One More Mystical Temple
- Smita Bhagwat
- Oct 19, 2020
- 3 min read
Updated: Oct 20, 2020
कामाख्यादेवी - नवलप्रद शक्तिपीठ
मातेच्या एक्कावन शक्तिपिठातील महत्वाच्या शक्तिपिठात गुवाहाटीच्या कामाख्यादेवी मंदिराचा समावेश होतो. हिमालयाच्या नीलाचल पहाडीत हे मंदिर आहे. नीलाचल पहाडीच्या पायथ्यापर्यंत वाहनाने प्रवास होऊ शकतो. सुबक कलात्मक दरवाजापासून चढ सुरू होतो. या मंदिराच्या संदर्भात कालिका पुराणात एक महत्वाचा श्लोक आहे...
कामरुपीणी विख्याता हरिक्षेत्रे सनातनी।
योनीमुद्रा त्रिखंडेसी मासेमासे निदर्शिता ।।
कन्येने भणंग शिवाशी विवाह करू नये, असे पिता दक्ष प्रजापतींनी निक्षून सांगितले असून भगवती सतीने माहेर सोडले. अभिसारीकेच्या रुपात ती शिवाकडे निघून गेली. हिमालयाच्या नीलाचल पहाडीत ते भेटले. श्रीशंकराशी विवाह करून तिने स्वदेहाचा नैवेद्य दाखवला. भगवती सती आणि शिवाचा पहिला शृंगार इथे बहरला, अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून इथे सती कामाख्या नाव लाभले आहे. सती ऋतुमती होईतो, प्रेमी युगुल प्रणयरंगात रंगले. म्हणून कामाख्यादेवीचे अनोखे मंदिर निर्माण करण्यात आले, असा कालिकापुराणात उल्लेख आहे. शिव-पार्वतीचे पहिले मिलन इथे घडले. म्हणून मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार योनीमार्गासारखा आहे. सर्व दृष्टीने हे मंदिर अनोखे आहे. आठ सोनेरी शिखरांच्या संकुलाची ही रचना, मधमाशांच्या पोळ्यासादृश करण्यात आलीआहे. प्रत्येक शिखरावर त्रिशूळ! संकुलाच्या मध्यभागातील मुख्यालयात तीन विशाल कक्ष! भगवती सतीची त्रिपुरासुंदरी, मातंगी नि कमला ही रुपे स्थापित की आहेत. भोवती इतर छोटी शिखरे आनि प्रत्येक शिखराखाली मातेच्या महत्वाचा स्वरुपांची प्रतिष्ठापना केलेली आहे.
सती ऋतुमती झाल्याने शिवपार्वतीच्या प्रणयपर्वावर स्वल्पविराम पडला. तो काळ इथे अंबुआ उत्सव नावाने साजरा होतो. तार्किकतेचा आग्रह धरणारे, पौराणिक कथांना उपहासाने भाकडकथा ठरवतात. तर्कवाद निःसंशय योग्यच! तरी काही घटनांचे तर्कशुद्ध समर्थन सापडत नाही. हे उत्सवपर्वही गूढ आहे. उत्सव पर्वात सती भगवती रजस्वला असते, असे भक्तांना वाटते! बुद्धिप्रामण्यवादीही या उत्सवपर्वातील आक्रित पाहून तोंडात बोट घालतात. कारण तेव्हा मातेच्या गाभाऱ्यातून बाहेर येणाऱ्या तीर्थाचा रंग लाल असतो. भक्त त्यास ‘योनीतीर्थ’ म्हणतात. महादेवाच्या पिंडीचा उत्पत्तीचे प्रतिक समजून आदर करतात, तसा ‘योनीतीर्थाचा’ही! मुळात एका देहातून दुसरा देह उत्पन्न होणे, ही निसर्गाची गूढ किमयाच आहे. म्हणून उत्पत्तीचे यशोगान गाणाऱ्या या स्थळास भक्तजन ‘तांत्रिक गड’ म्हणतात. उत्सव पर्वातील तीनच दिवस तीर्थाचा रंग लाल का असतो, याचे उत्तर आजतागायत सापडलेले नाही.
सतीस्वरुप आदिशक्ती महाभैरवीचे हे सर्वोच्च कौमारी तीर्थ आहे. म्हणून इथे कुमारी पूजनाचे अनुष्ठान महत्वाचे मानतात. सर्व कुलातील आणि वर्णातील कुमारिका आदिशक्तीचे प्रतीक मानल्या जात असल्याने इथे कोणताही जातीभेद पाळला जात नाही. तसे करणाऱ्या साधकाची सिद्धी नाहीशी होते, असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून अशा साधकास त्याचे पद गमवावे लागते.
