top of page
Search

Rangavali

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • May 14, 2020
  • 3 min read

रांगोळी वा रंगावली

वेदकालपासून मांगल्याचा संकेत म्हणून रांगोळीस महत्व आहे. वसुधेच्या सौंदर्य संवर्धनासाठी शिरगोऱ्याची शुभ्र पूड वापरून रेखलेल्या भू-चित्रांना म्हणतात रांगोळी! रांगोळीने सजवलेले अंगण पाहून मन प्रसन्न होते. सडा संमार्जन करून गृहलक्ष्मीने अंगणात आणि तुळशी वृंदावनापाशी रांगोळी रेखावी, असे धर्मवचन आहे. रांगोळी म्हणजे रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून प्रगट होणारी कला! स्वच्छ भूमीवरील रांगोळी म्हणजे शुचितेचा साक्षात्कार! कला आणि आर्यपरंपरेचा लोभस संगम! अंगणात रेखलेल्या रांगोळीस दुष्टप्रवृत्तींना घरात येऊ न देणारी संरक्षक सत्ता असेही म्हणतात. रांगोळी जपण्यास सांभाळून चालावे लागते. रांगोळी रेखताना मनात एकाग्रता आणि सृजनशीलता प्रगटते, असा उत्तम रांगोळीकारांचा अनुभव आहे. आर्यांच्या संस्कृतीत हजारो वर्षांपासून शुभ्र रांगोळी आणि त्यात रंग भरण्याची लोभस कला परंपरेच्या माध्यमातून विकसित झालेली आहे.


आर्य सुजाण! हितोपदेशासाठी भाषणबाजीचा मार्ग कंटाळवाणा ठरेल, हे त्यांना कळले. म्हणून त्यांनी हितप्रद बाबींची धर्मभावनेशी सांगड घालण्याची युक्ती योजली. ती शंभर टक्के यशस्वी ठरली. धर्मभावनेशी जोडलेल्या हितप्रद बाबी समाजाने सहज स्वीकारल्या. सुरुवातीस रांगोळीचे रेखाटन अंगणात आणि देवांसमोर असे. त्यामुळे रांगोळीत कलेहून अधिक प्रतिकांचा समावेश असे. स्वस्तिक, कमळ, कलश, कासव, श्रीफळ, कुंकवाची कुयरी, शंख…. वगैरे रेखाटण्यास महत्व असे. पुढे कलावतींना तसेच कलाकारांनाही त्यात कौशल्याचा समावेश करावासा वाटू लागला. अंगण, तुळशीवृंदावन वा देवासमोरच नव्हे तर मंगलप्रसंग साजरा करताना मांगल्याचे प्रतीक असलेल्या रांगोळीने स्थान मिळवले. विशिष्ठ प्रसंगी विशिष्ठ प्रकारच्या रांगोळ्यांना महत्व प्राप्त झाले. गुढीपाडवा ते अक्षय्यतृतीया चैत्रांगण, गुढापाडवा नि दसऱ्यास धनुष्य-बाणाचे रेखाटन, रामनवमी नि कृष्णजन्मावेळी पाळणा, धनत्रयोदशीस प्रवेशद्वाराशी कासव, वसंत पंचमीस फुलांचा बहर सुचवणाऱ्या परड्या…. रांगोळीच्या रेखाटनात आशयघनता आणि वैविध्य प्रगटू लागले. तुळशीवृंदावनाशी रेखलेल्या रांगोळीतही सृजनशीलता दिसू लागली. कलेचा अतिरेक झाल्यास तो गृहकृत्यात बाधा निर्माण करील, असा विचार करून नित्याच्या रांगोळीत लक्ष्मीची पाऊले, गोपद्म, छोटे फूल… वगैरे साधे आणि सोपे प्रकारच असत. यात दैनंदिन जीवनात मांगल्याचा आणि पावित्र्याचा विसर पडू नये, हा विचारही होता. म्हणून विविध प्रतिकांचे रेखाटन बंद झाले नाही. तुळशी वृंदावनापाशी रांगोळी रेखून तुळशीची पूजा करणे, ही गृहलक्ष्मीच्या सुसंस्कृततेच्या श्रीमंतीची रसिद ठरे.


पूर्वी रांगोळी सारवलेल्या जमिनीवर रेखाटत. रांगोळी काढण्यास उसंत नसेल तेव्हा हळद-कुंकू वाहून वसुधेची पूजा केली जाई. पुढे रांगोळीस सौंदर्य प्रदान करण्यास सारवणात गेरू मिसळणे घडले. बहुतेक ठिकाणी रांगोळीचे रेखाटन विशिष्ट जागी चौकोनी सारवणावर करत. अशुभ प्रसंगीही रांगोळी रेखाटण्यात येई. पण न सारवलेल्या जमिनीवर रांगोळी रेखाटून अभद्राचा संकेत दिला जाई. रांगोळीत वापरण्यात येणाऱ्या प्रतीकात विशिष्ट अर्थ सूचित होत असे.


१) बिंदू – हे बीजाचे आणि बीजातील सुप्तावस्थेतील सृजनशक्तीचेही प्रतीक! हे प्रतीक मातृत्व आणि सौभाग्याचेही!

२) सरळरेषा – संशोधन आणि प्रबोधनशक्तीचे प्रतीक! बिंदू जोडून रेषा निर्माण होते. म्हणून रेषेत स्नेहभावनेने जोडण्याच्या सामर्थ्याचा पुरस्कारही सूचित होतो.

३) अर्धवर्तुळ – ज्ञान, विज्ञान, व्यवहार, संस्कृती इत्यादी शक्तिधारणेचे हे प्रतीक!

