top of page
Search

Navratra in Maharashtra

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Oct 23, 2020
  • 3 min read

Updated: Oct 23, 2020

महाराष्ट्रातील नवरात्र पर्व!


रास-गरबे योग्य-अयोग्य रीतीने जगभर पोहोचले! भारतात इतरत्रही नवरात्र उत्साहाने साजरे होते. देवांच्या ठायी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या समग्र शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. शाक्त संप्रदायी तिला भजतात. देवीची उग्र व सौम्य रुपे आहेत. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीची सौम्य रूपे असून दुर्गा, काली, चंडी, भेरवी व चामुंडा ही उग्र रूपे आहेत.


प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

अशी ही देवीची नऊ रूपे आहेत.


मार्कंडेय पुराणात नमूद केले आहे की भारत शेतीप्रधान देश असल्याने पावसाळ्यात पिक निघाले की शेतकरी सण साजरा करण्यास मोकळे होतात. शरद ऋतूतील महापूजेत देवीमहात्म्य भक्तिने ऐकल्यास सर्व बंधनांपासून मुक्त होता येते. नवरात्रात निसर्ग कूसपालट करतो. मानवीदेहात नवी शक्ती आणि उत्साह संचारतो. बृहतसंहितेत सूर्य आणि इतर ग्रहात होणाऱ्या बदलाचा प्रभाव आरोग्य व व्यवहारांवर दिसतो. हा असतो शक्तिचा खेळ! शक्तिची उपासना केल्याने रोगप्रतिकारक शक्ती व स्मरणशक्ती वाढते. बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा दैहिक आणि आत्मिक विकास साधण्याचा काळ समजतात.


नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला विविध रंगाच्या फुलांनी सजवतात. पहिल्या दिवशी शेवंती नि सोनचाफ्याची पिवळी, दुसऱ्यास अनंत, मोगरा चमेली अशी पांढरी, तिसऱ्यास गोकर्ण वा कृष्णकमळाची निळी, चौथ्यास अबोली, तेरडा, अशोक वा तिळाची भगवी नि केशरी, पाचव्यास बेलाचीा कुंकवाच्या रंगाची, सहाव्यास कर्दळी, सातव्यास झेंडू वा नारिंगी, आठव्यास कमळ, जास्वंद कण्हेर वा लाल गुलाबांची, नवव्यास कुंकुमार्चन केलेल्या फुलांची सजावट करतात.


शारदीय नवरात्र महाराष्ट्राती खूप उत्साहाने साजरे होते. चौक वा मैदानात मध्यभागी चौरंग मांडून हत्तीची प्रतिमा वा मूर्ती ठेऊन मुली फेर धरतात. यास भोंडला,भुलाई, हादगा वगैरे नावे आहेत. फेर धरताना मुली लोकगीते म्हणतात. पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन, अशी चढत्या क्रमाने नऊ दिवस लोकगीते म्हटली जातात. ही गीते आता काळाच्या उदरात लुप्त होत आहेत. दुर्मिळ लोकगीते जपली पाहिजेत, असे संस्कृतीरक्षकांना वाटते. आता स्मार्टफोन मध्ये गीते जपणे सोपे झाले आहे. आपण ती जपल्यासच पुढच्या पिढीस देता येतील. म्हणून हा अमूल्य ठेवा जपल्यास ती आपली अनोखी इस्टेट ठरेल! वानगीदाखल काही गीतांची ही सुरुवात...

१) ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा...

२) गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका...

३) पड पड पावसा थेंबाथेंबी...

४) नणंदा भावजया दोघी जणी, घरात नव्हतं तिसरं कोणी... वगैरे.


फेर धरून झाल्यावर खिरापत ओळखण्याची गंमत असते. शेवटच्या दिवशी मुलींना जेवण देण्यात येत असे. आता ती फारशी दिसत नाही. पण कॅनडाच्या मराठी वनिता मंडळात आणि उत्तर अमेरिकेत काही ठिकाणी अजून ही प्रथा जपतात. त्याचे स्वरूप थोडे पॉटलक सारखे झाले आहे. फेर धरून झाल्यावर प्रत्येकीने आपण आणलेल्या पदार्थाचे (खिरापत) वर्णन करायचे आणि इतरांनी ओळखायचे असा हा गंमतीदार रसिला प्रकार असतो.


जोगवा

महाराष्ट्रात जोगवा मागण्याची पूर्वापार प्रथा आहे. हा देवीच्या उपासनेचा प्रकार आहे. शिवाजी महाराज जोगवा मागण्यास जात, अशी इतिहासात नोंद आहे. मंगळवार, शुक्रवार नि पौर्णिमेस वा नवरात्रात जोगवा मागतात. परडीत देवी ठेवून गळ्यात कवड्याची माळ घालून पाच घरी मूठभर तांदूळ वा पीठ मागण्यास जोगवा मागणे म्हणतात. मागण्यात अहंकाराचे विसर्जन होते, असा समज आहे. एकनाथ महाराजांनी जोगव्यावर रचलेले भारूड प्रसिद्ध आहे. त्यात जोगवा मागण्याचा विधी, स्वरूप आणि हेतू व्यक्त झाले आहेत.


अनादी निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासुर मर्दना लागुनी ॥

त्रिविध तापांची कराया झाडणी । भक्तांलागुनी पावसी निर्वाणी ॥

आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ मी घालीन ॥

हाती बोधाचा झेंडा घेईन । भेदरहित वारिसी जाईन ॥

नवविधा भक्तीच्या करीन नवरात्रा । करुनी पीटी मागेन ज्ञानपुत्र ।। .


देवीचा गोंधळ

शारदीय नवरात्रात देवीचा गोंधळ घालण्याची पद्धत आहे. देवीच्या उपासकांना गोंधळी म्हणतात. ते संबळ या वाद्याच्या साथीने देवीची स्तुतीकवने देवीसमोर गात नाचतात. त्यास गोंधळ घालणे म्हणतात. भगवान परशुरामाने बेटासुर राक्षसाचा वध करून त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराचे तंतू ओवून एक वाद्य तयार केले आणि रेणुकामातेसमोर वाजवत त्यांनी वंदन केले, अशी अख्यायिका आहे. तेव्हापासून गोंधळ परंपरा सुरु झाली. संभाजीराजे गोंधळात भक्तिभावाने उत्तम नाचत, अशी इतिहासात नोंद आहे.


महानवमीस तांदळाची महालक्ष्मीची प्रतिमा करून सुवासिनींनी घागरी फुंकण्याचा कोकणस्थात रिवाज आहे.


भारतात इतरत्रही नवरात्र झोकात साजरे होते. बंगालमध्ये दिवाळीहून अधिक महत्व दुर्गापुजेस असते. दक्षिण भारतात मिनाक्षी मंदिर, कांचीपुरमचे कामाक्षी मंदिर वगैरे ठिकाणी या पर्वाचा दबदबा असतो. साऱ्याचा परमार्ष घेणे अवघड आहे. शिवाय पूजेची रीत बरीचशी सारखी असते, म्हणून आज इथेच थांबू.

शुभम् भवतु





 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Nov 02, 2020

मनःपूर्वक आभार.

Like

tendulkarp
Oct 29, 2020

नवरात्र पर्वाबद्दल छान माहिती लिहिली आहे. प्रथा जरी काळानुसार लुप्त होत असल्या तरी

पुढील पिढीला माहिती तरी सांगता येईल.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page