top of page
Search

Shaktiparva - Shaktipithe

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Oct 17, 2020
  • 3 min read

Updated: Oct 24, 2020

शक्तिपर्व - शक्तिपिठे


शारदीय नवरात्राची दुसरी रात्र! मातेच्या शक्तिपिठांविषयी शिवपुराणात दक्षप्रजापतीची कथा आहे. श्रीमंत जामात लेकीस सुखी ठेवील, असे त्यास वाटले. पण लेक सती भगवान महेश्वरांवर अनुरक्त! महेश्वरास वरल्यास माहेरास मुकावे लागेल, अशी दक्षप्रजापतींनी धमकी दिली. कालप्रवाहात विरोध वाहून जाईल आणि पितृप्रेम उचंबळेल, असे समजून सतीने माहेर सोडले. पुढे माहेरी महायज्ञ ठरला. श्रीशंकरास निमंत्रण नव्हते. ते नजरचुकीने घडले असेल असे समजून सतीने माहेरी जाण्याची तयारी केली. हा हेतुपुरस्सर केलेला अपमान आहे, असे श्रीशंकर म्हणाले. पण सतीस ते पटले नाही. श्रीशंकरांनी जोडीने जाणे नाकारले तरी सतीस माहेरी जाण्यास नकार दिला नाही. तिच्या संरक्षणासाठी वीरभद्रास निवडक शिवगणासह पाठवले. पण...


सतीला पाहिले तरी दक्षप्रजापतीने दुर्लक्ष केले. सतीला ही उपेक्षा झोंबली. तिने सहज यज्ञभूमीकडे नजर वळवली. तिेथे श्रीशंकराचा हवीभाग नव्हता. म्हणून तिने यज्ञाचे निमंत्रण जावयास का पाठवले नाही, असे विचारले. पित्याने, आपण स्मशानात राहणाऱ्या भणंग भिकाऱ्यास जावयाचा मान देणार नाही, असे निक्षून सांगितले. पितृप्रेम गृहित धरून पतीचे रास्त म्हणणे डावलणे, हे सतीधर्म चुकणे आहे, असे वाटून ती स्तब्ध झाली. पण लगेच यास स्वतःचा हा अपराध अक्षम्य ठरवून ती यज्ञकुंडाकडे धावली. क्षणार्धात तिने यज्ञकुंडात झोकून दिले. यज्ञकुंडातून भयप्रद तेजपुंज प्रगटला. शिवगणांना हे सहन झाले नाही. त्यांनी संतापून यज्ञाचा विध्वंस केला. श्रीशंकरास विपरीत अभद्राची चाहूल लागल्याने ते तिथे प्रगटले. सतीच्या कलेवरातून निघणारी धूम्ररेषा आकाशगामी होत असलेली पाहून त्यांचा शोक अनावर झाला. सतीचे कलेवर खांद्यावर घेऊन ते 'हे सती, हे सती' असा आक्रोश करत रानोमाळ भटकू लागले. त्यांच्या दमदार पदस्पर्शामुळे धरणी हादरत होती. त्यांना रोखण्याचे बळ नसल्याने सारे देव आणि ऋषीमुनी श्री विष्णुस शरण गेले. धरणीस वाचवण्यासाठी श्रीविष्णुंनी धनुष्य परजून सतीच्या कलेवरावर ५१ बाण सोडले. (काही ठिकाणी चक्र सोडल्याचा उल्लेख आहे) त्यामुळे सतीदेहाचे ५१ भाग - तुकडे आसमंतात उधळले. ते जिथे पडले ती स्थळे शक्तिपिठ परिचय पावली. तिथे श्रीशंकराचे वास्तव्य गृहित धरतात.


भगवती सतीची जिव्हा गर्द वनराईत पडली. त्या स्थानाचे तंत्र चुडामणी या ग्रंथात वर्णन आहे. ज्वालामुख्याम् महाजिव्हा, देव उन्मत्त भैरव। म्हणजे सतीची महाजिव्हा पडली त्या स्थानी भगवान शंकर उन्मत्त भैरव स्वरुपात असतात.