४) वर्तुळ – वर्तुळाचे रेखाटन चंद्रासारखे शीतल आणि प्रकाशमय जीवनाचे प्रतीक सूचित करते. त्यात जीवनाच्या अनादि अनंत स्वरूपाचा संकेत असतो नि पूर्णत्वाचाही!

५) शृंखला – सोप्या भाषेत साखळी! समन्वयाचे प्रतीक! कडीत कडी गुफून शृंखला तयार होते. तशा स्नेहभावनेच्या कड्या जोडून एकात्मता निर्माण व्हावी, अशी सद्भावना यात अभिप्रेत असते.

६) केंद्रवर्धिनी – विश्वाचे अनंत स्वरूप सूचित करण्यास केंद्रवर्धिनी! मूलतत्वाच्या अमर्याद विकसनशीलतेचेही हे प्रतीक!

७) सर्परेखा – सर्परेखेच्या माध्यमातून जल आणि वारा यांचे लाटांसारखे रूप सूचित करतात. सर्परेखा वहन सूचित करते. त्यातून ज्ञान, विज्ञान आणि प्रज्ञानाच्या विकासाच्या शुभसंकेताचे वहन सूचित होते.

८) ॐ कार – ॐ ब्रह्माच्या अक्षर रूपाचे प्रतीक! सृष्टीच्या आदिस्वराचे तसेच ईश्वररूपाचे प्रगटीकरण!

९) श्रीकार – ईश्वरतत्वाचे अक्षररूप! म्हणून त्यास शुभारंभाच्या प्रतिकाचा दर्जा देतात.

१०) शंख – प्रणवध्नीची नादमयता प्रगट करणारे प्रतीक!

११) चक्र – कालनिर्देशक! सृष्टीचक्र परिवर्तनशील असते. चक्राच्या माध्यमातून भूत, वर्तमान व भविष्याचे कालचक्र अविरत फिरत असते, ही परिवर्तनशीलता सूचित करतात.

१२) गदा – सत्प्रवृत्तीचे संरक्षण आणि खलप्रवृत्तीचे निर्दालन सूचित करण्यास या प्रतिकाचा उपयोग करतात.

१३) बाण – लक्ष्यसिद्धीचा उद्देश पूर्ण करण्यास एकाग्रतेची नितांत गरज असते. ती सूचित करण्यास हे प्रतीक वापरतात.

१४) पद्म – सौंदर्य, शुचिता, मृदुता, विमलता सृजनशीलता…. सूचित करणारे हे प्रतीक! लक्ष्मीचे आसन!

१५) कलश – पंचमहाभुतांच्या मूलतत्वाचे प्रतीक असा याचा परिचय! विश्वरचना आणि समृद्धीचे हे प्रतीक!

१६) ध्वज – हे अग्निशिखा, तेज, तप, त्याग आणि विजय एकवटणारे प्रतीक!

१७) शाङर्ग – विजय आणि लक्ष्यसिद्धीच्या संप्रेरक शक्तीचे प्रतीक!


काळ परिवर्तनशील आहे. म्हणून पुढे रांगोळ्यत वैविध्य निर्माण झाले. रेखाटनात फक्त रांगोळी, हळद, कुंकूच नव्हे तर सुशोभनासाठी अनेक रंग वापरले जाऊ लागले. रांगोळीची पूड वापरूनच नव्हे तर विविध फुले, पाने, धान्याचे दाणे, तसेच कलात्मकतेने चिरलेल्या भाज्या वापरूनही देखण्या रांगोळ्या रेखणे घडू लागले. रांगोळीस कलेचा सन्मान देऊन स्पर्धा होऊ लागल्या. रांगोळीच्या संकल्पनेत कितीही वैविध्य प्रगटले तरी रांगोळीची पूड वापरून मंगल प्रसंगी रेखलेल्या रांगोळीचे महत्व कमी झाले नाही. ज्यांच्या हातात विशेष कला नसेल, ते ठिपके (बिंदू) रेखून ते जोडून रांगोळीची सुबक रचना करतात. चिकाटी, नीटनेटकेपणा आणि रंगसंगतीची जाण असेल तर ठिपके जोडून रेखलेली रांगोळीही आकर्षक होते.


वानगीदाखल चैत्रांगण रंगोळीचा प्रकारदिला आहे.


या माळेत आपण मंगळवारी सण,परंपरांच्या मथितार्थाचा मोती गुंफणार आहोत.


 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

7 Comments


sayali.mokate
May 19, 2020

नाजूक मग ती ठिपक्यांची असो वा मुक्त, तशीच ठसठशीत पाच बोटी संस्कारभारती, दोन्ही रांगोळ्या सुरेख दिसतात. ती बोटं पकडून मान-पाठ-चित्त एकाग्र करत रेखाटन करणं ही खरंच छान कला आहे. त्यातही आजकाल सोपी आयुधे वापरून झटपट रांगोळी जमते. माझी एक सहाध्यायी पाण्याखालचीही रांगोळी काढायची.

Like

joshi.nandita
joshi.nandita
May 18, 2020

I don't know how to make rangoli. I just do swastik and formal one. But henceforth, i shall try to be more creative. Very informative write up.

Like

Smita Bhagwat
Smita Bhagwat
May 17, 2020

धन्यवाद.

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
May 17, 2020

फार सुंदर माहिती दिली आहे. रांगोळीत कालानुक्रमे झालेले बदल आणि तरी जपण्यात आलेली परंपरा सविस्तर विशद केली आहे. आभार.

Like

Salyl Bhagwat
Salyl Bhagwat
May 17, 2020

म्हणजे? नोकरी, कुटुंब, लेखन, अध्यापन, समुपदेशन etc. मधुन रांगोळी साठी वेळ नाही मिळाला?! :-)

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page