top of page
Search

Sun & Moon.

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Jul 21, 2020
  • 2 min read

Updated: Jul 21, 2020

आला श्रावण श्रावण आठवांचा भरूनी आनंद...


श्रावण महिना म्हणजे सण आणि कहाण्यांची लयलूट! ऑटावात एक मूळ कनेडियन माझी मैत्रीण होती. ती आणि मी एकमेकीना आपापल्या समाजातील कहाण्या नि लोककथा सांगत असू. आज तिचा वाढदिवस असल्याने तिने सांगितलेली एक लोककथा नि तिचे मी मायभाषेत केलेले मुक्तक मनात रुंजी घालत आहे. ते कहाण्यांचा नि लोककथांचा जागर करणाऱ्या श्रावणात तुम्हास सांगण्यास भरीस घालत आहे....


सूर्य आणि चंद्र


एक होते बहिण-भाऊ! चतुर नि लाजाळू! म्हणून...

एकदा बहिणीने ठरवले - आता नाही लाजायचे

स्वतःस अमुलाग्र बदलायचे, अवश्य बदलायचे!

भावास ते नको असूनही तिचा निर्धार पाहून

त्याने बळेच होकार दिला तर लगेच तिने विचारले,

आपण कुणासारखे व्हायचे रे? लांडग्यासारखेा?

बदलण्याची अनिच्छा वदली - नको लांडग्याचे दात तीक्ष्ण असतात!

मग बहिणीने अस्वल होऊ या का? असे विचारले पण भावाने

ते गलिच्छ असते म्हणत तिच्या उत्साहावर पाणी फिरवले!

बहिणीने बैल होणे सुचवले. पण बैलाची शिंगे आठवून त्याने नाक मुरडले

बहिण नावे सुचवत गेली, भाऊ नकारघंटा वाजवत राहिला.

रडकुंडीस येऊन बहिण कळवळली, चंद्र सूर्यास तरी छान म्हण की रे...

नकार देण्यास कारण न सापडल्याने भावाने ळेच होकार दिला आणि...


निरुत्साहाने तो घरात गेला. बहिण उत्साहाने आत जाताच....

आदेश देण्याचा हक्क असल्यागत, त्याने तिला

दोन मशाली पेटवण्याचा आदेश दिला आणि तो म्हणाला,

मशाली पेटवून घराबाहेर पडून धावत सुटू या आणि...

पुढे जाणाऱ्याने सूर्य व्हावे नि मागे पडलेल्याने व्हावे चंद्र!

विरोध करण्याची सवय नसलेल्या बहिणीने सत्वर होकार दिला

आणि मशाली पेटताच झाली शर्यत सुरू! नव्हे एक झुंज

दुसऱ्यास मागे टाकत पुढे जाण्याची चुरस! त्यात


भावाच्या दैहिक बळापुढे बहिण ठरली दुबळी तरी

न खचता ती धीराने वेग वाढवत राहिली आणि...

नवल घडले. खरोखरच नवल वर्तले हो नवल वर्तले...

हलक्या वजनाच्या बहिणीने वेग वाढताच झाली की हो गंमत...

बहिण झाली हल्लक नि तिचे जमिनीवरचे पाय की हो सुटले....

तिला उडताना पाहून चिरडीस आलेल्या भावाने वेग वाढवला.

आणि भाऊही तरंगू लागला. पण...

दोघे तरंगत असूनही बहिण होती पुढे - वर

नि भाऊ मागे - म्हणजे होता खाली,


काहीही विचारताच त्याची नकारघंटा वाजे, हे आठवून,

बहिण आली चिरडीस, दादागिर भावाच्या वृत्तीचा रोष, मग

सात्विक संतापामुळे फुत्कार बनून निसटला. आणि तो फुत्कार...

खाली असलेल्या भावाच्या मिणमिणत्या मशालीस विझवून की हो गेला.

इच्छेची मशाल प्रज्वलीत ठेऊन बहिण उंच भरारी घेतच राहिली

प्रयत्नांची शर्थ करून ती निर्धारित ध्येयाप्रत पोहोचली. म्हणून...


बहिण झाली सूर्य आणि जगतास आशावादाचा प्रकाश पुरवू लागली...

पण भावासमोर चंद्र होण्यास मात्र पर्यायच उरला नाही. कारण...

तो होता थंडोबा! बदलसाठी अनुत्सुक! आणि बहाणे काढण्यात माहिर!

म्हणून तर प्रगतीच्या इच्छेची त्याची मशाल विझली होती. की...

ती कधी झळझळीत पेटलीच नव्हती. कदाचित म्हणून...

परिस्थिती बदलण्यासाठी स्त्रीशक्तीचा असतो पुढाकार पण...

बदल स्वीकारण्यास बहुतेक पुरुषाचा असतो का नकार? की सत्ता जाण्याच्या भयात,

तो पडतो नकारघंटेच्या प्रेमात? तो पडतो नकारघंटेच्या प्रेमात?


मुळात कॅनडा ही भूमी इंग्रज वा फ्रेंचाची नाही. इरोक्युस, कायगा, मोहॉक, तस्कोरोरा ... वंशीय इथले मूळ प्रजाजन! प्रत्येकाची भाषा वेगळी! मला न कळणारी! म्हणून सखी मला इंग्रजीत लोककथांचा अर्थ सांगत असे. त्यातील हे एक मला आवडलेले लोकगीत! स्त्री आणि पुरुषाच्या मानसिकतेतील फरक विशद करणारे! मग मी तिला आपल्या अध्यात्मात स्त्रीला शक्ती आणि पुरुषास शिव म्हणतात असं सांगून हे मुक्तक माझ्या मातृभाषेत ऐकवलं होतं. 'मुसाफिरके रस्ते बदलते रहे, मुकद्दरमें चलना था चलते रहे....' या उक्तीप्रमाणे माझं जीवन सतत वळणं बदलत राहिलं. आज ती कुठे ते मला ठाऊक नाही. तरी तिच्या वाढदिवशी मनोमन शुभेच्छा व्यक्त करून हा आठवणीचा दरवळ तुमच्यात वाटावा असे वाटले. तिनं सांगितलेल्या इतर लोककथा नि इकडच्या मूळ प्रजेच्या गंमती जमतीही मनात रुंजी घालत आहेत. आज तिच्या वाढदिवशी तिच्या स्मरणासह हे मुक्तक सादर करताना तिला उचकी लागून माझी आठवण यावी, अशी भाबडी इच्छा मनात आकार घेत आहे!


शुभम् भवतु.


 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Jul 22, 2020

नक्कीचअसे समजण्यास जागा आहे. कारण शक्तीस अहंकार ग्रासण्याची शक्यता असते पण शिवतेस (पावित्र्य) अहंकाराचा स्पर्श नसतो. म्हणून शक्ती चिरडीस आली तर कल्पांत घडवू शकते. यासाठीचशक्तीवर (बळ) शिवतेचा - पावित्र्याचा अंकुश असावा लागतो. म्हणून शिव-पार्वती सायुज्यास अर्धनारीनरेश्वर म्हणतात. इंग्रजीतही मेन फ्रॉम मार्स..... या वाक्यात भिन्न मानसिकतेचा स्वीकार केलेला आहे.

Like

Salyl Bhagwat
Salyl Bhagwat
Jul 22, 2020

कदाचित शिव परिवर्तन घडवू शकतात त्या मागे शिवची शक्ती आहे!

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page