top of page
Search

Symbol of Shubh & Labh

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • May 4, 2020
  • 3 min read

स्वस्तिक


स्वस्तिक आर्यांचे महत्वाचे प्रतिक! सर्व मंगलकार्याची सुरूवात स्वस्तिक रेखन व स्वस्तिमंत्राने करतात. त्यामुळे ह्रदय आणि मन समरस होतात. स्वस्ति = सु + अस्ति = कल्याण! जलात बुडवलेल्या दर्भाने सभोवती शिडकावा करत स्वस्ति मंत्र म्हणतात. वैमनस्य आणि इतर अनिच्छनीय भावनांचे शमन करून वातावरण पवित्र करणारी ही प्रक्रिया म्हणजे स्वस्तिवाचन!


ॐ स्वस्ति न इंद्रोवृद्धश्रवाः।

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।

स्वस्ति नस्ताक्ष्र्यौ अरिष्टनेमिः

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।।

ॐ शांतिः शांतिः शांतिः ।।


या मंत्रात कीर्तिवान इंद्राने, विश्वाच्या ज्ञानस्वरूप पूषाने आणि अतूट शस्त्र असलेल्या गरूड भगवानांनी आमचे कल्याण करावे, ही याचना असते. यशप्राप्तीस एकाग्रता हवी! ती प्राप्त करण्यास स्वतिमंत्र मदत करते. असे श्लोक रचणे वा म्हणणे सोपे नाही. आपल्या पूर्वसूरींना याची जाणीव असल्याने, त्यांनी मंत्रांची प्रतिके तयार केली. त्यामुळे अशिक्षित नि उच्चारांची समस्या असलेल्या समाजास स्वस्तिपूजा उपलब्ध झाली.


काही विद्वान स्वस्ति शब्दाचे, सु म्हणजे मंगल आणि अस् म्हणजे अस्तित्व, असे अर्थघटन करतात! श्री चे अस्तित्व आहे, शोभा, सुसंवाद, प्रेम, उल्हास, औदार्य आणि व्यवहाराचे सौहार्द आहे, तिथे स्वस्ति भावना हिंदकळते, असा आर्यांना विश्वास वाटे. ते स्वस्तिकास मानवी शुभभावना-दैवीशक्तीचे सम्मिलित स्वरूप म्हणत!


स्वस्तिक रेखाटताना आधी उभी नि तिच्यावर आडवी रेषा काढतात. उभी रेषा ज्योतिर्लिंग आणि आडवी रेषा विश्वाचा विस्तार सुचवते. ईश्वराने विश्वाची निर्मिती आणि विस्तार केला, असा अर्थ या दोन रेषा सूचित करतात. उभी रेषा परमात्मा आत्म्यापाशी उभा असल्याचा तर आडवी रेषा परमात्म्याच्या (सत्कर्माच्या) कामासाठी आत्म्याने (मानवाने) विश्वभर फिरावे, हा संकेत सादर करते. एकमेव ब्रह्म विश्वरुपाने विस्तारीत झाले आहे, असा भाव फुली (क्रॉस) व्यक्त करते. तोच भाव ख्रिस्ती प्रजेच्या क्रॉस मध्ये आहे, असे म्हणतात. तरी क्रॉसच्या हजारो वर्षे आधी वेदकालीन तत्ववेत्त्यांनी स्वस्तिक निर्माण केले, हे निर्विवाद!


काही पंडित स्वस्तिकास देश नि काळाचा मिलनयोग म्हणतात! स्वस्तिकाचा मध्यबिंदू तो देश नि काळाचा मिलनबिंदू! परमात्म्याशी सामीप्य साधताना, आत्म्यास काळ-देशाचे बंधन नडत नाही, असा भाव यात असल्याचे ते सप्रमाण सांगत. देश-कालातीत अनुभूती मानवास समाधीवस्थेकडे नेते, असेही ते म्हणत.