ज्वालामुखी मंदिराच्या संदर्भात एक कथा सांगतात. सतीची जिव्हा पडली ती वनराई गर्दतेमुळे काहीशी भयाण भासत असे. म्हणून तिथे चरायला नेलेल्या गाई दूध देत नाहीत, अशीआवई उठली. त्यामुळे कुणी तिथे फिरकत नसे. परिणामी वनराई अधिक भयप्रद दिसू लागली. पण पुढे मोठा दुष्काळ पडला. कुरणे सुकली. प्रजा नि गुरे सतत मरत होती. अशा वेळी एका गुराख्यास वाटले की दूध न दिले तरी चालेल पण गाईंचा जीव वाचला पाहिजे. म्हणून त्याने आपल्या गाईंना त्या वनराईत नेले. लुसलुशीत गवत खाऊन तृप्त झालेल्या गाईंनी खूप दूध दिले. अपवाद कपिलेचा! दुसऱ्या दिवशीही! इतर गाई भरपूर दूध देत असताना कपिलेने दूध न दिले तरी गुराख्याची तक्रार नव्हती. तरी कुतूहलापोटी त्याने कपिलेवर पाळत ठेवली. वनराईत शिरताच कपिलेने इतर गाईंच्या विरुद्ध मोर्चा वळवला. तोच एक तेजस्वी बालिका धावत आली. तिने कपिलेवरून प्रेमाने हात फिरवताच कपिलेने पान्हा सोडला. ती बालिका गोरस पिऊ लागली. तृप्त बालिकेने गाईच्या अंगाला दुधाळ ओठ पुसले नि ती चालू लागली. गुराखी तिचा पीछा करत होता. पण अचानक ती दिसेनाशी झाली. हेच रोज होत असे. पण सोमवारी वेगळे घडले. गोरस प्राशन करून तृप्त झालेली बालिका परतीच्या वाटेस लागली. काही वेळात बालिकेने ज्योतीचे रूप धारण केले आणि ती जमिनीत लुप्त झाली. गुराखी चक्रावला. त्याला याचे मर्म कळेना. आपण ज्ञानी नसल्याची जाणीव असल्याने तो राजा भूमिचंद्राकडे गेला. वनराईतील सर्व घटना सांगून तो म्हणाला, "मला ती बालिका देवी वाटते! पण मी ज्ञानी नाही. राजा विष्णूचा अवतार असतो, म्हणून सांगायला आलो की माझ्या गाई पोटभर चरतात, तशी इतराच्याही गाईंचीही पोटे भरावी, असे वाटत असल्यानेही मी भेट मागितली!" राजालाही आपण ज्ञानी नसल्याची जाणीव होती. म्हणून त्याने राजगुरुंना बोलावले. गुराख्याने पुन्हा सारे घटित सांगितले. राजगुरुही चक्करभेंड झाले. ते गुराखी नि राजांसह वनराईत गेले. समग्र घटनाक्रम जसाच्या तसा! त्यांनी विचारपूर्वक बेत ठरवून सोमवारी येण्याचा गुराख्यास शब्द दिला.


सोमवारी गुराखी वनराईशी गेला तेव्हा राजगुरु आणि राजा तिथे उपस्थित होते. ठरल्याप्रमाणे तिघे सतर्कतेने निरीक्षण करत होते. ती बालिका परतीच्या वाटेस लागली. विशिष्ठ ठिकाणी तिने ज्योतीरूप धारण करताच या तिघांनी नम्रतेने ज्योती सभोवती हात धरून देवीची मनोभावे प्रार्थना केली. त्यामुळे ती तेजस्वी ज्योत जमिनीत लुप्त न होता तिथे स्थापित झाली. सर्वांनी आदराने नतमस्तक होऊन पुन्हा प्रार्थना केली. राजा भूमीचंद्राने तिथे महाचंडी यज्ञ केला. त्यावेळी शुभ प्रसंगास स्नेही येतात तशा स्वयंसिद्ध तेजस्वी ज्योती आपसूक प्रगटल्याा. राजा भूमिचंद्राने ज्योतींभोवती मंदिर बांधले. तेव्हापासून आजतागायत तिथे या स्वयंसिद्ध ज्योती तेवत आहेत. कित्येक शासकांनी इंधनाविना झळाळणाऱ्या ज्योती विझवण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. या स्थानाच्या संदर्भात अधिक माहिती नवरात्राच्या तिसऱ्या दिवशीच्या जागरात!

शुभम् भवतु.


कांचीची देखणी कामाक्षीदेवी.


ree


 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Oct 19, 2020

धन्यवाद.

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Oct 18, 2020

फार छान माहिती दिली आहे. लोकांना ही माहिती नसेल. अशी माहिती ध्यानात ठेऊन नवरात्राचा उत्सव साजरा

केल्यास योग्य होइल.

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page