top of page
Search

Vijaya Dashami.

Writer: Smita Bhagwat
Smita Bhagwat
Oct 25, 2020
3 min read

Updated: Oct 26, 2020


विजयादशमी.

संहारकर्त्या शंकराची अर्धांगिनी पार्वती! महाशक्ती! देवी भागवतात दुर्गेस दिव्य शस्त्र-अस्त्रे विविध देवतांनी प्रदान केल्याचा उल्लेख आहे. म्हणून शस्त्र-अस्त्र धारण करणारी दुर्गा, महादेवी ठरली. वैचारिक जागरात ही दिव्यास्त्रे देवीस कुणाकडून मिळाली, ते जाणून घेऊ.


बहुसंख्य असूर तपश्चर्येच्या मदतीने वर मिळवून देवांना ते डोईजड झाले. तसा महिषासूर. त्याच्या घोर तपश्चर्येस वश होऊन ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याने अमर होण्याचा वर मागितला. ब्रह्मदेवाच्या क्षमतेन बसणारा! त्यांनी दुसरा वर मागण्यास सांगितले. बेरकी महिषासुराने त्यास देव, दानव, मानव आणि पशू यांच्याकडून मृत्यू येऊ नये, असा वर मागितला. हे परोक्ष अमरत्व ठरले. महिषासूर त्रिभुवनास सळो की पळो करू गला. यातून मार्ग काढण्यास सारे भगवान विष्णूस भेटले. भगवंत चतुर! त्यांना गर्विष्ठ महिषासुर स्त्रीत क्षमता नसते, असे समल्याचे जाणवले. म्हणजे हे कार्य स्त्रीच करु शकणार. पण तो सबळ! शक्तीच्या शक्तीत खूप वाढ होण्याची गरज! म्हणून त्यांनी सर्व देवतांनी दुर्गेस शस्त्रास्त्रे प्रदान करण्यास सांगितले.


भगवंतांनी स्वतः सहस्त्र आरे असलेले तेजस्वी चक्र दुर्गेस अर्पण केले. शिवाने असुरांचा संहार करणारे त्रिशूळ, वरुणाने मांगल्याचे प्रतिक असलेला दिव्य शंख, अग्निने दैत्यांचा संहार करणारी, मनाच्या तीव्र गतीची शक्ती, वायुने भयंकर गर्जनेसारख्या टणत्काराने दहशत निर्माण करणारे बाण नि धनुष्य, देवराज इंद्राने त्याने भीषण शक्तीधारक वज्र, जीवनाच्या शेवटच्या क्षणी यमराज ज्या काठीने प्रहार (दंड) करून प्राणीमात्रास मरणशरण करतात, ती काठी महादेवीस दिली. त्वष्टाने असंख्य घंटानादाच्या तोलाचा कौमोदी नामक गदा, काळाने तिला खड्ग आणि ढाल दिली. सर्व देवांच्या ठायी असलेल्या शक्तीचे दैवतीकरण झाले. त्या समग्र शक्ती समुच्चयास महादेवी परिचय देण्यात आला. शाक्त संप्रदाय तिला सर्वोच्च देवता समजून भजतात. अशी सर्व देवतांची शक्ती एकवटलेली महादेवी दुर्गा महिषासुराचा नायनाट करायला सज्ज झाली.


नवरात्रात भीषण युद्ध सुरू झाले. ते अश्विन शुद्ध दशमीस महिषासुराच्या वधाने संपले. म्हणून देवी महिषासुर मर्दिनी ठरली. अज्ञानावर ज्ञानाने, वैऱ्यावर प्रेमाने आणि शत्रुवर पराक्रम गाजवून विजय प्राप्त करण्याचा दिवस विजयादशमी ठरला. त्याचा साडेतीन मुहुर्तांत स्थान मिळाले! या इतिहासाचा आदर करण्यास राजपूत आणि मराठा योध्दे या दिवशी मोहिमाठी प्रस्थान ठेवत. काही लोक या दिवशी नव्या प्रतिष्ठानांची सुरूवात करतात. नवे वाहन घेऊन त्याची पुजा करतात. शस्त्रपुजेचाही प्रघात आहे. या दिवशी सरस्वती पूजनही करतात. विजयादशमीस एकमेकांना आपटयाची पाने देण्याचा रिवाज आहे. यामागे एक अख्यायिका आहे....