ब्रह्माने निर्माण केलेले विश्व कार्यरत ठेवण्याचे काम विष्णुचे! म्हणून स्वस्तिकात विष्णुच्या चार भुजा उंचावलेल्या दिसतात. अमकोशात ‘स्वस्तिकः सर्वतो भद्र ।‘ असे वचन आहे. कारण स्वस्तिकात सर्वांच्या कल्याणाची मनीषा आहे. ते मोठ्या मनाचे प्रतिक! स्वस्तिकाचा मध्यबिंदु विष्णुच्या नाभि कमळाचा - ब्रह्माच्या उद्भव स्थानाचा संकेत! म्हणून स्वस्तिक सृजनाचेही प्रतिक आहे.


नव दांपत्याने सुजाण सशक्त अपत्यांची निर्मिती करावी, यासाठी विवाहात स्वस्तिकास महत्व! सहा दिवसाच्या बाळास स्वस्तिक चित्रित वस्त्रावर ठेवतात. यात ईश्वराकडे बाळाच्या कुशल मंगलाची याचना ध्वनित होते.

पूजेच्या सुरुवातीस ओल्या कुंकवाने स्वस्तिक चित्रित करतात. देवासमोर स्वस्तिक आणि अष्टदलाची रांगोळी काढून पूजा करणाऱ्या स्त्रीस वैधव्य येत नाही, असा पद्म पुराणात उल्लेख आहे. घराच्या प्रवेशद्वाराशी स्वस्तिक चित्रित करण्याची प्रथा आहे. ती भारतीय स्त्रीच्या मनातील शुभ संकेत सुचवते. ‘हे प्रभू, या घरातील अन्न, वस्त्र आणि वैभव, पावित्र्याचे प्रतिक असो, अपवित्र वैभवास इथे थारा नसो. अपवित्र वैभव, असते अनर्थास निमंत्रण! आनंदाच्या मुखवट्यात अश्रु दडवलेले जीवन या घरात नसो!‘ अशी भारतीय स्त्रीच्या मनातील मंगल भावना घराच्या प्रवेश द्वाराशी चित्रित केलेल्या स्वस्तिकात व्यक्त होते.


प्राचीन संस्कृतीचा आदर होतो, अशा जगातील प्रत्येक ठिकाणी स्वस्तिकास महत्व आहे. बौद्ध आणि जैन धर्मही स्वस्तिकाचा पूजनीय संकेतात समावेश करतात. थोडक्यात, स्वस्तिक म्हणजे कल्याण काव्य! सद्‍भावनांचा सुगंध! पराक्रमाची प्रेरणा! सृजनाचे प्रतिक! शांतिचे संस्थापन! समृद्धीचे संवर्धन! स्वस्तिकातील संकेत, भागवतात या श्लोकात दिसतो.


यदा कुरूते भावं सर्व भूतेष्वमंगलम् । समद्दष्टेस्तदा पुंसः सर्वासुखमया दिशाः ।।

कोणत्याही जीवाविषयी ह्रदयात वाईट भाव न उरल्याने तेव्हा सर्व दिशा मंगलमय होतात.


प्रवासास निघताना आर्य स्वस्तिमंत्राचे वाचन करून निघत. मार्गात चोर, लुटारू वगैरे असंस्कृत प्रजेचा सामना होण्याची शक्यता असल्याने, व्यापारास निघालेल्या लोकांना कष्टाने मिळवलेले धन चोरापोरी जाऊ नये, असे वाटे. सतत मंत्र जपल्याने मनातील भय, संदेह, लालसा आणि नकारात्मक विचारांचे उच्चाटन होते, हे त्यांचे अनुभवसिद्ध मत! म्हणून आपल्या सोळा संस्कारांच्या सुरुवातीस स्वस्तिवाचन करतात. तन, मन आणि धनाच्या रक्षणासाठी स्वस्तिवाचन ही हितकर साधना आहे, अशी आर्यांना खात्री वाटे.


