Shree Ganesh in Dnyaneshvari.
- Smita Bhagwat
- Aug 30, 2020
- 2 min read
Updated: Aug 31, 2020
ज्ञानेश्वरीतील गणेश पूजन.
पुण्यसलीला गोदावरी आणि प्रवरा नदीच्या पवित्र स्थानी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका या महान ग्रंथाचे लेखन झाले. करुणासागर ज्ञानदेवास लोक माऊली म्हणत. संस्कृत भाषेतच असलेले ज्ञान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानदेवांनी ते प्राकृत भाषेत आणण्याचे महत्कार्य केले. कोणत्याही कामाची सुरूवात गणेशपूजनाने होते. ज्ञानेश्वरीचे लेखनही गणेशपूजनाने सुरू झाले, हे सारे जाणतात.
ॐ नमोजी आद्या । वेद प्रतिपाद्या। जय जय स्वयं वेद्या। आत्मरुपा ।। १।।
देवा तूचि गणेशु। सकळ मति प्रकाशु। म्हणे निवृृत्ती दासु। अवधारी जो जी।।२।।
हे निर्गुणरूपा ब्रह्मा, आत्मरूपा, तू सर्वांचा आदि (आरंभ) आहेस, असे तुझे वेदात वर्णन आहे, अशी सुरूवात करून व गुरु निवृत्तीनाथांचा दास असल्याचे नमूद करून ज्ञानदेवांनी श्री गणेशाच्या बाह्यांगाचे वर्णन केले. गणेश पुराणात प्रत्येक युगातील गणेशाचे वेगळे वर्णन आहे. कृतयुग वा सत्ययुगातील गणेशास दहा भुजा (दशभुजा गणपती)असून त्याचे विनायक नाव प्रचलित आहे. त्रेतायुगातील गणेशास सहा भुजा असून तो चंद्रासारखा शीतल आहे. द्वापरयुगातील गणेश रक्तवर्ण असून त्यास चार भुजा आहेत. कलियुगातील गणेशाचा धूम्रवर्ण असून त्यासही चार भुजा आहेत. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत वर्णन केलेला गणेश त्रेता युगातील असल्यामुळे तो सहा भुजांचा गणेश आहे.
अथर्वशीर्षात त्वम् वाङमयस्तम् चिनमयः असे वचन असल्याने आणि ज्ञानेश्वरी हे वाङमय असल्याने ज्ञानदेव प्रथमेशास पूजेचा पहिला अधिकारी म्हणत गणेशाचे अंतर्दर्शन नि गूढार्थ समजावण्यास पुढे म्हणतात...
देखा षड्दर्शने म्हणिपती। तेचि भुजांची आकृति। म्हणौनि विसंवादे धरिता। आयुधे हाती।।१०।।
तरी तर्कु तेचि फरशु। नीतिभेदु अंकुशु। वेदान्त महारसु। मोदकु मिरवे।।११।।
एके हाती दंतु। जो स्वभावतः खंडितु। तो बुद्धिमंत संकेतु। वर्तिकांचा ।।१२।।
मग सहजे सत्कारवादु। तो पद्माकर वरदु। धर्म प्रतिष्ठा सिद्धु। अभयहस्त।।१३।।।
या गणेशास सहा हात आहेत. त्याचा प्रत्येक हात जणू शस्त्र आहे. फरशुच्या स्थानी तर्कशास्त्र. अंकुशाच्या जागी न्यायशास्त्र, वेदांताचे माधुर्य मोदकात उतरले आहे.... असे या हातांचे वर्णन करून कल्याणकारी सत्कारवाद आणि पद्माकराचा वरदहस्त अभय सूचित करण्यास उंचावलेला आहे, असे ते सूचित करतात. आपण कलियुगात जगत आहोत. कलियुगापूर्वी कृतयुग वा सत्ययुग. त्रेतायुग आणि द्वापरयुग अशी तीन युगे उलटलेली आहेत. ज्ञानेश्वरीतील त्रेतायुगानुसार असलेल्या गणेशाचे दर्शन आजही उत्तरेत काही ठिकाणी बघायला मिळते. सहा हातांचा असा गणपती उत्तरेत कांगडा नजिक असलेल्या वैजनाथ क्षेत्री तसेच अजुनी काही ठिकाणी बघायला मिळतो.
गणेशवंदन करून भावार्थ दीपिका तयार करणाऱ्या ज्ञानदेवांनी पसायदानाच्या माध्यमातून दुष्टांचे निर्दालन करण्याचा विचार न करता त्यांचेही भले चिंतले आहे. या ममतेमुळे त्यांना माऊलीचे सर्वोच्च स्थान देण्यात येते. या वैचारिक जागरात आपणही आर्यावर्तात माजलेल्या भ्रष्ट दुष्टांना सद्बुद्धी प्राप्त व्हावी या साठी गणेशाची प्रार्थना करू.
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रति वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ।
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात ।।
शुभम् भवतु.



संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेची सुरुवात गणेश वंदना ने केली हे दुसर्या कारणासाठी सुद्धा असू शकेल का? म्हणजे श्री गणेश नेच महाभारत लिहिले ज्यात भगवद गीता आहे आणि भावार्थ दीपिका त्यावरचे महा भाष्य आहे!