गुरूशिष्य परंपरेच्या काळात, वरतंतु ऋषी आपल्या आश्रमात ज्ञानदान करत. कौत्स त्यांचा शिष्य! विद्याभ्यास पूर्ण करून त्याने गुरूदक्षिणेबद्दल विचारले. ऋषी ज्ञानदान करत असल्याने त्यांना दक्षिणा नको होती. तरी कौत्साने आग्रह धरला. विद्येचा मोलभाव करू नाही, असे गुरु म्हणाले तरी तो ऐकेना म्हणून गुरूदेवांनी चौदा विद्यांचे ज्ञान दिले त्यासाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्राची मागणी केली. कौत्साने लगेच त्या मिळवण्यास प्रयाण केले. पण काम सोपे नव्हते. तो त्यासाठी रघुराजाकडे धावला. पण नुकतीच रघुराजाने संर्व संपत्ती ब्राम्हणांना दान केली होती. तरी रघुराजाला कुणास विन्मुख पाठवणे आवडले नाही. त्याने कौत्साला तीन दिवस थांबवून घेतले. मग इंद्रास या सुवर्णमुद्रांची व्यवस्था कर वा युध्दास तयार हो, असे सांगितले. इंद्राने कुबेरास नगरीबाहेरील आपटयाच्या नि शमीच्या वृक्षावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव करण्याचा आदेश दिला. रघुराजाने कौत्सास हव्या तेवढया सुवर्ण मुद्रा नेण्यास सांगीतले पण कौत्साने चौदा कोटीच सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतु ऋषींना अर्पण केल्या. उर्वरीत सुवर्ण मुद्रांचे त्याने आपटयाच्या नि शमीच्या वृक्षाखाली ढीग रचले. सर्व प्रजाजनांना हव्या तेवढया मुद्रा नेण्याची विनंती केली. तो दिवस विजयादशमीचा! अचानक श्रीमंत होण्याची संधी मिळाल्याने प्रजेने आपटयाच्या आणि शमीच्या झाडाची पूजा केली. तेव्हांपासून लोक विजयादशमीस सुवर्णमुद्रांऐवेजी आपटयाच्या पानांची देवाणघेवाण करतात.


आपटयाच्या झाडाला अश्मंतक आणि वनराजही म्हणतात. कफ व पित्त दोषांवर ही पाने गुणकारी असतात. पांडव अज्ञातवासात गेले तेव्हा त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडात लपवल्याचा महाभारतात उल्लेख आहे. म्हणूनही विजयादशमीस शमीची पूजा करून परस्परात प्रेम व्यक्त करतात. एकमेकांची भेट घेण्याचा प्रयत्न करतात. भेट न जमली तर शुभेच्छांची देवाण-घेवाण करून सद्भावना व्यक्त करतात.

विजयादशमीस पौराणिक नि ऐतिहासिक महत्त्व आहे. म्हणून त्यास नवरात्रसमाप्तीचा दिवस समजतात. सुमुहूर्त समजून सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजिता पूजा व शस्त्रपूजा ही चार सत्कृत्ये करतात. रामाने नऊ दिवस उपवास करून शक्तीची - देवीची उपासना करून शक्ती प्राप्त केली. म्हणून त्यास रावणाचा वध करणे जमले. रामाला या दिवशी विजय मिळाला म्हणूनही या सणास विजयादशमी म्हणतात. देशात ठिकठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन करतात.


१८ व्या शतकात हा सण पेशवे आणि त्यांच्या सरदारांच्या कुटुंबात मोठ्या थाटाने साजरा होत असे. सण साजरा करून हिंदवी स्वराज्याचे सरदार महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात मोहिमेवर जात.


या सुमुहूर्तास सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

शुभम् भवतु

दसऱ्यास होणाऱ्या सरस्वतीच्या पूजनाचे प्रतीक!.



 
 
 

Recent Posts

See All
So long, Mother....

There are certain beings who have walked on this earth just to balance out the residual effects of their past karma. They are neither interested in wealth nor power nor fame. As soon as they are done

 
 
 
Vechalele Moti.

वेचलेले मोती. हिंदू धर्म म्हणत तो मुळात सनातन धर्म आहे. त्यास विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण जाणतो! त्यातील सर्व समावेशक वृत्ती नि...

 
 
 
Ramotsav Samapti! हनुमान जन्मोत्सव!

आज चैत्र पौर्णिमा! म्हणजे हनुमानाचा जन्मोत्सव! काही लोक त्यास हनुमान जयंती म्हणतात. पण समर्थ रामदासांना ते अयोग्य वाटे. कारण जयंती मृत्यू...

 
 
 

Comments


FOLLOW ME

  • Facebook Social Icon

© 2020 by Smita Bhagwat

bottom of page