकांना उमज पडला नाही. १९३६साली थर्मल एनर्जी (औष्णिक उर्जा) या संस्थेत संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांना ज्वालामुखी गावात नैसर्गिक वायू सापडेल, अशी आशा वाटली. म्हणून ब्रिटीश सरकारने खोदकामास परवानगी दिली. पण खोलवर खोदल्यावरही नैसर्गिक वायू गवसला नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावर प्राकृतिक गॅस व तेल आयोगाच्या (O.N.G.C.) अधिकाऱ्यांना इथे प्राकृतिक वायू प्राप्त झाल्यास जळणाची समस्या हळवी होईल, असे वाटले. त्यांनी त्या संशोधनात जीव ओतून प्रयत्नांची शर्थ केली. पण हे गूढ उकलले नाही.
सती पार्वतीच्या या मंदिरात गाभाऱ्यात मूर्तीस महत्व नसणे हे मंदिराचे वैशिष्ठ्य! इथे आहेत धरणीतून प्रगटलेल्या स्वयंसिद्ध अग्निशिखा! त्यास भाविक प्रजा निसर्गाची किमया - कुदरतका करिष्मा समजते. या ज्योतींचे स्वरूप सदैव बदलत असते. ज्योती कधी शांत असतात तर कधी भडकत्या ज्वाळा! तार्किकतेस महत्व देणाऱ्यांना ते अशांत ज्वालामुखीचे रूप वाटते. भाविक प्रजा त्यास माता पार्वतीचे प्रागट्य समजून नतमस्तक होते. सामान्यतः इथे नऊ ज्वाळा दिसतात. भक्त त्यास महाकाली, अन्नपूर्णा, चंडी, चामुंडा, हिंगळज, विंध्यवासिनी, अंबिका, महालक्ष्मी, सरस्वती, अशी शक्तिची नऊ रुपे समजतात. रोज नऊच ज्वाळा असतील असे नाही. कधी चौदा ज्वाळा झळाळतात. भाविकांना ते चौदा भुवनांची निर्मिती करणाऱ्या चतुर्दश दुर्गेचे प्रतिक वाटते. प्रसंगी तीनच ज्योती तेवतात. त्या मातेने सत्व, रज, तम या त्रिगुणांना एकत्र करून विश्व निर्माण केले, असे सूचित करतात, असे सश्रद्ध प्रजेस वाटते.
अनेक शतकांपासून या स्वयंभू ज्वाळा, प्रजेच्या श्रद्धा नि कुतूहलाचा विषय ठरल्या आहेत. महाराजा रणजितसिंह ज्वालामाईच्या दर्शनास गेल्याचा पुरावा आहे. त्यांचे सरदार हरिसिंह नलूआ यांनी श्री. हसित भोजक नामक पुरोहिताच्या सोबतीने ज्वालामाईचे दर्शन घेतल्याची हरीसिंहजींच्या हस्ताक्षरात मंदिरातील चोपड्यात नोंद आहे. रणजितसिंह महाराजांचे पौत्र कुंवर नौनिहालसिंह आजोबांच्या आग्रहाखातर या पावन ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी मंदिरात चांदीचे दरवाजे बसवले. ते आजही मंदिराची शोभा वाढवत आहेत.
शुभम् भवतु.
ज्वालादेवी मंदिरातील स्वयंभू ज्योती



Comments