Navratra Parva
- Smita Bhagwat
- Oct 16, 2020
- 3 min read
शारदीय नवरात्राचा आज पहिला दिवस! शारदीय नवरात्र म्हणजे शक्तीचा जागर! आपल्या एक्कावन्न शक्तिपीठातील सात अत्यंत महत्वाची समजतात. त्यातील एक आता पाकिस्तानच्या बलुचिस्तानात आहे. येथे भगवान विष्णूच्या चक्राने दक्षकन्या सतीचे ब्रह्मरंध्र (मस्तक) पडल्यानेे त्यास महत्व! या मंदिराचे नाव तनोट माता मंदिर! भाविकांच्या मते ते मा-हिंगळजचे स्वरुप आहे.
या मंदिराची यात्रा अत्यंत अवघड! कारण वाटेत हजार फूट उंच पर्वतीय परिसरात हिंस्त्र श्वापदांचे वास्तव्य! तिथून तीनशे फूट उंचीवर ज्वालामुखी! परीसरात डाकू नि आतंकवाद्यांचा वावर! पाकिस्तानातील हिंदू सेवा समितीचे प्रेसिडेंट संजेश धनजा यांनी ही माहिती दिली. हे मंदिर बॉम्बने उडवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण इथल्या हिंदू आणि बलुची मुस्लीमांनी ते उधळून लावले.
मंदिरास सरकारी सुरक्षा नसल्याने एकट्याने ही यात्रा करण्यास मनाई आहे. ३०-४०च्या गटात भक्त ही यात्रा करतात. ही यात्रा करून येणाऱ्यांची संख्या पूर्वी नगण्य असे. म्हणून यात्रेस जाण्याआधी भक्त स्वतःचे श्राद्ध करत. आजही तिथे भक्त जातात. पर्यटकांची संख्या नगण्य असते. संजेशभाईंच्या माहितीनुसार इथे ५५ कि.मी. पायी प्रवास करतात. वाटेत पाच पाडावास भेट देतात. भारतातून येणाऱ्यांना प्रथम कराचीस जावे लागते. तिथून तनोट माता मंदिर अडिचशे कि.मी. दूर आहे. कराचीजवळील नदीपासून यात्रा सुरू करतात. त्यापूर्वी यात्रिकाना दोन शपथा घ्याव्या लागतात. यात्रा पूर्ण होईतो ब्रह्मचर्य पाळण्याची आणि या यात्रेत कुणास कितीही तहान लागली तरी त्यास आपल्या सुरईतून (वॉटर बॅग) पाणी न देण्याची! या शपथा भक्ताच्या इच्छेच्या तीव्रतेची कसोटी घेण्यासाठी त्रेतायुगापासून घेतल्या जातात, असे समजतात. शपथपालन न करणाऱ्यास यात्रेचे फळ मिळत नाही. १९५९ साली निर्माण झालेल्या हिंगळज मातेवरील बंगाली भाषेतील चित्रपटात या दोन शपथांचा सादर उल्लेख करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विकास रॉय यांनी नि नायकाची भूमिका उत्तमकुमारने केली आहे.
बलुची मुसलमान या यात्रेस नानी बीबीकी हज आणि मंदिरास पीरगाह वा नानी मंदिर म्हणतात, असे मंदिराचे मुख्य पुजारी महाराज गोपाल गिरी सांगतात. रस्त्यातील मंदिराचा मार्ग दाखवणाऱ्या पाटीवर नानी मंदिराकडे जाणारा रस्ता असे लिहिलेले दिसते. या स्थानास पीरगाह म्हणण्याचे कारण कुषाण राजवंशाची माहिती देणाऱ्या तसेच ब्रिटिश गॅजेट बुकमध्ये विशद केले आहे. कुषाण राजवंशात बीबी नानी नामे धार्मिक सुफी स्त्री होती. बीबी नानीची निखळ भक्ती पाहून कुषाल राजवंश आणि सुफी मुस्लीम समाजाने तिला संताचा दर्जा दिला. वृद्धावस्थेत बीबी नानी तनोट माता वा मा हिंगळाजच्या गुंफेत वास्तव्य करत असे, अशी ब्रिटिश गॅजेट बुकमध्ये नोंद आहे. हा परीसर कुषाण राजवंशाच्या राजवटीचा हिस्सा असल्याने यास बीबी नानीकी हज, पीरगाह म्हणत अनेक मुस्लिम बांधव पूजेस येतात.
मा हिंगळजचे दर्शन घेण्यास पाच पाडाव पार करावे लागतात.
१) चंद्रकूप वा शिवकुंड! - तीनशे फूट उंचीवरील मड ज्वालामुखीची चढण चढले की लाव्हाच्या तेजस्वी ज्वाळा दिसतात. भक्त श्रीफळ वाढवून उदबत्ती लावून पूजा करतात. विभूतीभस्म मस्तकी लावून पुढे जातात.
२) अघोर नदीा! - पुराणात या नदीचा संबंध श्रीरामाशी जोडला आहे. रावण ब्राह्मण! ब्राह्महत्येच्या पापाचे क्षालन करण्यास श्रीरामाने या नदीत ज्वारीचे दाणे अर्पण केल्याची नोंद आहे. भक्तांच्या मनात नदीकिनारी श्रीरामाचे पदचिन्ह अंकित झाल्याची श्रद्धाअसते.
३) चौराशी, गोरखनाथ धुनी आणि गुरुनानक सरन - हा यात्रेचा सर्वाधिक अवघड पाडाव! यात्रिक १५ कि.मी. हिंस्त्र श्वापदांनी व्यापलेले निबिड अरण्य पार करून इथे येतात. वाटेत युगमातेचे दर्शन घेऊन, गोरखनाथांच्या धुनीच्या स्थानी धुनी पेटवून आणि गुरूनानक यांना वंदन करून ते चौथ्या पाडावाकडे कूच करतात.
४) अलैल कुंड! - हे जल पवित्रतम समजून प्राशन करण्यात येते. यात्रिक प्रसाद समजून ते भरूनही घेतात. या कुंडाची खोली मोजणे आजवर कुणास जमलेले नाही.
५) मंदिरासमोरीले कुंड! - इथे स्नान केल्यास पापाचे क्षालन होते, असा समज आहे. कारण श्रीरामाने ब्रह्महत्येच्या पापाचे क्षालन करण्यास याच कुंडात स्नान करून देवीमातेची प्रार्थना केल्याची पुराणात नोंद आहे. दर्शनास जाताना स्नान करण्याची - निदान हात-पाय धुण्याची सर्वत्र प्रथा आहेच. घातलेली वस्त्रे इथे ठेऊन यात्रिक नवी वस्त्रे परिधान करून मंदिरात जातात. कोणत्याही पाडावाचे विधि-विधान टाळणाऱ्यास मातेच्या यात्रेचे फळ मिळत नाही, असे म्हणतात.
या देवी सर्वभूते शक्ति-रुपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।



Comments