Vishnupriya
- Smita Bhagwat
- Apr 27, 2020
- 3 min read
विष्णुप्रिया
वडिलांना आम्ही अण्णा म्हणत असू. ते कधी औपचारिक रीतीने आम्हाला शिकवायला बसले नाहीत. साध्या गप्पातून हसत खेळत ते इच्छित माहिती देत. त्यांच्या मते आपले पूर्वज कल्पक नि ज्ञानी! "डूज अँड डोंट्सची" (हे करा वा करू नका) रुक्ष यादी न देणारे! त्यांना मानसशास्त्राचे उत्तम ज्ञान! आदर्श बाबींचा कंटाळा येतो, पण धर्माची बाब आवर्जून केली जाते, हे ओळखून त्यांनी परमात्म्याच्या संकल्पनेत 'त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी' हा विचार गुंफला. वेदधर्मात विज्ञानास अनन्य स्थान असल्याची ती प्रचिती! हितप्रद वैज्ञानिक संकल्पनांना त्यांनी धर्माची बैठक दिली. मग इंग्रज आले. त्यांची शिक्षणप्रणाली वेगळी! भारतीय वेदांतास अर्थहीन भाकडकथा ठरवण्याचा मानस असलेली! (संदर्भ मेकॉलेची पत्नीस पत्रे.) त्या मुशीत तयार झालेले भारतीय, आपल्या तत्वज्ञानाची खुळचट समजून टर उडवत! त्यामुळे समाजात वैदिक परंपरांना मान देणारा प्रतिगामी नि इंग्लीश विचार योग्य समजणारा पुरोगामी अशी विकृत व्याख्या वाहती झाली!
आपल्या परंपरांना वैज्ञानिक बैठक असल्याचे सांगताना अण्णा तुळशीला प्रदक्षिणा घालण्याच्या परंपरेचे उदाहरण देत! विशेषतः मुलीला चांगला नवरा मिळण्यासाठी! काळ परिवर्तनशील आहे! आज तुळशीस प्रदक्षिणा घालण्याची गरज तितकी तीव्र उरलेली नाही. हिरवळीपासून दूर जाणारे आजचे जीवन समस्या वाढवत आहे. याचा अर्थ ही परंपरा अर्थहीन वा हास्यास्पदही नाही, असे ते ठामपणे सांगत.
एकेकाळी यवनांच्या भयामुळे स्त्रिया निर्भयपणे बाहेर जाऊ शकत नसत. घरकाम कष्टाचे होते. आपल्या पूर्वजांना कष्ट आणि व्यायम यातील फरक कळत असल्याने त्यांनी तुळशीस प्रदक्षिणा घालण्याची भलावण केली. आयुर्वेदात तुळशीस फार महत्व आहे. इतर झाडांच्या तुलनेत तुळस आसमंतात प्राणवायूची अधिक उधळण करते. या अतिरीक्त प्राणवायुचा प्रदक्षिणा घालणाऱ्या मुलीस लाभ होतो. तुळशीची मुळे फैलावलेल्या जमिनीत रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करणारे विष निर्माण होते. अनवाणी प्रदक्षिणा घालताना पावलांना, या विषाचा स्पर्श झाल्याने मुलीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ती मुखावर आरोग्याची आकर्षक झळाळी दृग्गोचर करते. परिणामी मुलगी पसंत पडून तिला चांगला नवरा मिळतो! पण पाश्चात्यांचे सारेच खरे समजून त्यांच्या भजनी लागलेल्यांना सखोल विचार करण्यापेक्षा परंपरांची टर उडवून पुरोगामी ठरणे सोपे वाटते.
तुळशीचे आयुर्वेदिक महत्व जमेस धरून आपल्या पूर्वजांनी तिला मानाचे स्थान दिले. तुळस मांगल्याचे प्रतीक! वैष्णव परंपरेत ती अनन्य! वारकरी तुळशीमाळ गळ्यात घालतात. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून आपल्या संस्कृतीत तुळशीस लक्ष्मीप्रमाणे सुखदायक नि कल्याणकारी म्हटले आहे. विष्णुप्रिया तुळशीचा दिवाळीनंतर देवदिवाळीत विष्णुशी विवाह लावतात. प्रसादावर तुळशीचे पान ठेऊन नैवेद्य दाखवतात. ते नैवेद्य परमात्म्यास अर्पण करणे असते. कशावरही तुळशीपत्र ठेवण्यास अर्पण करणे वा त्याग म्हणतात. जीवनावर तुळशीपत्र ठेवण्यात जीवन परमेश्वरास अर्पण करणे, असा गूढार्थ असतो. तुळसमंजिरीचेही महत्व अनन्य आहे.