भूत पिशाच्च, दूर करण्यास नि चांगला पुनर्जन्म मिळावा यासाठी स्वस्तिपूजन केले जाई. आता पश्चिमेतही रोगनिवारणासाठी पूर्व जन्मात जातकास कोणते रोग त्रस्त करत होते, ते जाणण्यास न्यूयॉर्क. टोरोंटो, लंडन. कॅलिफोर्नियातील विख्यात संस्थात ‘इनकार्नेशन’ थियरीचा अभ्यास चालू आहे. मानसशास्त्रज्ञांही पूर्वजन्मात भोगलेल्या समस्यांचा पुढील जन्मातील आरोग्यावर प्रभाव दिसतो, हे मान्य आहे. जर्मनीत ऋग्वेद आणि गायत्रीमंत्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात मृतभाषा ठरलेल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करतात. आपली प्रतिके आणि परंपरा यांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास होणे, याचा आनंद! आपल्याकडे शिक्षित म्हणवणारे बरेच लोक, सखोल अर्थ जाणून न घेता टिंगल करण्यास पुरोगामीत्व समजतात, हे त्या आनंदास लागलेले गालबोट!


या अनुपम प्रतिकाच्या स्मरणाचा मोती ओवल्यावर आता शुक्रवारी आपण दुसऱ्या महत्वाच्या प्रतिकाचा मोती ओवणार आहोत. तोवर अस्तु.

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

6 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
May 18, 2020

आभार प्रशांत. पुढच्या पिढीला आपले संस्कार पास ऑन करण्यासाठीच हा वेगळा स्मृतीगान सप्ताह करण्याचा विचार केला. सात लेख आता संपतील. पुढे प्रासंगिक काही येईलही. तोवर या माहितीचं महत्व पटणाऱ्या तुमच्यासारख्यांच्या प्रतिक्रिया माझा उत्साह टिकवतील. तयासाठी पनश्च आभार.🤔🌷❤️

Like

Prashant Joshi
Prashant Joshi
May 18, 2020

ही सर्व माहिती आजच्या पिढीला कळणे आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीची ओळख झाल्या नंतरच तिचे महत्व ध्यानी येईल व आपल्या संस्कृतीबद्दल आदर व अभिमान वाटेल व तिचा पुढे प्रसार चालु राहील.....ही माहिती सांगणारे ही फार लोक नाहीत....त्यामुळे ह्या ज्ञानांचे प्रसार होणे ही अत्यंत गरजे चे आहे...

Like

Smita Bhagwat
Smita Bhagwat
May 08, 2020

धन्यवाद सलिल. माझे वडील म्हणत की माणूस रीकाम्या हातानंच नव्हे तर रीकम्या डोक्यानंही जन्मास येतो. आयुष्यभरात केवळ धनच नव्हे तर माहिती आणि ज्ञान प्राप्त करतो आणि त्याचा संचयही करतो. धन त्याचे वंशज वापरतात पण डोक्यात जमवलेल्या माहिती आणि ज्ञानाचा संचय त्यांच्याबरोबर चितेवर चढतो. तसं होऊ न देता ती माहिती अक्षररुपात ठेऊन गेलीस तर केवळ स्वत:च्या मुला नातवंडांचीच नव्हे तर असंख्य मराठी मुला-नातवंडांची आजी होशील. ते स्मरून या फादर्स डे ला हे करायचे ठरवले. तुझी कॉमेंट हे पुढच्या पिढीस आवडत असल्याची मी पावती समजते. ती दिल्याबद्दल धन्यवाद.❤️

Like

Salil Khandekar
Salil Khandekar
May 08, 2020

Namaskar !! Many of Mantras we have bee reciting for years without understanding its meaning. Glad to know their meaningful interpretation.


Khup Khup Dhanywad !!

Like

joshi.nandita
joshi.nandita
May 06, 2020

Your blogs are totally value addition. I am enjoying reading them. We are not unaware of things but the way and in detail you have put in is amazing. Looking forward to read many more...

Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page