top of page
Search

Vechalele Moti 2

  • Writer: Smita Bhagwat
    Smita Bhagwat
  • Apr 16, 2021
  • 2 min read

Updated: Apr 16, 2021

स्मृतीगंध २



आपल्या पूर्वजांनी लोभस अख्यायिका रचून सणांचे सौंदर्य वाढवले आहे. काही सणांच्या एकाहून अधिक अख्यायिका आहेत. गुढीपाडव्यास श्रीराम वनवास संपवून आयोध्येस परतले. म्हणून घरोघरी गुढ्या तोरणे उभारून सण साजरा करतात, अशी अख्यायिका आहे. योगेश्वर अभ्यंकर लिखित माणिकताईंनी गाईलेले 'विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले, मंदिरी....' हे गीत बहुतेकांना ठाऊक असते. या दिवशी चैत्र नवरात्राचा प्रारंभ होतो, हे ही! पण भारतात काही ठिकाणी गुढी इंद्रपूजेचे प्रतीक असल्याचे फार कमी मराठी लोक जाणतात. माझी गोष्टीवेल्हाळ आई, अख्यायिका नि कहाण्या छान सांगत असे. पिक्चर मेमरीसारखे ते कथन नि आम्हा मुलांचे श्रवण हे चित्र आजही माझ्या नजरेसमोर तरळते. ते नवरात्रात शब्दबद्ध करावेसे वाटले, म्हणून....


पौरवराज वसुराजाने उग्र तपस्या केल्याने इंद्रासन डळमळले. घाबरलेल्या इंद्राने भय दडवून वसुराजाची स्तुती केली, "तू मला धर्मप्रेमी मित्र वाटतोस. मला वाटते की धरेवर तुझ्यासारखे धर्माचरणी राज्यकर्ते नि धर्मनिष्ठ प्रजेची संख्या वाढली पाहिजे. म्हणून तू तपस्वी न होता ध्येयनिष्ठ भूपती व्हावे! मी तुला रमणीय चेदीप्रदेश देतो! त्यास महाजनपदात अग्रभागी स्थान मिळेल, असे आदर्श राज्य निर्माण करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे!" प्रतिक्रिया जाणण्यास इंद्र थबकला. पण....


वसुराजाच्या मुखावर ना आनंद उमटला की त्याने होकारात मान डोलावली. म्हणून इंद्रच पुढे म्हणाला, "नागरिकांच्या आदर्श वर्तनाचे परिक्षण-निरीक्षण करण्यास सोेय व्हावी यासाठी मी देवांनाच उपलब्ध असलेले स्फटिकाचे आकाशयान देईन. त्यामुळे तू वेगाने राज्यातील परिस्थितीचा चितार मिळवू शकशील. मृत्युलोकात असे आकाशयान मालकीचे असलेला तू एकमेव मानव असशील! न कोमेजणाऱ्या कमलपुष्पाची वैजयंतीमाला स्वहस्ते तुझ्या गळ्यात घालून मी तुझा गौरव करीन. सत्तेची खूण ठरणारी सुरेख कलात्मक काठी तुला देईन. ती तुझा राजदंड असेल!"


वसुराजाने विनम्र वंदन करून राजदंड आणि इंद्राने दिलेल्या इतर भेटींचा स्वीकार केला. काठी जमिनीत रोवून तिला राजदंड समजून वंदन केले. भरजरी शेला आणि सोन्याचे कडे घालून राजदंडाचा गौरव केला. राजदंडावरून हे सारे पडण्याची शक्यता होती. वसुराजापाशी ताम्रकलश होता, त्यातील जल रिकामे करून त्याने राजदंडावर उपडा ठेवला. इंद्रास आनंद झाला. आम्र नि कडुलिंबाची पर्णमाला, पुष्पमाला, बत्ताशांची माळ नि मौक्तिकमाळा घालून देवराजाने राजदंड सजवला. त्यास आनंदाची गुढी नाव देऊन तो म्हणाला, "या दिवशी गुढी उभारून शिखरीणीचा नैवेद्य दाखवून इंद्रपूजा करील नि धनदान, भूमिदान वा रक्तदान करील त्यास उत्तम आरोग्य लाभेल! अलौकिक सन्मान प्राप्त होईल! हा माझा शब्द आहे!" ती होती मध्यरात्र! फाल्गुन अमावास्या सरून उमलत होती चैत्र प्रतिपदेची पहाट!


सुप्रभाती नगरजनांना गुढीचे गूढ कळले. त्यांनी आपल्या घराच्या दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावले. आनंदाची गुढी रेशमी वस्त्र, दागिना नि बत्ताशाची माळ घालून सजवली. नैवेद्यात शिखरीणी ठेऊन शक्तीनुसार दानधर्म केला. इंद्राच्या वरदानानुसार प्राचीन भारतातील १६ महाजनपदात चेदी प्रदेशाचा अग्रभागी समावेश झाला. पुढे हा प्रदेश बुंदेलखंड नाम पावला. तिथे हा सण इंद्रपूजा ठरतो. महाभारतात खवय्या भीमसेनाने जायफळयुक्त शिखरीणी केल्याची नोंद आहे. शिखरीणीचे सेवन केल्याने श्रीकृष्णास झोप लागली नि त्याचे कार्य खोळंबले. म्हणून श्रीच्या कामात खंड पाडणाऱ्या या पदार्थास श्रीखंड नाव मिळाले, अशी अख्यायिका आहे.


महाराष्ट्र नि जगभर पसरलेले मराठी लोक, गुढी पारंपारीक रीतीने उभारतात. तिला गाठी नामक खाशा बत्ताशाच्या माळेने सजवतात. शक्य असेल तिथे घरांवर आम्रपर्णांचे तोरण बांधतात. वातावरण उष्ण होण्याची चाहूल लागलेली असल्याने उष्णतेस शांतवणाऱ्या दह्याचे आंबटगोड श्रीखंड नि आरोग्यदायक कडूलिंबाच्या कोवळ्या पानांच्या चटणीने नैवेद्याचे पान सजते. सुवासिनी अक्षय्य तृतियेपर्यंत वसंतोत्सव साजरा करीत हळदीकुंकू करतात. त्यात कैरीच्या आंबटगोड पन्ह्यात केशरकांडीचा सुवास मिसळतो. असा हा गुढी पाडवा.

शुभम् भवतु.

 
 
 

Recent Posts

See All
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 
Smrutigandh

स्मृतीच्या शिपलीतून..... राजा दशरथास पुत्रकामेष्टी यज्ञामुळे मिळालेल्या पायसदानाचा अंश कैकयी रुसल्यामुळे दैवयोगाने अंजनीस मिळाला. रामभक्त...

 
 
 

2 Comments


Smita Bhagwat
Smita Bhagwat
Apr 18, 2021

धन्यवाद.

Like

Siddharth Bhagwat
Siddharth Bhagwat
Apr 17, 2021
गुढी पाडव्याची अख्यायिका वाचून आनद झाला। मराठी भाषिक लोक हा सण आनंदाने पारंपारीक रीतीने साजरा करतात. ही अख्यायिका वाचल्यावर, इतरत्र हा सण कसा साजरा करतात ते कळल्यामुळे सण साजारा करण्याचा अधिक आनंद उपभोगता येईल.
Like

FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page