Smrutigandh.
Updated: Apr 13, 2021
स्मृतीगंध (वेचलेले मोती)
नमस्कार मंडळी.
गेले काही महिने प्रकृतीच्या समस्येमुळे (कोविडके सिवा और भी गम है जमानेमें) आपली भेट नाही घेता आली. अजून समस्या सरली नसली तरी ती मार्गी लागली आहे. आज गुढीपाडवा या शुभदिनी सुह्रदांना हे कळवावे आणि आजही कोविडने झाकोळलेल्या समाजास सर्वे सुखिनः संतु... हा भावना व्यक्त करावी. त्याच बरोबर पूर्वाश्रमात म्हणजे विजया कप्तानने लिहिलेले काही मोती ब्लॉगवर ठेवावे असे वाटले. बालपणी वाचनाचे बाळकडू नि स्मरणशक्तीचे वरदान मिळाल्यामुळे मोत्यासारख्या झळझळीत विचारांची माळ गुंफण्याची इच्छा आहे. यातील काही मोती विजू कप्तानने ओवले आहेत तर काही स्मिता भागवतने! म्हणजे ही माझी वा विजू कप्तानची स्वतंत्र निर्मिती नाही. हे आहे फार पूर्वी केलेल्या वाचनाचे आमच्या शब्दात सादरीकरण! तर मंडळी हा आहे नवव्या यत्तेत शिकणाऱ्या विजूने शब्दबद्ध केलेला अनुभव आणि त्या विचारास आहे स्मिता भागवतच्या मुक्तकाचा साज!
प्रार्थना
विनोबा भावे बडोद्यास आले. त्यांनी प्रेमाने उद्याच्या नागरिकांना - म्हणजे आम्हा कुमारवयातील मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भाषण ऐकण्याच्या अपेक्षेने तिथे गेलेल्या आमच्याशी त्यांनी आपल्या-तुपल्या गप्पा मारल्या. अण्णा आणि काका नेहमी सांगतात - 'दिसामाजी काही तरी ते लिहावे....' पण तिकडे मी आजवर दुर्लक्ष केले. आज या आजोबांचे विचार लिहून पुढेही हा संकल्प चालू ठेवण्याचा विचार करावासा वाटला.
"तुमच्यासारखी कुमारवयातील मुले विचारतात, 'प्रार्थना का करावी?" विनोबाजी सांगू लागले, "प्रार्थनेत असतो, स्नान, भोजन आणि निद्रेमुळे मिळणाऱ्या सुखांचा त्रिवेणीसंगम! थकल्या देहास निद्रा विश्रांती प्रदान करते. माणूस ताजातवाना होतो. प्रार्थनेमुळे थकल्या मनास विश्रांती लाभून आध्यात्मिक उत्साह प्रगटतो. भोजन देहाचे पोषण करते तर प्रार्थना मनाचे! स्नानामुळे मलीन देह शुद्ध होतो तर प्रार्थनेमुळे मनी शुद्ध होते!"
"मुले विचारतात - आत्मा म्हणजे काय? मी सांगतो - स्फूर्ती देतो तो आत्मा! आत्म्यात सुषुप्तावस्थेत अलोट शक्ती असते. शक्ती शुद्ध स्वरुपात प्रगट व्हावी. कुसंगतीच्या परिणामी ही शक्ती अशुद्ध वा विकृत रुप धारण करते. मग मनात विकल्प जन्मतो. आत्म्याची शक्ती शुद्ध संकल्पाच्या स्वरुपात प्रगट व्हावी यासाठी प्रार्थना! पुढचा प्रश्न असतो, प्रार्थना कशी करावी?"
"प्रार्थना सुरू करण्यापूर्वी शांत बसून मनास थोडा अवधी द्यावा. तंत्र-मंत्र म्हणतात ते केवळ प्रास जुळवण्यासाठी नाही. तन तयार करण्याच्या प्रक्रियेस म्हणतात तंत्र आणि मनाने भजतात तो मंत्र! मंत्राचे चिंतन करायचेे असते. भोजन पंधरा-वीस मिनिटात होते. पण ते पचण्यास चार-पाच तास लागतात, तशी पंधरा मिनिटे केलेली प्रार्थना आत्मसात होण्यात पूर्ण दिवसाची गरज असते. प्रार्थना भांगेच्या गोळीगत नशा आणणारी नसावी. दैनंदिन कार्यातून ती विनासायास प्रकट व्हावी. प्रार्थनेचा परिणाम कर्मयोगातून प्रकट व्हावा. प्रार्थनेत यांत्रिकता घुसल्यास मंत्र केवळ ओठांवरून घरंगळतात. अशी प्रार्थना स्फूर्तीदायक नसते. भक्ती कर्मकांडात नसून जनसेवेच्या भावनेत असतेे!"
"प्रार्थनेत संतवाणी का असावीा? कुणाचे बोल आपण बोलणे पोपटपंची नाही का? आपल्या वाणीत आपलाच विचार नको का?,... असे असंख्य प्रश्न तारुण्याकडे वाटचाल करणाऱ्या तुम्हा मुलांच्या मनात धुमाकूळ घालत असतात. त्यांना मी सांगतो - आपले मन जाणून घेणे महत्वाचेेच, पण ती तपस्या असते. मन उमगल्याविना मनाची भाषा तयार होत नाही. आपली वाणी दुबळी असेतो वा आपल्या मनाची भाषा तयार होईतो संतवाणीची मदत घेण्यात कमीपणा मानू नये. संतवाणीशी तादात्म्य अनुभवणाऱ्यास, आपसूक स्वतःच्या वाणीचा शोध लागतो. म्हणजेच तो संताच्या कक्षेस पोहोचतो. स्वतःच्या वाणीचा शोध लागला नाही तरी हिरमुसू नये. दुसऱ्याने रांधलेले जेवण आपल्या देहाचे पोषण करते तसे संतवाणीत मनापासून केलेली प्रार्थना परिणामकारक ठरते!"
पूर्वाश्रमात लिहिलेले हे लिखाण वाचताना मला माझे एक मुक्तक स्मरले....
लक्ष दीप लावण्याचा विचार करून मी पूजेचा संकल्प सोडला...
दिव्यांचा हिशेब कळावा यासाठी जळक्या काड्या मी जमा केल्या.
पेट्यांमागून पेट्या भरून एकदा मी जळक्या काड्या मोजण्यास बसले. अन्...
काडी पेटवण्यापूर्वी मनात लख्ख प्रकाश पडला, खरंच लख्ख प्रकाश पडला -
दिवे प्रज्वलीत करणाऱ्या काड्यांची संख्या लाखभर झाली असेलही,
पण पूजा मी केलेली नाही, माझी पूजा अजून बाकीच आहे,
पूजा अजून बाकीच आहे.
शुभम् भवतु.


पुनरागमनाचे स्वागत आहे. काही काळा नंतर ब्लॉग वाचताना आनंद झाला. विनोबांचे प्रार्थना का आणी कशी करायची ते वाचून आनंद झाला. प्रार्थनेचे महत्व छान आणि सोप्या भाषेत सांगितले आहे. 🌺