जिथे नियमित तुळशीपूजन होते, त्या घरावर लक्ष्मीची कृपा असते, असे पुराणात म्हटले आहे. लोकांना या औषधी वनस्पतीचा सहवास महत्वाचा वाटावा, हा त्यात हेतू! पूर्वी घरोघरी तुळशी वृदांवन असे. त्यामुळे आसपासची हवा आपसूक शुद्ध होई. शुद्ध हवेतून नकारात्मक विचारांची हकालपट्टी होऊन सकारात्मकता प्रगटते. घरात तुळस असणाऱ्या कुटुंबातील सदस्य सहसा आजारी पडत नाहीत. आरोग्यास धनसंपदा समजणारे सुजाण, निरोगी काया समृद्धीचे लक्षण समजतात. पाश्चात्य औषधांचे दुष्परिणाम (साईड इफेक्ट) नजरेत भरू लागल्यावर प्रसंगी रोग पत्करला पण दुष्परिणाम नको, अशी स्थिती निर्माण झाली. म्हणून मागच्या शतकातील आठव्या दशकाच्या उत्तरार्धात आल्टरनेटिवा मेडिसिना संस्थेची निर्मिती करण्यात आली. या संस्थेत अॅलोपथीतील औषधांचे भयप्रद दुष्परिणाम टाळण्यासाठी इतर पथींचा स्वच्छ नजरेने विचार होतो. त्यामुळे जगास आयुर्वेदाचे महत्व पटू लागले. पण भारतीय ज्ञानाचे महत्व कबूल करणे बऱ्याच पाश्चात्यांना आवडत नाही. म्हणून असे लोक आयुर्वेद न म्हणता हर्बल मेडिसिन म्हणण्याचा शहाजोगपणा करतात.
भारतातही आता 'सो कॉल्ड' पुरोगामीत्वाच्या मोहास ओहोटी लागली आहे. घरोघरी तुळशी वृदावन असणे या काळात अशक्य आहे. पण लोक सदनिकेच्या बाल्कनीत तुळस लावतात. कुणी हौशीने तुळशी वृंदावनाच्या आकाराच्या कुंड्याही आणतात! चहात तुळस असणे, तुळशीचा अर्क असणारी औषधे वापरणे यास महत्व प्राप्त होत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास तुळशीचे सेवन करण्याचा विचार होऊ लागला आहे. ही तुळशीस प्रदक्षिणा घालण्याची परंपरा अर्थहीन नसल्याचीच रसिद आहे ना?


छान व्यक्त होतेस तू! नवल नाही गं! जातीची कवयित्री आहेस. अगं प्राथमिक शाळेत शिकत असताना परीक्षेच्या दिवशी आम्हीही तळशीचं पान पेपर संपेतो तोंडात सांभाळत असू. आवर्जून प्रतिक्रिया दिलीस यासाठी मनापासून आभार.🌷❤️
बाहेरच्यांचं आकर्षण हा एक मुद्दा..त्यामुळे संस्कृतीचा..भौगोलिक वातावरणाचा..समाजाचा विचार न करता अंधानुकरण केलं गेलं...कदाचीत करोना विषाणू हा प्रवाह उलटा करेल...आता लोक भारताचं अनुकरण करू लागतील....काही परंपरा स्वतःला आधुनिक समजणारया बायकाही पाळतात...एक संस्कार..सवय किंवा असुरक्षितता पण कसं का होईना खूप गोष्टी पाळल्या जातात...अगदी नवी पिढी ही.. तुळशीचं महत्व सांगावं तेवढं थोडं...परिक्षेला तुळसपान घेऊन जायचो आम्ही...आता समजलं की बी पी नाॅर्मल रहातं..पेपरचं टेन्शन कमी होतं..
खूप छान लेख
पुराणातली वानगी (वांगी?) याचा फिरून उहापोह केलाच पाहिजे! नालंदा आणि तक्षशीला जळूनही एवढं ज्ञान आपल्याकडे आहे, तो सोन्याचा धूर काय असेल हे कल्पनेतही भारावून टाकते, पुनःपुन्हा आपल्या भारतीय संस्कृतीविषयी कृतज्ञता दाटते... धंदेवाईक वृत्तीपलीकडे जाऊन आयुर्वेदाला, त्याच्या अभ्यासाला भरघोस चेतना लाभो. तुमच्या लेखणीतून या छोट्या मोठ्या गोष्टी फिरून आठवण देऊन जावोत _^_
Very important information expressed making it very interesting as well
It will be interesting to see comments from Ayurvedacharyas and Doctors!