महाभारतात भीमपुत्र घटोत्कचाचा पुत्र बार्बारीक यास कामाख्यादेवीने अफाट शक्तीधारक बाण दिल्याचा उल्लेख आहे. दुर्बळांना मदत करण्यासाठीच तो वापरायचा, अशी कामाख्यादेवीने अट घातली होती. कुरुक्षेत्राच्या महायुद्धात पांडवांचे संख्याबळ कमी होते. म्हणून बार्बारीक आजोबांना मदत करण्यास कुरुक्षेत्री जायला निघाला. पण तो पोहोचेतो पांडवांचे पारडे जड नि कौरव दुर्बल अशी स्थिती निर्माण झाली होती. मातेच्या अटीनुसार बार्बरीकास कौरवांना मदत करावी लागणार होती. श्रीकृष्णास हे ठाऊक होते. म्हणून त्यांनी कौशल्याने बार्बरीकाकडे मस्तकाचे दान मागितले. त्याने अजिबात आढेवेढे न घेता ते दिलेही. म्हणून श्रीकृष्ण प्रसन्न झाले. त्यांनी कलियुगात एक श्रीकृष्णमंदिर बार्बरीकाच्या नावाने ख्यातकीर्त होईल असे त्यास वचन दिले. राजस्थानात सीकर जिल्ह्यात खाटुश्यामजी येथील कृष्णमंदिर, या वरदानाचे फलित आहे. श्रीकृष्णाच्या वचनानुसार इथे श्रीकृष्णाची पूजा ‘बाबाश्याम’ नावाने होते.
असे अनेक गूढ नि चमत्कृतीपूर्ण किस्से सादर करणारी स्थळे हिमालयात विखुरली आहेत. मुळात सर्व शक्तिपीठांची निर्मितीच चमत्कारीक आहे. कुदरतका करिष्मा ठरावा, अशी आहे. ज्वालामाई नजिकच्या ‘गोरख डब्बी’ या स्थानही शक्तिपीठ नसूनही भाविकांना महत्व वाटते. त्यांच्यामागे पर्यटकही तिथे जातात. गोरख डब्बीचे छोटे कुंड सर्वांना थक्क करते. कुंडातील पाणी उकळताना दिसते. पुरोहित त्यात हात घालून नेत्रास पावनस्पर्श करवण्यास सांगतात. पर्यटक उकळत्या पाण्यात हात घालण्याचे धाडस करण्यास तयार होत नसतात. भक्तजन मात्र सहज हात घालून स्पर्शाने पुलकीत झालेले दिसतात. त्यांच्या हातावर भाजल्याची लाली वा फोड आले नसल्याचे पाहून पर्यटकांना धीर येतो. ते भीतभीत पाण्यात हात घालतात. उकळ्या फुटत असूनही जलाचा स्पर्श, शीतल असतो. त्या स्पर्शात अनिर्वचनीय सुख जाणवते. दिसते तसे नसते, म्हणून जग फसते, या म्हणीची प्रचिती देणारा हा अनुभव! या कुंडावर धुपाची छोटी ज्योत दाखवली की जळावर महाज्योत प्रगटते.
अशा कित्येक चमत्कृतीपूर्ण घटनांचे रहस्य शोधण्यास संशोधकांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे. तरी गूढ न उकलले तर या स्थानांना जागतिक आश्चर्याचा - निसर्गाच्या अलौकिक किमयेचा मान दिला पाहिजे. पण... ते न होण्यास कोणतासा पण नडतो. जागतिक आश्चर्याचा सन्मान मिळण्याची क्षमता असूनही त्यांना स्वीकृती न मिळण्याचे कारण शोधले पाहिजे. कामात उदासी नि भ्रष्टाचारात उत्साह अशा राजकारण्यांचा हा प्रताप, की आपल्या प्रसारण माध्यमांच्या कार्यशैलीतील खामी की आपल्याकडे निरीच्छतावाद, प्रसिद्धी परांङमुखता वगैरेस टोकाचे महत्व असल्याने असे होत असेल याचा शोध घेऊन वस्तुस्थितीचा छडा लावण्याचा ध्यास घेतला पाहिजे. कारण भारतातील अनेक आश्चर्यजनक स्थळे जागतिक आश्चर्य ठरण्यास समर्थ असून आजवर ते घडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा स्थानांना रास्त सन्मान मिळवून दिला पाहिजे. तुम्हाला नाही असे वाटत?
शुभम् भवतु
कामाख्यादेवी मंदिर.



Comments